नाशिक- ब्रह्माकुमारीं संस्थेच्या मेडिकल विंग तर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाकडून स्वर्णिम भारताच्या दिशेने.. या प्रोजेक्ट अंतर्गत 4 फेब्रुवारी 2022 रोजी उपक्षेत्रिय संचालिका ब्रम्हाकुमारी . वासंती दीदीजी यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक कर्करोग दिन साजरा करण्यात आला. यावेळी कर्करोग निदान तज्ज्ञ डॉ.राजेश जावळे यांनी कर्करोग या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कर्करोग जनजागृती आणि प्रतिबंध या विषयावर बोलताना ते म्हणाले की, आपल्या जीवनशैलीत काही खबरदारी घेतल्यास आपण कर्करोगासारख्या घातक आजारापासून दूर राहू शकतो, कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे ओळखून कर्करोगाचे प्राथमिक अवस्थेत निदान करून आणि आधुनिक उपचार करून आपण कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजारापासून दूर राहू शकतो. कर्करोग पूर्णपणे बरा करू शकतो. राजयोग ध्यानाच्या नियमित सरावाने, आपण आपल्या जीवनातील कठीण परिस्थितीतही सकारात्मक आणि स्थिर राहून कोणत्याही रोगापासून बाहेर पडू शकतो असे प्रतिपादन डॉ. जावळे यांनी केले.
ब्रह्माकुमारी वासंती दीदी यांनी उपस्थितांना राजयोगाचे महत्व विशद करत राजयोगाद्वारे आपली जीवनशैली कशी प्रगत होते व जीवनातील ताण तणाव कसा नाहीसा होतो या विषयी सविस्तर माहिती सांगितली. सोबतच राजयोग मेडिटेशन द्वारे जीवन तणावमुक्त होते व मनुष्याच्या जीवनात सुख शांती प्रस्थापित होते, असेही दीदींनी याप्रसंगी नमूद केले.
या कार्यक्रमात बी.के. पूनम दीदी यांनी सूत्रसंचालन तर स्वागत बीके मंगल बहेन यांनी केले. या कार्यक्रमासाठी परिसरातील अनेक नागरिक तसेच संस्थेचे साधक मोठ्या उत्साहाने उपस्थित होते.




