स्वामी लीला
आपले स्वामी हे गुरुतत्व आहेत.. ते निर्गुण निराकार आहेत.. आणि आपल्याला हृदयातून सतत मार्गदर्शन करत आहेत.. असेच एकदा अक्कलकोट मध्ये पोस्ट–सुपरीटेडेंट बाबाजी सदोबा हे स्वामींच्या दर्शना साठी आले होते.. त्यांनी अक्कलकोट मध्ये जवळजवळ चार दिवस मुक्काम करून स्वामींच्या चरणी सेवा रुजू केली.. सुट्टी संपल्याने पुन्हा घरी जाण्यासाठी ते स्वामींची आज्ञा घेण्यासाठी येतात.. त्या वेळेला स्वामींची स्वारी स्वस्वरुपानंदात रममाण झालेली होती… बाबाजी सदोबा स्वामींच्या जवळ येतात.. हात जोडून स्वामींना प्रार्थना करतात कि, “ स्वामी मला जाण्यासाठी आज्ञा द्यावी..!! ”. बाबाजी सदोबांनी स्वामींना अशी प्रार्थना करताच
स्वामींनी त्यांच्याकडे बघितले आणि बोलले “ अरे, किधर जाता , बैठ !! ”. स्वामींनी असे बोलताच बाबाजी सदोबा थोडा वेळ शांत राहिले आणि त्यांनी पुन्हा जाण्यासाठी आज्ञा मागितली.. परंतु स्वामींनी काही त्यांस आज्ञा दिली नाही.. पुन्हा काही वेळ थांबून त्यांनी आज्ञा मागितली तेव्हा स्वामींनी त्यांच्या कडे बघितले आणि बोलले “ नदी किनारे पार रही !! ”. ह्या स्वामी वाणीचा अर्थ तेव्हा कोणालाच समजला नाही.. आणि बाबाजी सदोबा ह्यांनी असा विचार केला कि आपली सुट्टी संपलेली आहे.. आता इथे थांबण्यास काही अर्थ नाही.. तेव्हा त्यांनी स्वामींची दुरूनच दर्शन घेतले आणि नजर चुकवून कडपगाव स्टेशनवर आले.. येथे पोहोचताच असे
समजले कि जोरदार पाउस झाल्याने कृष्णेचा पूल वाहून गेला आहे.. आणि आगगाडी नदीच्या पलीकडेच राहिलेली होती.. स्वामी भक्त हो !! स्वामी वाणी होती ती.. ती सत्यच असणार… बाबजी सदोबा ह्यांना जवळ जवळ चार दिवस तेथे रखडावे लागले.. चार दिवसांनी पुल दुरुस्त केला.. आणि त्या नंतर बाबजी सदोबा हे आपल्या गावी गेले.. स्वामी आपणास जाण्याची आज्ञा का देत नव्हते ह्याची प्रचीती बाबजी सदोबा ह्यांना आली.. बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!
स्वामी बोध
स्वामी भक्त हो !! आजची स्वामी वाणी तर सर्व भक्तांसाठी तर गुरुआज्ञेचे महत्व सांगणारी आहे.. जेव्हा शिष्य श्री गुरुआज्ञेवर चालण्याचा निश्चय करतो तेव्हा त्याचे चंचल मन कसे त्यात अडथळा आणत असते.. अशा सर्व सूक्ष्म पैलूंवर आज स्वामी प्रकाश टाकत आहेत.. बघा ना.. जेव्हा बाबाजी सदोबा हे घरी जाण्याची आज्ञा मागतात.. आणि स्वामीं त्यांस आज्ञा देत नाही.. त्यानंतर बाबजी सदोबा ह्यांच्या मनाची बडबड सुरु होते कि, “ मला रजा नाही.. सुट्टी नाही.. मला जायलाच हवे.. वगैरे वगैरे ” आणि शेवटी बाबजी सदोबा स्वामींची आज्ञा न ऐकता.. ह्या चंचल मनाचे ऐकतात आणि स्वामींची नजर चुकवून जातात.. आणि त्या नंतर त्यांस जो अनुभव येतो तो वरील लीलेत आलेला आहे.. थोडक्यात आजच्या लीलेतून स्वामी आज आपणास आजच्या पिढी साठी आपल्याला हाच संदेश देत आहेत कि , आपल्याला आपल्या चंचल मनाला गुरु नाही बनवायचे.. आपल्याला
ह्याच्यावर विजय मिळवायचा आहे.. स्वामी भक्त हो !! जेव्हा आपले सर्व काही सुरळीत सुरु असते आणि अचानक आपल्या जीवनात दु:ख वा संकट येते अशावेळी खुशाल समजा कि, स्वामींनी आपणास काही काळ थांबण्याची आज्ञा दिली आहे.. ह्या काळात आपले नकारात्मक मन सतत बडबड करू लागेल.. ते सतत रडेल.. इतरांसोबत तुलना करेल.. वस्तुस्थितीचे कारण सांगून कधी कधी चुकीचा सुद्धा मार्ग निवडेल.. स्वामी भक्त हो !! त्यावेळी ह्या मनावर अनन्य भक्तीच्या आणि अतूट अभेद्य विश्वासाच्या शक्तीने विजय मिळवायचा आहे.. ह्याच काळात आपल्याला मनन चिंतन करायचे आहे.. आणि हा विवेक जागृत करायचा कि, ज्या अर्थी
स्वामींनी आपणास थांबण्याची आज्ञा दिली.. ह्याचा अर्थ आपला विकास अजून वेगाने व्हावा हि स्वामींची इच्छा आहे.. त्यासाठी आपण कुठे कमी पडतो आहे ह्याचे मनन चिंतन करायचे आहे.. आणि जे जे गुण आपल्यात कमी आहेत त्यावर काम करून पुन्हा नव्या जोमाने सुरुवात करायाची आहे.. बघा !! एकदा कि स्वामी हुकुम प्रमाणे आपण असे जीवन जगण्याची कला शिकलो तर प्रापंचिक सह आध्यात्मिक विकासाच होत जाईल.. सर्वोच्च विकास होत जाईल..!! चला तर आज आपण स्वामींना प्रार्थना करू या.. “ हे समर्था !! तुला माझी काळजी आहे.. मी विकासाच्या सर्वोच्च अवस्थेवर पोहोचवावे हि तुझी इच्छा आहे.. म्हणून तर कधी कधी तु
माझ्या जीवनात दु:ख वा संकट देतो.. पण हे गुरुमाउली !! ह्या काळात माझे चंचल मन खूप बडबड करते.. माझी तुला इतकीच विनंती आहे कि, मला अनन्य भक्ती ची शक्ती दे.. अतूट अभेद्य श्रद्धेची शक्ती दे.. ह्या शक्तीच्या बळाने मी माझ्या नकारात्मक मनावर विजय मिळवेन.. आणि तू जे जे कर्मसंकेत देतो आहेस.. तु जे जे हुकुम देतो आहेस.. त्या नुसार प्रमाणिक कर्म करेन आणि तुला अपेक्षित जीवनाची अभिव्यक्ती करेन..!! हे दत्तात्रया !! तू माझा गुरु आहेस.. मला मार्गदर्शन कर.. मला प्रेरणा दे..!! ”
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!






