Nashik : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन आपल्या देशातील असामान्य बाल प्रतिभेला प्रेक्षकांसमोर आणणाऱ्या सुपरस्टार सिंगर या लहान मुलांच्या गायन रियालिटी शोची तिसरी आवृत्ती घेऊन येत आहे! देशातील होतकरू गायन प्रतिभेला राष्ट्रीय मंच प्रदान करून त्यांना आपली प्रतिभा जगासमोर सादर करण्याची संधी देणारा हा शो केवळ त्यांच्या प्रतिभेचे जतन करणार नाही, तर त्यांना मार्गदर्शन करून ‘संगीत के नए हुनर.. कल के धरोहर’ शोधून भारतीय संगीताचा वारसा देखील समृद्ध करणार आहे.
विविध संगीत प्रकारांत मुशाफरी करणाऱ्या बाल प्रतिभावंतांना सुपरस्टार सिंगर सीझन 3 मध्ये पवनदीप राजन, अरुणिता कांजीलाल, सलमान अली, मोहम्मद दानिश आणि सायली कांबळे हे पाच प्रसिद्ध गायक कॅप्टन म्हणून लाभणार आहेत. हे कॅप्टन स्पर्धक मुलांचे गानकौशल्य निखारतील आणि आपल्या अनुभवाचे बोल सांगून त्यांना मार्गदर्शन करतील. अलीकडच्या प्रोमोमध्ये आपण पाहिले आहे की, प्यारेलाल रामप्रसाद शर्मा, जावेद अख्तर आणि कविता कृष्णमूर्ती या भारतीय संगीत उद्योगात मोठे योगदान देणाऱ्या दिग्गजांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाची रंगत आणखीन वाढवणार आहे. या शोमध्ये विशेष अतिथी म्हणून हे दिग्गज त्यांनी कमावलेले संगीताचे ज्ञान या गायकांच्या नव्या पिढीला देतील आणि या भावी गायकांना प्रेरणा व प्रोत्साहन देखील देतील. यावेळी या शोमध्ये आणखी एक ट्विस्ट आहे. इंडियन पॉप क्षेत्रातील एक मोठी हस्ती सुपरस्टार सिंगर सीझन 3 मध्ये सुपर जज म्हणून काम करणार आहे, जी कॅप्टन आणि त्यांच्या होतकरू गायकांचे मूल्यांकन करून मार्गदर्शन करण्याचे काम करेल.
उगवत्या प्रतिभावंतांना उद्देशून अतिथी मार्गदर्शक जावेद अख्तर म्हणतो, “गायनाचा विचार केला, तर भारतात गान-प्रतिभा ठासून भरलेली आहे. आणि या शोमध्ये मी जी मुले पाहिली ती सगळीच माझ्यासाठी सुपरस्टार सिंगर आहेत. मी त्यांना इतकेच सांगेन की, ‘तुम्ही स्वतःचा मार्ग स्वतःच शोधायचा आहे. तुमच्यात मोठे बनण्यासाठी प्रचंड प्रतिभा आहे त्यामुळे कोणाच्याही पावलावर पाऊल टाकून चालण्याची तुम्हाला गरज नाही. हे देखील एक सत्य आहे की, जेव्हा काही तरी आत्मसात होते, तेव्हाच काही नवीन निर्माण होते. संगीताच्या बाबतीत हे चिरंतन सत्य आहे की, गायकाने सतत शिकत राहिले पाहिजे आणि रियाज देखील करायला पाहिजे. शिकण्याची प्रक्रिया कधीच थांबता कामा नये, त्यातूनच प्रतिभा अधिक बहरत जाते. एखाद्या प्रसिद्ध गायकाचे तुम्ही कौतुक करता, तेव्हा त्यामागची त्यांची साधना बऱ्याचदा आपल्याला दिसत नाही. मी त्या गायकांना त्यांची प्रतिभा पूर्णपणे बहरलेली असताना पाहिले आहे, अथक सराव करताना, आपल्या गुरूंकडून सतत शिकताना पाहिले आहे. त्यांनी कधीच स्वतःला परिपूर्ण मानले नाही. ते सदैव विनम्र विद्यार्थी राहिले. तसेच तुम्ही देखील आपले कौशल्य नित्य वाढवत रहा, आपली गायकी ओळखा आणि गायनात रममाण व्हा. शिकत रहा आणि मोठे होत रहा – ते तुमच्या सांगीतिक प्रवासासाठी महत्त्वाचे आहे.”
अतिथी मेंटर कविता कृष्णमूर्तीने या बाल गायकांकडून आपल्या अपेक्षा व्यक्त करताना म्हटले, “गायन म्हणजे भावना अभिव्यक्त करणे, सुर स्पष्ट आणि अचूक लावणे. मला आशा आहे की, ही मुले प्रत्येक सुर सजीव आणि भावपूर्ण पद्धतीने लावायला शिकतील. आजची मुले टेक्नॉलॉजीने घेरलेली आहेत. त्यांना सर्व प्रकारचे संगीत आणि संगीताच्या तंत्राचे ज्ञान सहज प्राप्य आहे. पण, यशासाठी इतकेच पुरेसे नाही. त्यासाठी निष्ठा आणि सराव यांची आवश्यकता असते. गायनात मोठे यश मिळवण्यासाठी आपल्या गुरूंचे आणि संगीत तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळवणे आणि सुजाणपणे रियाज करणे या महत्त्वाच्या पायऱ्या आहेत. तंत्रावर प्रभुत्व मिळवून आणि भावनांची अभव्यक्ती साधून आपले गायन जिवंत करणे सगळ्यात महत्त्वाचे आहे.”
http://प्रोमो येथे बघा: https://www.instagram.com/reel/C3S9i-XvikN/?igsh=NXA4anc2ODRrNnpw






