स्वामी लीला
यशवंतराव महादेव भोसेकर हे अत्यंत सात्विक गृहस्थ होते.. ते सरकारी नोकरी करत होते.. एके दिवशी त्यांस स्वप्नात दृष्टांत झाला.. स्वप्नात त्यांस एका संन्यासाने पुजेस शालिग्राम दिला… आणि सांगितले कि “ तुला या शालीग्रामच्या योगाने प्रपंच आणि परमार्थ घडेल.. आणि जगात तुझी साधू पुरुष म्हणून कीर्ती गाजेल..!! ”.. असा आशीर्वाद देवून तो संन्यासी गुप्त झाले.. स्वप्नातील दृष्टांत बघून यशवंतराव जागे झाले.. आणि आश्चर्य म्हणजे बाजूला खरोखर शालिग्राम होता… त्यानंतर श्री यशवंतराव आनंदाने नाचुच लागले.. त्यानंतर ते शालिग्रामची नित्य पूजा करत.. अतिथी-अभ्यागतास भोजन घालीत.. हा त्यांचा नित्यक्रम बरेच दिवस सुरु होता.. हा नित्यक्रम सुरु असतांना पुन्हा त्यांस एके दिवशी स्वप्नात दृष्टांत झाला “ अक्कलकोटी जा आणि श्री स्वामी समर्थांचे दर्शन घे …!! ”. स्वप्नातील असा स्पष्ट दृष्टांत होताच श्री यशवंतराव हे अक्कलकोटी आले.. अक्कलकोटनगरीत आल्या नंतर स्वामी महाराज चोळप्पाच्या घरी असल्याचे समजले.. आणि तेथे जावून श्री यशवंतराव ह्यांनी स्वामींचे दर्शन घेतले.. स्वामीरायाची आजानुबाहू मूर्ती बघताच श्री यशवंतराव ह्यांस आपल्याला स्वप्नात उपदेश करणारी मुर्ती हीच आहे ह्याची खात्री पटली..आणि अतिशय विनम्र भावनेने स्वामींच्या समोर हात जोडून उभे राहिले.. इतक्यात स्वामींनी श्री यशवंतरावांकडे बघितले आणि बोलले “ शालिग्राम कोठे आहे..? ”. स्वामींची अशी वाणी होताच..श्री यशवंतरावंस आश्चर्य वाटले.. त्यांनी स्वामींना शालिग्राम दाखविला.. आणि सद्गदित अंत:करणाने स्वामींची स्तुती करू लागले… “ महाराज आपण पूर्ण दत्तावतार आहात.. मला आता पूर्ण अनुभवाने विश्वास बसला आहे..!! ”.दुसरे दिवशी श्री यशवंतराव ह्यांनी स्वामींची षोडचोपचार पूजा केली आणि पुन्हा घरी जाण्याची आज्ञा मागू लागले.. तेव्हा स्वामी पुन्हा बोलले कि “ जा.. ह्या जगात तुम्ही साधु होऊन सर्वांस मान्य व्हाल..!! ”. स्वामीचा दिव्य आशीर्वाद घेवून श्री यशवंतराव घरी आले.. स्वामीगुरुंची अनन्य भक्ती.. आणि ह्यातूनच त्यांचे निराभिमानी वागणे.. सर्वांभूती भगवतभाव अशा दिव्य गुणांनी युक्त असलेल्या जीवनाची अभिव्यक्ती झाली.. १८७०-७१ दरम्यान नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात भीषण दुष्काळ पडला. त्यावेळेस तेथे श्री यशवंतराव भोसेकर मामलेदार होते.. श्री यशवंतराव ह्यांस गोर गरिबांची करुणा आली आणि त्यांनी वरीष्ठांची कोणतीही पूर्व परवानगी न घेता सरकारी खजिन्यातून १ लाख २७ हजार रुपये नागरिकांना वाटले.. हे कृत्य करत असतांना त्यांना माहित होते कि आपली चौकशी झाल्या नंतर आपणास तुरुंगवास होऊ शकतो.. परंतु श्री गुरूंची जर कृपा असेल तर केसाला सुद्धा धक्का लागत नाही आणि असेच घडले…जेव्हा त्यांची चौकशी झाली तर चमत्कार झाला.. आणि खजान्यात १ लाख २७ हजार जसेच्या तसे भरले..! असो. स्वामी वाणी प्रमाणे ते सर्व विश्वात पूजनीय झाले.. त्यांस लोक “ प.पु. श्री देव मामलेदार ” बोलु लागले.. पुढे ११ डिसेंबर १८८७ मध्ये प.पु. श्री देवमामलेदार नाशिक क्षेत्री समाधिस्त झाले..
धन्य आहात स्वामी !! धन्य तुमचे अनन्य भक्त देव मामलेदार !! बोला !! अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूतचिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!
स्वामी बोध
आपले स्वामी महाराज हे ह्या विश्वाचे चालक मालक पालक आहेत.. मायेमुळे निर्माण झालेले मानवातील अज्ञान जावे.. तो अनन्य भक्तीने ओतप्रोत भरून जावा.. आणि आत्मनिर्भर होऊन.. पृथ्वीवरील त्याचे पात्र उत्कृष्ट निभावून त्याने ईश्वरीय गुणांची अभिव्यक्ती करावी.. ह्यासाठी हि परब्रम्ह माउली आपल्या बाळांसाठी प्रत्येक युगात अवतारित होत असते.. ह्या गुरुतत्वाने असंख्य शिष्य तयार केले.. त्यातील प.पु. श्री देवमामलेदार महाराज हे एक अलौकिक दिव्य शक्तीच म्हणावी.. प.पु. देवमामलेदारांची स्वामींच्या चरणी अनन्य भक्ती होती.. स्वामींची शिकवण त्यांनी तंतोतंत आचरणात आणली होती.. प.पु. देवमामलेदार ह्यांच्या आजच्या लीलेतून आपणास स्वामी भक्तीची प्रेरणा घ्यायची आहे.. आपण करत असलेले काम अतिशय प्रामाणिक आणि शुद्ध भावनेने करणे.. आपले प्रत्येक कर्म स्वामी सेवा म्हणून करणे हि प्रेरणा आपल्याला घ्यायची आहे.. चला तर मग आज आपण प.पु. देवमामलेदार ह्यांनांच विनंती करूया कि “ आपण स्वामी भक्तीचा अवतार आहात.. आपल्यातील एक कण इतकी जरी.. स्वामी भक्तीची आम्हावर कृपा झाली तर आमचे जीवन कृतकृत्य होईल.. कृपा करून आम्हावर स्वामी भक्तीची कृपा करा..!! ”
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूतचिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!






