|| स्वामी लीला ||
स्वामी वाणी भाग १४ मध्ये आपण बघितले कि , गोविंदरावांस स्वामी कशा पद्धतीने “तुझी भक्ती परिपक्व कर.. तुझी सेवा वाढव !! आम्हाला भक्तीत कच्चेपणा चालत नाही ” अशी स्वामी वाणी बोध देवून.. कृतीशील भक्तीचा धडा शिकवतात.. पुढे अक्कलकोट मध्ये काही दिवस राहून गोविंदराव मुंबईला परत येतात.. मुंबईत आल्यानंतर श्री गोविंदरावांनी तीर्थयात्रे बद्दल मौदेचा कार्यक्रम करतात.. तेथे त्यांची भेट श्री लक्ष्मण विनायक पंडित ह्यांच्या सोबत होती.. अक्कलकोट मध्ये कनोजा ब्राम्ह्नास आलेल्या अनुभवाची ते तोंड भरून कौतुक करतात.. स्वामींच्या लीलांचे गुणगान गातात.. श्री गोविंदरावांनी स्वामी लीलेचे वर्णन केल्या नंतर श्री लक्ष्मण विनायक पंडित हे भारवून जातात.. लक्ष्मण पंडितांना गवताच्या व्यापारात कर्ज झालेले होते.. माझे कर्ज आठ दिवसात फिटले तर स्वामी चरणांचा दास होईल असा नवस ते मनोमन करतात.. त्यावेळी श्री गोविंदराव त्यांस बोलतात कि, अहो.. तुमचे कार्य निश्चित होईल.. फक्त मनात विकल्प आणू नका.. तुमच्यावर स्वामी कृपा नक्की होईल.. नि:शंक होऊन स्वामींवर विश्वास ठेवा..!! पंडितांनी असा नवस केल्या नंतर आता पहिला दिवस गेला.. त्या मागे दुसरा दिवस गेला.. असे बोलता बोलता सात दिवस झाले.. परंतु कर्ज फिटण्याचे काही संकेत दिसत नव्हते.. आठव्या दिवशी पंडितांचे दोन मित्र श्री हरिभाऊ आणि गजानन श्रीधर क्षत्री त्यांना भेटण्यासाठी येतात.. त्यांचा अफूचा / तंबाखूचा व्यापर असतो.. त्या व्यापारात त्या दोघांना तोटा आलेला असतो.. तेव्हा ते दोघेही पंडितांना विनंती करतात कि, कृपया आपण पेढीवर जावून आमच्या पैशाबद्दल हमीपत्र घ्या.. तीन दिवसांत कर्ज व तोटा भरून देवू असे हमीपत्र घ्या.. अन्यथा आमचे दिवाळे निघेल..आणि नोकरी सुद्धा जाईल.. हरिभाऊ म्युन्सिपालटीत नोकरीला होते.. पंडितांस त्यांची करुणा येते.. आणि ते हमीपत्र तयार करतात.. आणि त्याच वेळेला पंडित हे श्री हरिभाऊ आणि गजानन ह्यांना श्री गोविंदराव ह्यांनी अक्कलकोट स्वामींच्या लिलांबद्दल आणि कनोजी ब्राम्हणास आलेले अनुभव सांगतात.. इतकेच नव्हे तर आपण सुद्धा स्वामींना नवस केला आहे असे सांगतात.. श्री हरिभाऊ आणि श्री गजानन ह्यांना सुद्धा स्वामी लीला ऐकून आश्चर्य वाटते.. पण स्वामी भक्त हो !! आजचा आठवा दिवस असतो श्री पंडितांना कर्ज फिटण्याचे कोणतेच लक्षण दिसत नव्हते.. परंतु स्वामी महाराज आई आहे.. तिला आपल्या बाळच्या मनातील सर्व समजत असते.. कलियुगातील स्वामी सुत ह्या अनन्य भक्ती अवताराची तिला सुरुवात करायची होती आणि त्यासाठी हा नवस निमित्त ठरणार होता.. आणि पुढे आश्चर्य घडले.. आठव्या दिवशी संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास अफूचा भाव वाढतो.. आणि पंडितांच्या नावावर दोन हजार रुपयांचा नफा जमा होतो.. हि सुवार्ता समजताच हरिभाऊ-गजानन आणि पंडित ह्यांचा आनंद गगनात मावत नव्हता.. स्वामींनी आपले ऐकले.. स्वामींनी आपल्या नवसाचे फळ दिले.. ह्या आनंदाने ते नाचुच लागले म्हणा.. पुढे ठरविल्या प्रमाणे नफ्याचे पैसे घेवून ते अक्कलकोट येथे येतात.. स्वामींच्या वास्तव्याने पुनीत झालेली अक्कलकोट नगरी बघून ते धन्य होतात.. त्या दिवशी स्वामीरायची स्वारी चोळप्पांच्या घरी असलेल्या चोपाळ्यावर बसलेली होती.. हे तिघेही तेथे येतात.. स्वामींचे आजानुबाहू रूप तेजस्वी बघून तिघांचे डोळे दिपतात.. ते अतिशय नम्र पणे स्वामींच्या समोर हात जोडून उभे राहतात.. तेव्हा स्वामी महाराज मोठमोठ्याने हसायला लागतात आणि बोलतात.. “ काय म्हणता..!! व्यापार केला.. तोटा आला.. मला नवस केला.. आणि आता दोन हजाराचा नफा झाला !! ”. आणि असे बोलून स्वामी पुन्हा मोठ मोठ्याने हसायला लागतात.. स्वामींचे हे अंत:साक्षित्वाचे बोलणे ऐकून तिघांनाही आश्चर्य वाटते.. स्वामींच्या बद्दलचे अनन्य प्रेम.. अनन्य भक्ती… आणि स्वामींच्या सामर्थ्याबद्दलचा अतूट अभेद्य विश्वास दृढ होतो.. स्वामी भक्त हो !! पुढे हरिभाऊ कसे स्वामींचे अनन्य भक्त बनतात.. स्वामीसुत होतात हे आपण पुढील स्वामी वाणीत श्रवण करू या !!
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!
|| स्वामी बोध ||
आजची लीला खरोखर खूप प्रेरणादाई आहे.. आजच्या स्वामी वाणीतून श्री हरिभाऊ ते स्वामीसुत ह्या जीवन प्रवासाची सुरुवात कशी झाली.. आणि ह्या सर्व घटना कशा जुळवून आल्या.. आणि ह्यातूनच स्वामी महाराज ह्या अनंत कोटी ब्रम्हांडाचा खेळ कसा चालवतात.. प्रत्येकाचे जीवन दिव्यनियोजन – master plan प्रमाणे सुरु आहेत.. किवा अजून सोप्या भाषेत सांगायचे झाले तर आपण सर्व कसे एकमेकांना जोडलेलो आहोत.. आणि आपण कसे आपले जीवन निर्माण करत असतो ह्याची उच्चतम समज दिलेली आहे.. ह्या सह स्वामी आज आपणास अजून एक समज देत आहेत कि, स्वामी कृपा होण्यास कधीच विलंब होत नसतो.. कधीही कोणत्या क्षणी स्वामी कृपा होऊ शकते.. आपल्या मात्र आपले प्रामाणिक कर्म करत रहायचे आहे.. बघा !! बघा श्री गोविंदराव.. (स्वामी वाणी १४ –स्वामी वाणी संग्रह वाचवा) हे तीर्थयात्रेला जातात.. तेथून अक्कलकोट.. तेथील कनोजा ब्राम्ह्नास अनुभव येतो.. त्या नंतर ते मुंबईला येतात.. निमित्ताने श्री पंडितांस भेटतात.. श्री पंडित नवस करतात.. सात दिवस उलटून जातात.. कर्ज फिटण्याचे काहीही संकेत दिसत नाही.. आठव्या दिवशी हरिभाऊ आणि गजानन हे भेटतात.. उलट पंडित त्यांच्या नावाचे हमीपत्र घेतात.. आणि आठव्या दिवशी संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास अफूचा भाव वाढतो.. आणि पंडितांसह हरिभाऊ आणि गजानन कर्ज मुक्त होतात आणि अक्कलकोट येथे येतात तेव्हा स्वामी बोलतात.. कि , “ काय म्हणता..!! व्यापार केला.. तोटा आला.. मला नवस केला.. आणि आता दोन हजाराचा नफा झाला !! ”. स्वामी भक्त हो !! हे सर्व ह्यासाठी सांगावेसे वाटते कि, आजही आपल्या बाबतीत असेच घडते आहे.. स्वामींना प्रत्येकाचे जीवन खूप छान बनवायचे आहे.. प्रत्येकाचे कौटुंबिक.. सामाजिक.. सह वैश्विक जीवनातील पात्र उच्चतम दिशेने घेवून जायचे आहे.. पण हे सर्व करतांना आपण सर्व जोडलेलो आहोत ह्याचे भान ठेवायचे आहे.. जेव्हा आपण हे भान ठेवत नाही.. स्वतःलाच वेगळे मानू लागतो.. हाच मूळ अहंकार.. जसे आपल्या घरात वीजेचा प्रवाह अखंडित रहाण्यासाठी आपल्यामध्ये आणि वीजनिर्मितीच्या कारखान्यामध्ये विजेचे खांब आणि त्यातील तारांचे कनेक्शन निमित्त बनते.. त्यात थोडीही गडबड झाली तर वीज पुरवठा खंडित होतो.. अगदी तसेच आपल्याला आपला अहंकार सोडून सर्वांच्या सोबत प्रेमाची – विश्वासाची नाती ठेवायची आहे.. ह्याने आपण कृपेच्या स्त्रोता सोबत जोडलेले असतो.. आणि ह्या लोकांना निमित्त करूनच स्वामी कृपा आपल्या पर्यंत पोहचत असते.. बघा !! श्री पंडित , हरिभाऊ आणि गजानन ह्यांच्यात प्रेमाची नाती नसती तर नक्कीच पुढील इतिहास बदलला असता.. म्हणून आपल्याला सर्वांच्या सोबत चांगली नाती ठेवायची आहे.. तुम्ही म्हणाल कि समोरील व्यक्तीच माझ्या सोबत नकारात्मक वागते.. तेव्हा त्यांचे सोडा पण आपल्या कडून आपल्याला सकारात्मकच प्रतिसाद द्यायचा आहे.. आपण चूक करायची नाही.. आणि ह्या बरोबर समोरील व्यक्तीच्या ह्या वागण्याबद्दल आपल्याला स्वामीकडे तिच्या वतीने माफी मागायची आहे.. त्या व्यक्तीला सद्बुद्धी द्या हि प्रार्थना करायची आहे.. स्वामी भक्त हो !! बघा !! ह्या मुळे स्वामींना आपल्याला जे द्यायचे आहे ते देण्यास विलंब होणार नाही..!! स्वामी कृपेचा सतत अनुभव येईल.. आपण सतत विकासाच्या वरच्या पायरीवर चढत जाऊ.. चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करू या “ हे समर्था !! अरे चराचरात तूच आहेस.. आम्ही सर्व तुलाच जोडलेलो आहे.. तूच एका हाताने देतोस तर दुसऱ्या हाताने घेणारा हि तूच आहेस.. हि सर्व तुझीच लीला आहे.. हे परमचैतन्या !! तुझ्या ह्या अखंड असिमतेच्या अनुभवावर मला स्थिर कर.. प्रत्येक कर्म करतांना मला ह्या समज ची आठवण असू दे.. !!”
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!






