नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर ‘ASCO Direct GI Cancers Symposium’चे आयोजन केले होते. शनिवार (१४ मार्च) आणि रविवारी (ता.१५) हा उपक्रम पार पडला. याअंतर्गत एचसीजी हॉस्पिटलमध्ये तीन रोबोटिक शस्त्रक्रियांचे प्रात्येक्षिक सहभागी तज्ज्ञांसमोर सादर करण्यात आले. तसेच कर्करोग उपचारावर प्रभावी ठरतील असे जागतिक पातळीवरील ३५ शोधनिबंध सादर झाले असल्याची माहिती एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरचे एमडी तथा चीफ ऑफ सर्जिकल ऑन्कॉलॉजी ॲण्ड रोबोटिक सर्व्हिसेस प्रा. डॉ.राज नगरकर यांनी पत्रकार परीषदेत दिली
अधिक माहिती देताना डॉ.राज नगरकर म्हणाले, या प्रतिष्ठित शैक्षणिक कार्यक्रमाचे यजमानपद भूषवणारा भारत हा जगातील सहावा देश ठरला आहे. नाशिकमध्ये पहिल्यांदाच अशा जागतिक दर्जाच्या सिम्पोजियमचे आयोजन होत आहे. यामुळे प्रगत कर्करोग उपचार आणि वैद्यकीय शिक्षणातील नाशिकचे वाढते महत्त्व यानिमित्त अधोरेखित झाले आहे. ग्लोबल हेल्थकेअर अकॅडमीच्या सहकार्याने आयोजित या परिषदेत १५० ते २०० प्रतिनिधी आणि ४० ते ५० ख्यातनाम वक्ते सहभागी झाले. शंभराहून अधिक लॅपरोस्कोपिक आणि रोबोटिक सर्जन, शंभरापेक्षा जास्त मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट, तसेच रेडिएशन ऑन्कोलॉजी आणि इंटरव्हेंशनल रेडिओलॉजी क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश होता. गॅस्ट्रोइंटेस्टाइनल (GI) कर्करोग उपचारांसाठी हे एक महत्त्वाचे बहुविद्याशाखीय व्यासपीठ ठरले आहे.
या सिम्पोजियमचे मुख्य आकर्षण म्हणजे सिम्युलेशन-आधारित रोबोटिक प्रशिक्षण हे होते. यामध्ये Intuitive, CMR Surgical आणि Edge Robotic Systems या कंपन्यांच्या तीन प्रगत रोबोटिक सर्जिकल सिस्टिम्सद्वारे तज्ज्ञांना प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले. सुमारे ५० निवडक सर्जननी विशेष प्रशिक्षणात सहभागी होऊन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अवगत केला. त्याचा फायदा उपस्थित शल्यचिकित्सकांना होणार आहे.
कार्यक्रमाचे नेतृत्व डॉ. राज नगरकर करत असून, त्यांच्यासोबत डॉ. विजय कुमार, डॉ. श्याम मोहन, डॉ. गोपीनाथ के.एस., डॉ. शिशिर शेट्टी, डॉ. गोविंद बाबू, डॉ. सचिन त्रिवेदी, डॉ. शैलेश व्ही. श्रीखंडे, डॉ. जगन्नाथ दीक्षित आणि डॉ. जगदीश कोठारी यांसारखे दिग्गज तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या अनुभवाचा फायदा उपस्थित प्रतिनिधींना नवीन संशोधन आणि उपचारांच्या पद्धती समजून घेण्यासाठी होईल.
डॉ. राज नगरकर म्हणाले की, “ASCO Direct GI Cancers Symposium नाशिकमध्ये आयोजित करणे ही भारत आणि आमच्या संस्थेसाठी अभिमानाची गोष्ट आहे. या कार्यक्रमामुळे भारतीय डॉक्टरांना जागतिक स्तरावरील सर्वोत्तम पद्धती आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल”. हा कार्यक्रम भारताच्या ऑन्कोलॉजी क्षेत्रात क्रांती घडवणारा ठरेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
एचपीव्ही लसीकरण सुरक्षित,अफवांवर विश्वास ठेऊ नये
पत्रकार परीषदेनिमित्त डॉ.राज नगरकर म्हणाले, सध्या एचपीव्ही लसीकरणाबाबत संभ्रम पसरविले जात आहेत. संशोधनातून या लसींचे शास्त्रोक्त फायदे समोर आलेले आहेत. त्यामुळे ही लस सुरक्षित असून, अफवांवर नागरिकांनी विश्वास न करण्याचे आवाहन त्यांनी केले. अमेरिकेसारख्या प्रगत देशाने साधारणतः विस वर्षांपूर्वी लसीकरण मोहिम राबविली होती. त्याचे सकारात्मक परीणाम आज दिसून येत आहेत. जागतिक आकडेवारीची तुलना केल्यास गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग आढळण्याचे प्रमाण भारतामध्ये सर्वाधिक आहे. किशोरवयीन मुलींना लसीकरणातून सुरक्षित केल्यास भविष्यात कर्करोगाचे प्रमाण घटण्यास मदत होईल.





