|| स्वामी लीला ||
अक्कलकोट नगरीत प्रत्यक्ष परब्रम्ह अवतरले होते.. स्वामींच्या वास्तव्याने अक्कलकोटनगरी पुनीत झाली होती.. अक्कलकोट म्हणजे स्वामी गुरूंचे प्रशिक्षण केंद्रच.. स्वामी महाराज प्रत्यक्ष कृतीद्वारे शिकवत.. अक्कलकोट दरबारात सेवा रुजू करत असणाऱ्या सेवेक-यां मध्ये समजा कधी भांडणे झाली तर.. स्वामी महाराज त्यांना मुंगी हातात घेऊन दाखवत.. म्हणजेच मुंगी होऊन साखर खा असा संदेश देत.. आणि जे जे स्वामींचे हे उपदेश समजत आचरणात आणत त्यांचे निश्चितच कल्याण होत.. असेच एकदा सुंदराबाई आणि भूजंगाचे कडाक्याचे भांडण झाले.. भांडण इतके जोराचे होते कि.. सुंदराबाई रागारागाने विहिरीवर जीव देण्यास निघाली.. आणि तेथे पाण्यात पाय सोडून रडत बसली.. स्वामी भक्त हो !! सुंदराबाई स्वभावाने कशीहि असू दे.. पण स्वामींच्यासाठी ते लेकरू होते.. स्वामींना तिची दया आली.. आणि एक दोन सेवेक-यांना तिला घेण्यासाठी पाठवले.. परंतु ती काही येई ना.. शेवटी दयाघन स्वामी स्वतः तिला घेण्यासाठी आले.. आणि स्वामींनी तिला हाताला धरून आणले.. दरबारात आल्या नंतर सुंदराबाई रडूच लागली आणि स्वामींना बोलू लागली कि, “स्वामी !! वाण्याने ब्राम्हणास वाटेल तश्या शिव्या द्याव्या काय ? आणि स्वामींच्या दरबारात न्याय- अन्याय काही नाही का !! ”.. सुंदरबाई असे बोलत असतांना स्वामी महाराज मोठ मोठ्याने हसू लागले.. आणि बोलले “ अगं !! भिंतीला खुंट्या कोनाडे काय थोडे असतात का ? अगदी तसेच आपल्या देहाला सर्व अवयव आहेत.. मला सांग कि त्याने कोणत्या अवयवाला शिव्या दिल्या..!!” स्वामींनी असे बोलताच सुंदरबाईला अजूनच राग आला.. स्वामी भक्त हो !! हि स्वामी वाणी होती.. सुंदराबाईने ह्यातील स्वामींचा उपदेश समजावून घेतला असता तर भविष्यात तिचा शेवट नक्कीच चांगला झाला असता..
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!
|| स्वामी बोध ||
आजच्या लीलेतून स्वामी महाराज आपणास आपण खरे कोण आहोत ? हे जाणून घेवून.. हि समज दृढ करून.. आपण जे खरे आहोत हा विवेक जागृत ठेवून… तसे जीवन जगण्याचा हुकुमच देत आहेत.. आणि सुंदरबाईचे रडणे.. जीव देण्याचा प्रयत्न.. हे सर्व चंचल मनाची लक्षणे असून.. आपणास चंचल मनाच्या वेगवेगळ्या नाटकांचा परिचय करवून देत आहेत.. बघा ना !! जेव्हा सुंदराबाईला भुजंगा अपशब्द बोलतो.. आणि सुंदराबाई स्वामींकडे तक्रार करते.. तेव्हा स्वामींनी भुजंगास काहीही न बोलता.. उलटपक्षी सुंदराबाईस बोलतात कि “ अगं !! भिंतीला खुंट्या कोनाडे काय थोडे असतात का ? अगदी तसेच आपल्या देहाला सर्व अवयव आहेत.. मला सांग कि त्याने कोणत्या अवयवाला शिव्या दिल्या..!!” म्हणजेच स्वामी तिला अगदी स्पष्ट पणे सांगत आहेत कि.. तु शरीर नाहीस.. तु माझाच अंश आहेस.. तु माझेच बाळ आहेस.. हे शरीर तर आपल्याला स्वामी भक्तीच्या अभिव्यक्तीसाठी दिलेले यंत्र आहे.. जसे भिंतीला खुंट्या-कोनाडे असतात.. तसे ह्या मानव शरीर यंत्राचे सुद्धा विविध भाग आहेत.. ज्यांना आपण इंद्रिय म्हणतो.. आणि ह्या इंद्रियांचे आपले स्वतःचे विश्व आहे.. जसे डोळ्यांना दृश्याचे विश्व आहे.. कानांना आवाजाचे विश्व आहे.. जिभेला चवीचे विश्व आहे.. वगैरे वगैरे आणि आपण ह्या विश्वात इतके रममान होतो कि, आपले मूळस्वरूप विसरून जावून… ह्या शरीरालाच ‘मी’ समजून चालतो.. ह्या शरीराला “मी” समजणे.. आणि सभोवतालच्या निसर्ग.. ब्रम्हांड ह्या पासून स्वतःला वेगळे समजणे.. हि खोटी समज बाळगणे हाच मूळ अहंकार आहे.. आणि जिथे अहंकार असतो.. तिथे दु:खच असते.. आजच्या लीलेतून स्वामींनी आपल्या मूळ अहंकारावर काम करण्याचाच हुकुम दिला आहे असे समजा.. स्वामी भक्त हो !! आजच्या भाषेत उदाहरण द्यायचे झाले तर जसे आपल्या अंगावरील शर्टवर जेव्हा काळा डाग पडतो.. तेव्हा आपणास कोणी बोलते कि , “अरे !! तुझ्या ह्या शर्टवर काळा डाग आहे…!! ” स्वामी भक्त हो !! आता सांगा.. “शर्ट वर डाग आहे” असे त्याने असे बोलताच आपल्याला दु:ख होईल का …? उत्तर आहे.. नाही !! आपल्याला दु:ख नाही होणार.. कारण काळा डाग हा तर शर्टवर आहे.. आपल्यावर नाही..!! आणि हि समज ठेवून आपण चांगले दिसावे म्हणून त्या शर्ट वरील काळा डाग धुवून टाकू.. वा तसा प्रयत्न करू.. स्वामी भक्त हो !! अगदी तसेच आपण स्वामींचे बाळ आहोत.. अंश आहोत.. हेच आपले मूळ स्वरूप आहे.. आणि परमशांती.. अनन्य भक्ती.. अतूट अभेद्य विश्वास.. साहस.. आनंद.. कृतज्ञता.. क्षमा.. हा आपला मूळ स्वभाव आहे..!!. आणि जेव्हा आपणास कोणी अपशब्द बोलत असतील.. वा इतर काहीही बोलत असतील.. तेव्हा आपण स्वतःला चंचल मन समजून वागतो.. जसे सुंदराबाईने जीव देण्याचा.. रडण्याची कृती केली अगदी तसे वागणाऱ्या ह्या आपल्या चंचल मनाचे गुलाम होतो.. आणि आपला मूळ स्वभाव विसरून.. आपण दु:खी होतो.. स्वामी भक्त हो !! जीवनात जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा खुशाल समजा कि , सर्व प्रथम स्वामी आपल्याला हाच संकेत देत आहेत कि तु तुझ्या मूळ स्वभावापासून दूर गेला आहेस.. स्वामी आपल्याला अंतर्मुख होऊन आपल्या मनातील विचारांचे.. स्वभावाचे परीक्षण करण्याचा हुकुम देत आहे.. आणि आपल्याला वर्तमान घटना जशीच्या तशी स्वीकार करून.. निसर्ग नियमानुसार आपल्याच विचारांनी आपण ती घटना आकर्षित केलेले असते.. अशी जबाबदारी घेवून.. समर्थांची इच्छा म्हणून घडणाऱ्या घटनेला “YES” बोलायचे आहे.. आणि आपल्यातील नकारात्मक मनावर कार्य करून.. त्याला स्वामींचा गुलाम बनवून.. हे चंचल मन स्थिर शुद्ध करायचे आहे.. आणि हाच स्वामी हुकुम आहे असे समजून कार्य करायचे आहे.. खरतर !! सुंदराबाईला स्वामींनी हाच उपदेश दिला होता कि, “ सुंदराबाई, तु माझेच बाळ आहेस.. तुझ्या मनातील नकारात्मक अहंकारी विचारांचे आत्मपरीक्षण कर !! आणि त्यात बदल कर.. भुजंगासोबत जे भांडण झाले.. हे तुझ्या अहंकारी स्वभावामुळे आकर्षित केले होते..” स्वामी भक्त हो !! सुंदरबाईने इतका तरी स्वामी उपदेश आचरणात आणला असता तर नक्कीच अनन्य भक्तांच्या यादीत ती आपल्यासाठी अनन्य भक्तीची प्रेरणाच असती..!! असो. अर्थात सुंदराबाई ह्या पात्राचे सुद्धा आपण धन्यवाद देवू.. कारण आजही ती आपल्या मनात असलेल्या नकारात्मक.. अहंकारी विचारांचे.. मनाचे प्रतिनिधित्व करते आहे.. थोडक्यात अक्कलकोट मध्ये स्वामींच्या लीला ह्या अतर्क्य होत्या.. तेथील सर्वच पात्र आपल्याला प्रेरणाच देत आहेत.. कोणीही वाईट नाही.. प्रत्येक पात्र आपआपला अभिनय उत्तम प्रकारे निभावत होते.. चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करू या.. “हे समर्था !! मी तुझाच बाळ आहे हि समज दृढ कर.. मी तुझाच अंश आहे हि समज दृढ कर.. मला माझ्या मूळ स्वभावावर.. शांतीवर.. अनन्य भक्तीवर स्थिर कर.. आणि ह्या शरीराला निमित्त करून तुझ्याच शुद्ध अनन्य भक्तीच्या साम्राज्याचा विस्तार कर.. हे स्वामी आई !! कर्ता करविता तूच आहेस.. शेवटी जशी तुझी इच्छा !! ”
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!
संदर्भ :- www.SwamiVaani.com






