स्वामी लीला
मुंबई – पुण्याचे स्वतःला सुधारक , प्रगत समजणारे दोन इसम स्वामींचा नाव लौकिक ऐकून अक्कलकोट मध्ये येतात.. चिकित्सक – छलक भाव मनात ठेवून ते रेल्वेने अक्कलकोट येथे येतात.. अक्कलकोट मध्ये आल्यानंतर ज्या ठिकाणी स्वामींची स्वारी होती तेथे हे दोघे येतात.. त्यावेळी स्वामींच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी उसळलेली होती.. परंतु त्या वेळेला एक आश्चर्य घडते.. स्वामी दिगंबर मूर्तीचे सर्वांना दर्शन होत असते.. परंतु ह्या दोघांना काही स्वामीचे दर्शन होत नव्हते.. सुधारकांसी झाला पश्चाताप ! म्हणती आड आले पाप !! प्रत्यक्ष समोर परमात्मा स्वरूप ! असुनि आम्हां दिसेना !! ( श्री गुरूलीलामृत अध्याय ४१,ओवी १६४). सर्वांना दिसणारा परमात्मा आपल्याला दिसत नाही.. हा प्रकार बघून त्या दोघांना मनोमन पश्चाताप होतो.. आणि ते मनोमन स्वामींची माफी मागू लागतात.. आणि व्याकुळतेने आळवू लागतात.. स्वामींना असे आळविल्या नंतर त्यांस स्वामीची मूर्ती दिसू लागते.. ते दोघे स्वामींचे दर्शन घेण्यसाठी जवळ येतात.. आज ह्या स्वामींचा पर्दाफाश करू आणि लागलीच माघारी फिरू ह्या दृष्ट आणि छलक बुद्धीने ते आलेले होते.. आणि म्हणून त्यांनी त्यांचे सामान स्टेशनवर लॉकर रूम मध्येच ठेवलेले होते… जेव्हा ते स्वामींच्या समोर येतात.. तेव्हा स्वामी त्यांच्याकडे बघतात आणि बोलतात “ काय रे !! सामान स्टेशनवरच ठेवून आलात का ? ”. स्वामींना आपला दृष्ट हेतू समजला आहे.. ह्याची जाणीव होताच त्या दोघांना खूपच लाजल्यासारखे झाले.. देहाभिमान झाला गलीत ! उदयासी पावले पूर्व सुकृत !! अंतरी होऊन सद्गदित ! वारंवार चरण नमिती !! ( श्री गुरूलीलामृत अध्याय ४१,ओवी १६८).
त्यानंतर त्यांनी स्वामींच्या समोर नाक घासुन माफी मागीतली आणि स्वामींना साष्टांग दंडवत घातला.. पुढे दुसरे दिवशी स्वामींचा प्रसाद आणि आशीर्वाद घेवून ते स्वस्थानी परत आले..
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!
स्वामी बोध
हा सर्व संसार स्वामींचा खेळ आहे.. ह्यात प्रत्येक व्यक्ती एक विशिष्ट पात्र निभावत आहे.. आणि प्रत्येक पात्राचे एक धेय्य आहे.. हे धेय्य साध्य करत असतांना आपल्यावर सतत कृपा होत असते.. पद.. प्रतिष्ठा.. पैसा.. ज्ञान आदी आपल्या जीवनात येत असते.. पण कधी कधी आपले मन ह्यातच अडकून जाते आणि आपल्याला आपल्या मूळ धेय्याचा विसर पडतो.. आजच्या स्वामी लीलेतून स्वामी पुन्हा आपल्याला आपल्या मूळ धेय्याची आठवण करवून देत आहेत.. जसे आजच्या स्वामी लीलेत स्वामींच्या अतर्क्य लीला ऐकून.. दोन इसम दृष्ट बुद्धीने.. स्वतःच्या ज्ञानाचे श्रेष्ठत्व मिरवण्याच्या उद्देशाने आलेले होते… खरतर त्यांच्यावर जी ज्ञानाची कृपा झालेली आहे त्याचा मूळ उद्देश असा कि लोकांचे अज्ञान दूर करून त्यांना सज्ञान करणे… ह्यातूनच समाजात लोकांच्या भावनांचा फायदा घेवून समाजातील प्रत्येक स्तरावरील भोंदूगिरी मिरवणारे असंख्य ढोंगी लोकांचा पर्दाफाश करणे.. आणि लोकांना सत्यासाठी प्रेरित करणे .. पण हे सर्व करत असतांना ते मूळ उद्देशापासून भरकटतात.. असो. ह्या सह आजच्या लीलेत हे दोघे जेव्हा स्वामींच्या दर्शनासाठी आले तेव्हा त्या दोघांनाच स्वामी दिसत नव्हते.. ह्यातून स्वामींना हाच संकेत द्यायचा आहे कि जेव्हा आपणास सत्याचे दर्शन घडत नाही.. हृदयात अशांती असते.. ह्याचा अर्थ आपण मूळ उद्देशा पासून भरकटलेलो आहे.. अशा वेळेला स्वतःला “ तुम्ही सामान स्टेशनवर ठेवून आलात का ? ” म्हणजेच तुम्ही तुमचा मूळ शुद्ध उद्देश विसरला आहात का ?.. ह्या स्वामी वाणी ची आठवण करवुन द्यायची आहे…
स्वामी भक्त हो !! आज आपणास आजच्या पिढी साठी स्वामी हाच संदेश देत आहेत कि, “ आपल्याला आपले सामान स्टेशनवर ठेवायचे नाही.. आपण करत असलेले प्रत्येक कर्म हे आपल्या धेय्याच्याच दिशेने होत आहे का ह्याचे सतत परीक्षण करत रहायचे आहे.. हे होत असतांना आपल्या जीवनात भरपूर कृपा होत राहील.. पद.. प्रतिष्ठा पैसा येईल.. ज्ञान येईल पण ह्याचा पोकळ अहंकार आपल्या मनात ठेवायचा नाही.. आपले मूळ उद्देश विसरायचे नाही.. जेव्हा आपल्याला हृदयात अशांतीचा भाव येईल.. अभक्तीचा भाव येईल.. तेव्हा खुशाल समजायचे कि आपणास स्वामी दिसत नाही.. आपण स्वामींच्या पासून दूर गेलो आहे.. तेव्हा आपण करत असलेले कर्म वा त्या मागील भाव तपासून बघायचा आहे.. आणि पुन्हा हृदयात भक्तीच्या भावनेने आपले प्रत्येक कर्म करत… धेय्य साध्य करायचे आहे.. मग आपण नोकरदार असाल.. विद्यार्थी.. गृहिणी.. वा व्यावसायिक.. आपले पात्र उत्कृत्ष्ट निभवायाचे आहे..” चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करू या “हे गुरुराया !! तु मला ह्या जीवनाच्या रंगमंचावर एक विशिष्ट मला पात्र दिले आहेस… हे पात्र उत्कृष्ट व्हावे म्हणून माझ्या जीवनात पद.. प्रतिष्ठा.. पैसा.. ज्ञान आदी गोष्टींची कृपा करतो आहेस.. पण हे समर्था !! हि कृपा होत असतांना माझे मन ह्या मायेत अडकण्याची शक्यता आहे.. माझ्यात अहंकार निर्माण होण्याची शक्यता आहे.. म्हणून माझ्यावर तुझ्या अनन्य भक्तीची कृपा कर.. माझा विवेक जागृत ठेव.. माझ्या धेय्या पासून मला दूर नको जावू देवू.. प्रत्येक कर्म तुझी सेवा म्हणून उत्कृष्ट करवून घे..!! हे श्री स्वामी समर्था..!! तु माझा गुरु आहेस.. मला प्रेरणा दे.. मला मार्गदर्शन कर..!! ”
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!
संदर्भ :- www.SwamiVaani.com






