स्वामी लीला
आपले स्वामी निर्गुण निराकार परमचैतन्य आहे.. अक्कलकोट मध्ये विविध लीला करून स्वामी महाराज ह्याची समज नेहमी आपल्या भक्तांना देत.. असेच एके दिवशी गणपतराव जोशी ह्यांचे घरी स्वामी महाराजांची स्वारी आली.. संध्याकाळची वेळ होती.. सोबत चोळप्पा आणि गोविंदराव टोळ हे सुद्धा होते.. आज रात्री स्वामींचा मुक्काम इथेच असल्यामुळे चोळप्पाने स्वामींना झोपण्यासाठी अंथरून वैगरे तयारी पूर्ण केली.. त्यानंतर स्वामी महाराज रात्री उठून कोठे जातात कि काय.. आदी गोष्टीवर आपण नजर ठेवावी असेही चोळप्पाने श्री गोविंदरावास सांगितले.. आणि आपल्या घरी परत आले.. आता रात्र झाली.. स्वामी महाराज अंथरूनावर पहुडले.. आणि बघता बघता स्वामींना गाढ झोप लागली.. ते इतके गाढ झोपेत गेले कि अक्षरशः घोरायला लागले.. श्री गोविंदराव हे जागेच होते.. स्वामींचे घोरणे बघून त्यांस जरा विस्मय वाटला आणि ते मनातल्या मनात विचार करू लागले कि, स्वामी महाराज तर महान योगी आहेत आणि हे तर सर्वसामन्य माणसांसारखे घोरत आहेत.. आणि त्यानंतर त्यांना श्री भगवत गीतेतील श्लोक आठवला..
या निशा सर्वभूतानां , तस्यां जागर्ति संयमी ! यस्यां जाग्रती भूतानी , सा निशा पश्यतो मुने:!!
( सर्व भूतमात्राची जी रात्र असते ती आत्मसंयमी लोकांची जागृतीची वेळ असते.. आणि सर्व जीवांची जी जागृतीची वेळ असते ती ह्या मुनिंची रात्र असते.. )
श्री गोविंदरावांनी मनातल्या मनात असे बोलताच , स्वामी झोपेतच जोराने खाकरले आणि मोठ्याने बोलले “ क्यो, सोनार नही , नही !! ” आणि असे बोलून महाराज पुन्हा मोठ मोठ्याने घोरू लागले.. स्वामी महाराज श्री गोविंदरावास ‘सोनार ’ म्हणून हाक मारीत.. स्वामीभक्त हो ! स्वामींचे हे अंत:क्षीत्वाचे बोलणे ऐकताच टोळ ह्यांच्या मनातील शंका दूर झाली.. स्वामी तर परमचैतन्य हे जागृती आणि निद्रेच्या पलीकडील अवस्था आहे.. हि समज त्यांना प्राप्त झाली.. त्यांनी मनोमन स्वामींची माफी मागितली .. !! आणि स्वामींच्या निर्गुण निराकार चैतन्य स्वरूप अस्तित्वाबद्दलची श्रद्धा त्यांच्या मनात अधिक दृढ झाली !!
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!
स्वामी बोध
आजची स्वामी लीला तर स्वामींच्या नित्य चैतन्य जागृत अस्तित्वाची समज देणारी आहे.. इतकेच नव्हे तर “ आम्ही झोपलेलो नाही.. आम्ही परमचैतन्य आहोत.. आम्ही जागृती आणि निद्रेच्या पलीकडे आहे..” हा स्पष्ट संदेश स्वामी आपणास देत आहेत.. ह्या सह आजच्या लीलेमध्ये, स्वामींनी झोपेत घोरत असतांना गोविंदरावांच्या मनातले ओळखून त्यांस झोपेतच “ क्यो, सोनार नही , नही !! ” असा जो प्रतिसाद दिला.. ह्यातून स्वामी आज आपणास आजच्या पिढीसाठी आपल्या भक्तांना हि समज देत आहेत किंबहुना खूप मोठा आधार देत आहे कि, “ बाळांनो, मी सर्वव्यापी चैतन्य आहे.. जरीही आज मी तुम्हाला शरीराने दिसत नसलो.. तरीही मी सदैव जागृत आहे.. मला तुमच्या मनातील सर्व समजत आहे… तुम्ही नि:शंक रहा .. निर्भय रहा.. तुमची प्रत्येक प्रार्थना मी ऐकत आहे.. आणि त्याला प्रतिसाद सुद्धा देत आहे.. हम गया नही जिंदा है !! ”
चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करू या “ हे, परमचैतन्य, निर्गुण, निराकार, परात्पर, परब्रम्ह श्री स्वामी समर्था !! तु असीम अनंत शक्ती आहे.. तुला सुरुवात नाही, तुला मध्य नाही आणि तुला शेवटही नाही.. तु तर आमच्या बुद्धीच्या पलीकडे आहेस.. हे आई !! तु दिसत नसली तरीही माझी प्रत्येक प्रार्थना तु ऐकते आहेस.. मला प्रतिसाद देते आहेस..मला मार्गदर्शन करते आहेस.. आणि सतत “ हम गया नही जिंदा है !! ” ह्याची प्रचीती देते आहेस..!! हे गुरुराया !! आमच्याकडून तुला अपेक्षित असलेली भक्ती होत नाही.. तरी सुद्धा तु आम्हा बाळांवर इतके प्रेम करतोस.. आम्हाला इतके जपतोस.. तुला अनंत कोटी धन्यवाद.. तुला अनंत कोटी धन्यवाद !! ”
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!





