स्वामी लीला
आपले स्वामी महाराज खूप मोठी शक्ती आहे.. हि अनंत कोटी ब्रम्हांडाला चालवीणारी शक्ती अक्कलकोटमध्ये सगुण रुपात प्रगट झाली होती.. असंख्य दु:खी पीडितांचा उद्धार हि शक्ती करत होती..
ह्यातच असेच एकदा एक मुका ब्राम्हण अक्कलकोट नगरीत आला.. स्वामींच्या सामर्थ्याचे त्याने गुणगान ऐकले.. स्वामींच्या कृपेने अशक्य हि शक्य होते.. हा विश्वास त्याच्या मनात जागृत झाला होता.. आणि ह्या विश्वासाने त्याने अक्कलकोट मध्ये स्वामी चरणी सेवा सुरु केली.. नित्य नेमाने स्वामींच्या दरबारात येई.. पडेल ती सेवा करी.. अक्कलकोट नगरीत स्वामी विविध लीलांच्या द्वारे असंख्य भक्तांचा उद्धार करत.. चुकलेल्यांना वाट दाखवत.. आणि मार्गदर्शन करत… ह्यातून तो मुका ब्राम्हण बोध घेत स्वतःला घडवत होता. स्वतःची भक्ती वाढवत होता.. स्वतःचा विश्वास वाढवत होता.. असे जवळ जवळ त्याने बारा वर्ष स्वामींची सेवा केली.. आता त्या ब्राम्हणाची सेवा फळाला येण्याची वेळ आली.. आणि तो दिवस उजडला… त्या दिवशी स्वामी आनंदात बसलेले होते.. मुका ब्राम्हण नेहमी प्रमाणे स्वामी सेवेसाठी दरबारात येतो.. स्वामींच्या समोर हात जोडून उभा राहून दर्शन घेत असतो.. तोच स्वामीनी आपल्या मुखातून तांबुल काढला आणि त्या मुक्या ब्राम्हणाच्या हातात दिला आणि बोलले “ हा विडा खा.. आणि आपले काम कर !! ”. स्वामी भक्त हो !! मुक्या ब्राम्हणाला खूप आनंद झाला.. त्याने स्वामींचा उष्टावलेला तांबुल खाल्ला आणि आश्चर्य झाले.. मुक्या ब्राम्हणास बोलायला येवू लागले.. त्याला वाचा फुटली.. स्वामींच्या ह्या अद्भुत सामर्थ्याचे सर्वांना आश्चर्य वाटले.. आणि सर्वांनी स्वामींच्या नामाचा जयजयकार केला..
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूतचिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!
स्वामी बोध
आजच्या स्वामी लीलेतून स्वामीं आपणास असंख्य बोध देत आहेत पैकी स्वामींवर अतूट विश्वास ठेवला असता अशक्य असे काहीच नाही हि प्रेरणा आपणास भेटते आहे… बघा ना !! त्या मुका ब्राम्हणाकडून स्वामीनी १२ वर्ष सेवा करवून घेतली.. त्यास भक्ती.. श्रद्धा.. निष्ठा ह्याचे शिक्षण दिले.. ह्यात त्याला पारंगत केले.. आणि मग त्यावर कृपा करून त्यास वाचा दिली.. आणि आपले काम कर असे सांगून १२ वर्षात जे जे तुला ज्ञान दिले ते मुक्त हस्ते वाट हि आज्ञा दिली.. अगदी तसेच आज आपण स्वामींची सेवा करत असतांना जीवनातील धेय्य साध्य करत असतांना असंख्य अडचणी येत असतात.. आपण बोलत असतो कि मी इतकी सेवा करतो मला अडचण का येते.. वा संकट का येत असतात.. खरतर त्या संकटातून स्वामी आपणास शिकवत असतात.. घडवत असतात.. आणि इतरांसाठी मार्गदर्शक असा अनुभवाचा खजाना तयार करवून घेत असतात.. स्वामी भक्त हो !! जेव्हा आपले काम होते त्या नंतर आपल्याला आलेला अनुभवांचा खजाना.. योग्य गरजू पात्र व्यक्तीस द्यायचे आहे.. त्या मध्ये स्वामी भक्तीची भावना दृढ करायची आहे.. वरील “ आपले काम कर ” ह्या स्वामी आज्ञेचे पालन करायचे आहे..
चला तर मग स्वामींना प्रार्थना करू या “ हे स्वामी राया.. मला माहित आहे कि ज्या क्षणी मी तुला माझे सर्वस्व अर्पण केले आहे.. त्या क्षणा पासुन माझ्या जीवनात दु:ख.. संकट येण्याचे बंद झाले आहे आणि हे समर्था !! जरीही दु:ख आलेच मला त्याची पर्वा नाही कारण मला ठावूक आहे कि ते संकट तूच मला घडविण्यासाठी दिले आहे.. आणि तू त्या संकटांना निमित्त करवून पुढील पिढीसाठी अनुभवांचा खजाना तयार करवून घेतो आहे.. हे आई !! तुला जे करायचे ते कर.. माझी काही एक हरकत नाही.. माझे फक्त एकच मागणे आहे कि मला तुझ्या चरणापासून दूर नको करू.. हे समर्था !! तू माझा पिता आहे.. तू माझी आई आहेस.. तू माझा गुरु आहेस.. मला प्रेरणा दे.. मला मार्गदर्शन कर..”
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूतचिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!
संदर्भ :- www.SwamiVaani.com






