|| स्वामी लीला ||
नाना जोशी म्हणून नगरचे एक ज्योतिषी होते.. ते अतिशय चिकित्सक बुद्धीचे होते.. त्यांनी स्वामीसुतांच्या अनन्य भक्ती बद्दल ऐकले होते.. स्वामीनी त्यास आपले पुत्र मानले आहे असे पण समजले होते.. जसे स्वामी समोरील भक्तांच्या मनातील ओळखायचे तसे स्वामी सुत पण चमत्कार करतात असे नाना जोशी ऐकून होते.. पण त्यांना काही विश्वास बसत नव्हता.. असेच काही कामा निमित्त नाना जोशी मुंबईत येतात…स्वामी सुत तर इथेच कामाठीपुऱ्यात राहतात असे त्यांना समजते.. तो नाना जोशी स्वामी सुतांस भेटण्यासाठी मठात येतात.. त्या वेळेला स्वामी सुत डोळे बंद करून स्वामी भजनात दंग होते… स्वामी नाम मोठे ! अन्य सर्व खोटे !! स्मरलीया कोठे भय नाही !! करा याचा जप ! नका करू तप !! काही नसे खप साधनांचा !! आणि नांना जोशी पण स्वामिसुतांच्या रसाळ भजनात क्षणभर दंग होऊन जातात.. देहभान हरपून जातात.. भजन संपताच स्वामी सुत डोळे उघडतात आणि लागलीच समोर नाना जोशींकडे बघून बोलतात “ अहो… नगरचे नाना जोशी तुम्हीच आहात ना !! ” . स्वामी सुतानी असे बोलताच.. नाना जोशींना आश्चर्य वाटते .. कारण नाना जोशी आणि स्वामीसुतांची ती पहिली भेट होती… ह्यांना माझे नाव कसे समजले… नाना जोशींना स्वामीसुतांच्या अधिकाराची खात्री पडते… स्वामीसुत कोणी साधेसुधे नसून स्वामींच्या पूर्ण कृपेस पात्र झालेले आहेत.. असा त्याचा विश्वास दृढ होतो.. आणि ते स्वामीसुतांचे चरण पकडतात.. पुढे स्वामीसुत त्यांस स्वामींची पत्रिका बनविण्यास सांगतात.. त्यासाठीची सर्व माहिती स्वामीसुत त्यास पुरवतात… आणि त्या प्रमाणे नांना जोशी समर्थांची पत्रिका बनवून आणतात.. स्वामीसूतांना पत्रिका आवडते आणि ते नानांना असे सांगतात कि तुम्ही अक्कलकोट येथे जावून स्वामी चरणी अर्पण करा… नाना अक्कलकोट मध्ये येतात स्वामी चरणी पत्रिका अर्पण करतात.. तेव्हा स्वामी बोलतात “ अरे बघतात काय !! ढोल वाजवा !! ताशा वाजवा !! नगारा वाजवा !! ” आणि नानाच्या उजव्या हातावर टाळी देतात.. स्वामी भक्त हो !! स्वामीनी टाळी देताच नानाजींच्या हातावर विष्णुपद उमटले… स्वामीनी त्यास प्रसाद दिला.. स्वामीनी आत्मलिंग दिले… हे आत्मलिंग नानाजींच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या हातावर होते.. थोडक्यात स्वामींनी चैत्र शु.२ हा आपला प्रकट दिन आहे ह्यास अनुमोदन दिले.. असे समजून स्वमिसुतांनी चैत्र शु.२ शके १७९३ (इ.स.१८७१) मध्ये प्रथम अक्कलकोट येथे स्वामी प्रकट दिन साजरा केला.. त्या दिवशी स्वामी सूतांनी डोक्यावर भगर.. खजुराची टोपली घेवून फराळ अतिशय आनंदाने घरोघरी वाटले.. हा प्रकार बघून तेथील काही सेवेकरी थट्टा करू लागले.. निंदा टवाळी करू लागले.. आणि स्वामींना विचारू लागले कि “ स्वामी… स्वामीसुत काय करत आहे ?” तो स्वामीनी त्यास उत्तर दिले “ अरे !! चंदुलाल आमच्या लग्नाचा उत्सव साजरा करत आहे…!! ” आणि अत्यानंदित होऊन ज्या प्रमाणे स्वामीसुत अभंग बोलत त्या प्रमाणे स्वामी सर्वास कृती करवून दाखवत.. स्वामी सुत सांगत स्वामी आठ वर्षाच्या बालक मुर्तीच्या रुपात प्रगट झाले आणि विजयसिंग नावाच्या भक्ता सोबत गोट्या खेळत.. तो स्वामी त्यास गोट्या खेळण्याची कृती करवून दाखवत.. दिवसभर स्वामी जयंतीचा उत्सव उत्साहात साजरा झाला.. शेकडो लोक जमलेले होते.. स्वमिसुतांनी त्यांच्या भजनाने सर्वांना मंत्रमुग्ध केले होते..!! स्वामी भक्त हो !! थोडक्यात वरील लीला करून स्वामी असे संकेत देत कि जे जे स्वामिसुत बोलतो आहे ते सत्य आहे.. आणि त्या प्रमाणेच घडलेले आहे.. असो. स्वामी प्रकटी करणा बद्दल असंख्य तर्क वितर्क लावले गेले होते पण वरील लीलेतून स्वामीनी सर्व खुंटून काढले आणि चैत्र शु. २ लाच आपण सगुण रुपात प्रगट झालो ह्यावर शिक्कमोर्तब केला..!!!
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!
|| स्वामी बोध ||
आज स्वामी जयंती आहे.. स्वामींचा प्रकट दिन आहे.. जेव्हा पहिल्यांदा स्वामी जयंती अक्कलकोट मध्ये साजरी झाली तर स्वामीनी त्यास “लग्नाच उत्सव” म्हटलेले आहे.. जेव्हा दोन गोष्टी एकत्र येतात तेथे “लग्न” हा शब्द प्रयोग केला जातो.. स्वामी तर निराकार आहेत.. निर्गुण आहेत.. परमशांतीची असीम अखंड अवस्था आहे.. ज्याला आपण शिव अवस्था असे सुद्धा म्हणतो.. आणि जेव्हा हा सृष्टीचा खेळ सुरु झाला तेव्हा ह्या निर्गुण निराकाराने शक्तीरूप धारण केले.. उर्जेची निर्मिती झाली.. खरतर उर्जा हि निर्गुणाचे सगुण स्वरूप आहे.. आणि हि उर्जा वेगवेगळ्या तरंगावर(frequency) प्रक्षेपित झाली.. जसे आपणास दिसणारे हे ग्रह.. तारे.. झाडे.. पशु.. पक्षी.. हे सर्व अनंतकोटी ब्रम्हांड… ह्या असीम अखंड निर्गुण निराकाराचे सगुण स्वरूप आहे.. इतकेच नव्हे तर मानवशरीर सुद्धा सगुण स्वरूप आहे.. स्वामी भक्त हो !! छेली नावाच्या खेडे गावात ८ वर्षाच्या बालक मूर्तीच्या रुपात स्वामी महाराज प्रगट झाले.. म्हणजेच निर्गुण निराकार अखंड अस्तित्व स्वरूप ‘शिवाचा’.. ह्या आजानुबाहू मानवीशरीरारुपी ‘शक्ती’ सोबत.. पूर्णयोग झाला.. आणि पूर्णपरब्रम्ह…. !! श्री स्वामी समर्थ !! महाराजांचा पूर्णावतार झाला.. स्वामी भक्त हो !! आपण ह्या स्वामी शिव-शक्तीचे बाळे आहोत.. आणि ह्या आपल्या मूळस्वरूपाची आठवण करवून देण्यासाठी.. हि स्वामी माउली आपल्यासाठी प्रगट झाली.. आणि हाच संकेत देण्याच्या उद्देशाने स्वामीनी “ हा आमच्या लग्नाचा उत्सव आहे “ असा शब्द प्रयोग केला.. स्वामी भक्त हो !! स्वामी परब्रम्ह आहे.. ते अतर्क्य आहे… त्यांच्या समोर आपली बुद्धी खुंटते… आम्ही तर मूढ आहोत.. खरतर आमची पात्रता नाही स्वामी लीलेंचे वर्णन करण्याची.. तरीही स्वामी आमच्या सारख्या अपात्रा शरीराकडून सेवा करवून घेत आहे ह्याचेच ऋण आम्ही फेडू नाही शकणार.. आज तर इतकीच प्रार्थना येत आहेत कि , “ हे परमपित्या.. तूच राम होतोस.. तूच कृष्ण आणि आजच्या दिवशी आम्हा बालकांसाठी पुन्हा सगुण स्वरूप धारण केलेस.. श्री स्वामी समर्थ झालास.. आम्हा सर्वांचा उद्धार केला.. तुला अनंत कोटी धन्यवाद !! तुला अनंत कोटी धन्यवाद !! तुला अनंत कोटी धन्यवाद !!”
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!






