३ लाख हरिपाठ पुस्तकांचे वाटप वारकऱ्यांसाठी करणार
मुंबई – आषाढी एकादशी, अर्थात महाएकादशीच्या निमित्ताने पंढरपूरकडे निघणारी वारी, हा महाराष्ट्रातील संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे. उभ्या महाराष्ट्रातून विठूमाऊलीचे भक्त पंढरपूरकडे प्रस्थान करतात. जवळपास वीस दिवस त्यांचा हा प्रवास सुरु असतो. चालत पंढरपूर गाठणाऱ्या या वारकऱ्यांसाठी कुठल्याही प्रकारच्या खास सोयीसुविधा उपलब्ध केलेल्या नसतात. वारकऱ्यांना ओढ लागलेली असते ती फक्त आणि फक्त विठ्ठल भेटीची! वारीसाठी परिस्थिती अनुकूल आहे अथवा नाही, याचा विचार वारकऱ्यांच्या मनाला शिवत नाही. उत्तमोत्तम चित्रपटांसह, ‘गजर कीर्तनाचा’सारखे कीर्तनाचे कार्यक्रम प्रेक्षकांसाठी घेऊन येणारे ‘झी टॉकीज’ यंदा या विठ्ठल भक्तांसाठी काम करणार आहे. त्यांना गरजेच्या असलेल्या काही सोयीसुविधा ‘झी टॉकीज’ त्यांना पुरवणार आहे. वारीचा प्रवास सुखाचा व्हावा याची काळजी झी टॉकीजकडून घेण्यात येणार आहे.
वारीच्या या प्रवासात वारकरी सातत्याने विठूनामाचा जप करत असतात. कीर्तन हा यातील एक महत्त्वाचा भाग असतो. हे लक्षात घेऊन, ‘झी टॉकीज’ या वारकऱ्यांसाठी ठिकठिकाणी कीर्तन करण्याकरिता जागेची व्यवस्था करणार आहे. याशिवाय वारकऱ्यांसाठी ३ लाख आरतीसंग्रहांचे वाटप ‘झी टॉकीज’कडून करण्यात येणार आहे. वारकऱ्यांच्या सोयीसाठी पाण्याचे टँकर्स या मार्गावर उपलब्ध करून देण्याचे काम सुद्धा वाहिनीच्या मार्फत होणार आहे. कुठल्याही वारकऱ्याला वैद्यकीय मदतीची गरज पडल्यास, ‘झी टॉकीज’ने उभारलेल्या प्रथमोपचार केंद्रांचादेखील लाभ घेता येईल. विठ्ठल भक्तांचा हा वारीचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी वाहिनीची टीम झटणार आहे. सर्व सोयीसुविधांच्या बरोबरीने आणखी एक आनंदाची बाब म्हणजे, ‘गजर कीर्तनाचा’ या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळणारी दीप्ती भागवत वारीत सहभागी होणार आहे. वारकऱ्यांच्या बरोबरीने संपूर्ण वारीचा आनंद दीप्ती घेणार आहे. सर्वांचं लाडकं ‘झी टॉकीज’ या वारीच्या निमित्ताने आणखी आपुलकीचं होऊन जाणार आहे. याविषयी बोलतांना झी टॉकीजचे बिझिनेस हेड भावेश जानवलेकर म्हणतात;
वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या संस्कृतीमधील एक महत्त्वाचा घटक आहे. ‘मन मंदिरा’, ‘गजर कीर्तनाचा’ अशा कार्यक्रमांमधून झी टॉकीज ही वाहिनी कीर्तन, अध्यात्म या गोष्टींना नेहमीच महत्त्व देत आली आहे. पंढरपूरची वारी हा वारकऱ्यांच्या विठ्ठलभक्तीचा सर्वोच्च बिंदू असतो. त्यांची वारी सुखकर व्हावी यासाठी ‘झी टॉकीज’ प्रयत्नशील आहे. वारकरी करत असलेल्या माऊलीच्या सेवेत, त्यांच्यासाठी प्रथमोपचाराची, पाण्याची सोय करून, झी टॉकीज सुद्धा सहभागी होणार आहे. वारीमध्ये कीर्तनाचे कार्यक्रम झी टॉकीजच्या माध्यमातून होणार आहेत. ३ लाख हरिपाठ पुस्तकांचे वाटप वारकऱ्यांसाठी करण्यात येणार आहे. जिथे वारकरी विश्राम करतात त्या जागेत झी टॉकीजवरील ‘मन मंदिरा’ या कार्यक्रमाचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. वारकरी विठूमाऊलीची सेवा करत असतां, त्यांची सेवा करण्याचे भाग्य आम्हाला मिळणे, ही आमच्यासाठी एक आनंदाची बाब आहे.







