तैसें माझिये भक्तीविण | जळो तें जियालेपण | अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काईं || पैं हिंवराची दाट साउली | सज्जनीं जैसी वाळिली | तैसीं पुण्यें डावलनि गेलीं | अभक्तांतें || निंब निंबोळियां मोडोनि आला | तरी तो
काउळियांसीचि सुकाळु जाहला | तैसा भाक्तिहीनु वाढिन्नला दोषांचिलागीं || कां षड्रस खापरीं वाढिले | वाढूनि चोहटां ठेविले | ते सुणियांचेचि ऐसे झाले जियापरी || तैसें भक्तिहीनाचें जिणें | जो स्वप्नींहि परि सुकृत नेणे |
संसारदु:खासि आवंतणें वोगरिलें || म्हणोनि कुळ उत्तम नोहावें | जाती अंत्यजही व्हावें | वरि देहाचेनि नांवे पशूचेंहि लाभो || पाहें पां सावजें हातिरुं धरिलें | तेणं तया काकुळती मातें स्मरिलें | कीं तयाचें पशुत्व वावो जाहलें
| पावलिया मातें ||
अर्थात – वरील ओवीमध्ये ज्ञानेश्वर माउली भक्तिहीन पुण्या विषयी वर्णन करीत आहे. एखादे पुण्य करतांना जर त्यात भक्तिचा रस नसेल तर ते कसे निष्फळ असते याबाबत विविध दाखल्यांचे उदाहरण देउन
समजावण्याचा प्रयत्न करत आहे. हिंवर झाडाची सावली कितीही दाट असली तरी ती त्या झाडाच्या विषारी गुणधर्मामुळे किंवा विषमय असल्यामुळे शहाणे माणसे त्याखाली उभे राहणे टाळतात तसेच भक्तिहीन अर्थात पुण्य करतांना त्यात जर परमेश्वरा विषयी प्रेम नसेल, भक्ती नसेल, लळा नसेल तर असे मिळावलेले पुण्य मनुष्याच्या काहीच कामाचे नसते.कडुनिंबाच्या झाडाला कितीही निंबोळया आल्या तरी त्यात फायदा कावळयाचाच होते त्याचप्रमाणे भक्तिशून्य माणूस कितीही मोठा झाला अथवा वयाने वाढला तरी त्याच्या पुण्यात वाढ होत नाही . एखादे पंचपक्कावन अन्न एखादया खापरात घातले आणि ते रात्रीमध्ये एखादया चौकात नेउन टाकले ते त्याचे काही सात्विक पुण्य लाभते असे नाही कारण त्याचा फायदा श्वानाला होतो. अशी अवस्था भक्तिहीन मनुष्याची असते, अशा पदध्तीने मिळविलेले पुण्याचा फायदा त्याला स्वप्नातही होत नाही अथवा कळत नाही.त्याच्या वाटयाला हया जगात अशा वेळी नेहमी दु:खच मांडलेले असतात.
माउली सांगतात की व्यक्तिचे निच्च कुळात जन्माला येणे असू दया किंवा निच्च जातीचा असू दया किंवा त्याला पशूचा देह मिळालेला असू दया परंतु तो जर माझी मनपुर्वक भक्ति करीत असेल तर तो माझा प्रियच
असतो. तो पुण्यवान बनण्याचा भागीदारी असतो. जसे एखादया तळयाच्या ठिकाणी हत्तीचा पाय मगरीने ओढण्याचा प्रयत्न करावा तेव्हा हत्तीने काकुळतीस येउन माझा धावा करावा (परमेश्वराचा) तेव्हा त्याला संकटातून सोडविण्याची जबाबदारी (परमेश्वराचा) माझीच असते. भलेही तो पशु योनीतील असला तरी त्याचा उध्दार करण्याची जबाबदारी (परमेश्वराचा) माझी आहे. भलेही तो क्षुद्र किंवा निम्म कुळातील असो.






