नाशिक – शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवुन त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होण्यासाठी सर्वांनी कटीबद्ध राहून शेतकरी वर्गाला सहकार्य करावे, असे प्रतिपादन कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे यांनी केले.
माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंती तथा कृषी जिल्हा परिषदेतील रावसाहेब सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे, उपाध्यक्षा नयना गावीत, विभागीय आयुक्त राजाराम माने, कृषी आयुक्त शिवाजी धिवसे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नरेश गिते, अर्थ व बांधकाम समिती सभापती मनिषा पवार, कृषी सहसंचालक रमेश भताने, जिल्हा कृषी अधिक्षक संजीव पडवळ, आदी उपस्थित होते.
श्री. बोंडे म्हणाले, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी गट शेती करण्यावर भर द्यावा. ज्यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे शेती उत्पादनाला योग्य बाजारपेठ मिळण्यासाठी गटशेतीच्या माध्यमातून अधिक चांगल्या पद्धतीने प्रयत्न करता येतील. शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांची अंमलबजावणी करतांना त्यातील नियमामध्ये लवचिकता आणून शेतकऱ्यांना काही प्रमाणात स्वातंत्र्य देणे आवश्यक आहे. गावपातळीवर काम करणाऱ्या कृषी सहाय्यकाला ग्रामपंचायत कार्यालयात कामासाठी जागा उपलब्ध करुन देण्यात येईल, तसेच जिल्हा कृषी अधीक्षक व तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये विमा एजंट यांची सेवा उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
शेतकऱ्यांनी देखिल शेती करत असतांना शेतीसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध विमा योजनांचा लाभ घेणे गरजेचे आहे. ज्यामुळे नैसर्गिकरित्या ओढवलेल्या संकटांना सामोरे जाण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळेल. त्याचप्रमाणे जलयुक्त शिवार व पीएम किसान या दोन्ही योजनांमुळे शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. शेती कर्ज उपलब्ध करण्यात ज्या बँका कुचराई करतील तसेच बि-बियाणे व खते यामध्ये भेसळ करणाऱ्यांवर देखिल कडक कारवाई करण्याचे निर्देश डॉ.बोंडे यांनी यावेळी दिले.
श्रीमती सांगळे म्हणाल्या, अनेक संकटातून मार्ग काढत शेतकरी शेती करीत आहे. अशा वेळी सर्व शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात यावे. तसेच सर्व अधिकाऱ्यांनी शेतीविषयक शासकीय योजना शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.
श्री. धिवसे म्हणाले, नाशिकमधील शेतकऱ्यांसाठी मुंबई, पुणे यासारख्या बाजारपेठा उपलब्ध आहेत. त्याअनुषंगाने गटशेतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी जागतिक बाजारपेठेत आपले उत्पादन पोहचविण्यासाठी प्रयत्न करावेत.
कार्यक्रमाचे प्रारंभी माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन व दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच कृषी विभागामार्फत प्रकाशित करण्यात आलेल्या कृषी योजनांच्या पुस्तकाचे व घडीपत्रकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्याचप्रमाणे जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयामार्फत तयार करण्यात आलेल्या www.krushivibhagnashik.com या संकेतस्थळाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत श्रीमती सुमन माधव कुऱ्हाडे, ता.सिन्नर यांना रुपये दोन लाख आरटीजीएस देण्यात आल्याचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
यासोबत अनुक्रमे सर्वश्री. मोतीराम लक्ष्मण गावीत सुरगाणा यांना 2015 चा वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार, सुरेश एकनाथ कळमकर दिंडोरी, रविंद्र धनसिंग पवार मालेगांव, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार (सर्वसाधारण गट), सुरेश नामदेव भोये पेठ, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार (आदिवासी गट), विमल जगन आचारी त्र्यंबकेश्वर, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार (आदिवासी गट), भाऊसाहेब गोविंद जाधव नाशिक, उद्यान पंडित, शिवनाथ भिकाजी बोरसे चांदवड, डॉ.पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार, वामन किसन भोये त्र्यंबकेश्वर व अरुण बबनराव पवार मालेगांव यांना वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार, तसेच हेमंत पंडलिक पिंगळे दिंडोरी, उत्तमराव भागुजी ठोंबरे चांदवड व गणेश दामू मिसाळ नाशिक यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार (सर्वसाधारण गट) आदींना राज्यस्तरीय विविध कृषी पुरस्कार प्रदान करण्यात आले.
सर्वश्री अरुण सखाराम दळवी बागलाण, संदिप कारभारी आहेर कळवण, मनोहर प्रकाश खैरनार मालेगांव, रमेश शिवराम सरोदे नांदगाव, शिवाजी पंडितराव बस्ते चांदवड, प्रताप शिवाजी दाभाडे येवला, हेमंत वसंत आहेर देवळा, सोपान प्रतापराव वाघ निफाड, कुणाल बाशोक घुमरे सिन्नर, कैलास बाबुराव बेंडकोळी नाशिक, एकनाथ कचरु महाले इगतपुरी, सुंदराबाई दामोधर वाघेरे त्र्यंबकेश्वर, सागर सुरेश डोखळे दिंडोरी, रामनाथ गोविंद वाघेरे पेठ, रामचंद्र पाहुजी गांगुर्डे, नाशिक आदींना आदर्श शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यासोबतच विविध पीकस्पर्धे अंतर्गत साधारण 69 शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात आले.
एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्वी आयोजन
नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...





