|| स्वामी लीला ||
स्वामी महाराज मंगळवेढ्याहून शके १७७५ च्या श्रावण महिन्यात पंढरपूर येथे पुन्हा आले.. त्यावेळेला चंद्रभागेला महापूर आलेला होता.. ह्या महापुराचे विलोभनीय दृश्य स्वामी महाराज ऐलतीरावर उभे राहून एकटक लावून पहात होते.. त्यावेळेला तेथून जवळच असलेले काही नावाडी नावेने.. लोकांना पलीकडच्या तीरावर नेत होते.. तेव्हा स्वामींनी त्यातील एका नावाड्याला विचारले कि , “ तुम्ही मला पलीकडच्या तीरावर न्याल का ? ” अनंतकोटी ब्रम्हांडातील समस्त जीवांच्या जीवनाची नौका चालविणा-याला ओळखण्याचे सुद्धा पुण्य लागते.. आणि ह्या नावाड्याकडे ते कदाचित कमीच होते.. आणि म्हणून त्याने स्वामींना उत्तर दिले कि, “ पलीकडे नेण्याचे दोन रुपये लागतील..!! ” त्यावर स्वामी बोलले “ अरे, मी संन्यासी आहे.. माझ्याकडे कसले पैसे..!! तुम्ही जसे इतरांना नेत आहात.. तसे मला सुद्धा घेवून जा !! ” त्यावर त्या नावाड्याने नकार दिला आणि लोकांना सोडण्यासाठी पैलतीरावर गेला.. आणि पुन्हा त्यांना सोडून माघारी आला.. माघारी आल्यानंतर स्वामींनी त्याला पुन्हा विचारले “ अरे.. मला पैलतीरावर नेले तर बरे होईल.. !! ” तेव्हा त्याने “नाही ” म्हणून उत्तर दिले.. आता तो नकार देत आहे.. असे स्वामींच्या लक्षात येताच स्वामी त्याला बोलले “ आता तु मला नेत नाही.. म्हणजे मला आता ह्या पाण्यातूनच जावे लागणार !! हे पाणी किती खोल आहे मला जरा सांगशील का ? ” तेव्हा तो कुत्सितपणाने हसत बोलला “ पाणी गुडघ्या इतके खोल आहे !! ” आणि नाव घेवून निघू लागला.. स्वामी भक्त हो !! त्याचे हे उत्तर ऐकून स्वामी गालातल्या गालात हसले.. आणि महापुराच्या पाण्यावरून अगदी सहज चालू लागले.. चालत चालत.. सहजपणे पलीकडच्या तीरावर पोहोचले.. स्वामी भक्त हो !! स्वामींचा हा चमत्कार बघताच त्या नावड्याची काय मन:स्थिती झाली असेल ह्याचा विचार करा.. त्याने घाई घाईने आपली नाव पलीकडच्या तीरावर नेली.. आणि धावत जावुन एकदम स्वामींचे चरण घट्ट पकडले… आणि नाक घासून माफी मागू लागला.. आणि पश्चाताप वाणीने बोलु लागला कि, “ ह्या यतिच्या रुपात प्रत्यक्ष परमेश्वरच आपल्या नौकेत बसू इच्छित होता.. पण पैशाच्या लोभाने.. आपण त्यांच्या सेवेची संधी दवडली..!! ” स्वामी तेव्हा हसू लागले.. स्वामी भक्त हो !! त्यावेळी हि स्वामींची लीला अनेक लोकांनी बघितली.. त्यांच्या सुद्धा मनात स्वामींच्या विषयी अनन्य भक्तीची भावना जागृत झाली आणि ते पुष्कळ स्वामींची स्तुती करू लागले.. दिसती संन्याशी वेषे नर ! परी हे साक्षात परमेश्वर !! हेची पांडुरंग रुक्मिणीवर ! नसे अंतर निश्चये !! (गुरुलीलामृत अ.१८ ओवी ३३ ) त्या नंतर अनेक लोकांनी स्वामींचे दर्शन घेतले.. स्वामींची पूजा अर्चा केली.. त्यावेळी पंढरपुरात प्रत्यक्ष पांडुरंगाचे दर्शन झाल्याचा आनंद प्रत्येकाच्या डोळ्यात दिसत होता..
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!
|| बोध ||
आजच्या लीलेतून स्वामी आपणास निष्काम कर्माची शिकवण देत आहेत.. बघा !! आजच्या लीलेत नावाडी हा त्याचे नावाड्याचे पात्र निभावत असतांना खरोखर इतर लोकांच्या उपयोगी येत होता.. चंद्रभागेला आलेल्या महापुरातून लोकांना पलीकडे नेण्यास निमित्त होत होता.. परंतु हे होत असतांना त्याला भेटलेली शक्ती वा नौकेने लोकांना पलीकडे नेण्याची कला-कौशल्य-क्षमता हे आपल्याला स्त्रोताचे वरदान आहे.. हि जाणीव तो विसरला आणि अहंकारी होऊन फक्त पैशासाठीच तो नावाड्याचे पात्र करत होता.. खरतर स्वामींनी त्याला पैलतीरावर जाण्याचे विचारून.. पैसे नसल्याचे सांगून.. नावाड्याने लोभातून बाहेर येवून.. निष्काम कर्म करण्याची आठवण देत होते.. परंतु हे त्याच्या लक्षात आले नाही.. शेवटी स्वामींनी पाण्यावरून चालत जावुन.. अहंकार सोड.. कारण तुझ्या जीवनाची नाव चालविणारा खरा नावाडी.. खरा स्त्रोत.. खरा कर्ता करविता.. हाच ह्या महापुरात ‘नौका’ चालवतो आहे.. तुझे शरीर निमित्त आहे.. हि समज दिली.. स्वामी भक्त हो !! आज आपणास आजच्या धावपळीच्या पिढीसाठी तर आजची लीला खूपच मार्गदर्शक आहे.. आज प्रत्येकात काही तरी गुण कौशल्य आहेत.. प्रत्येकाला स्वामींनी वरदान दिलेले आहे.. आजच्या लीलेतून प्रेरणा घेता.. जर कोणी अडलेला असेल.. त्याच्याकडे पर्यायच नाही.. अशा वेळेला स्वामींनीच त्याला आपल्याकडे पाठवले आहे हि समज ठेवून.. निष्काम भावनेने आपले कला-गुण-कौशल्य वापरून त्याला मदत करायची आहे.. अर्थात हे सर्व करतांना सामान्य बुद्धीचा वापर नक्कीच करायचा आहे.. आपण मदत कोणाला करतो आहे ?.. त्याला खरोखर गरज आहे का ? कि आपण मदत करून त्याच्यातील आळस.. लोभ.. मद्यपान वगैरे चुकीच्या सवयींना प्रेरणा देतो आहे.. ह्याचे भान ठेवायचे आहे… असो. थोडक्यात आजच्या लीलेतून आपल्याला निष्काम कर्माची प्रेरणा घ्यायची आहे.. चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करू या “ हे समर्था !! ह्या जीवनात मला भेटलेल्या कला.. गुण.. कौशल्य.. ह्या सर्व शक्ती म्हणजे तुझेच वरदान आहे.. ह्याचा उपयोग करूनच मी माझे दैनदिन उपजीविकेचे कर्म करत असतो.. परंतु हे सर्व करत असतांना.. खरा कर्ता मीच आहे हा भास होऊ शकतो.. माझ्या मनाला अहंकार होऊ शकतो.. हे आई !! आमची इतकीच प्रार्थना आहे कि, ह्या सर्व शक्ती स्र्तोतातुनच.. परमशांतीतुनच.. तुझ्यातुनच.. माझ्या मनात जागृत होत आहे.. ह्याची सतत जाणीव राहू दे.. मला सतत निष्काम कर्माची प्रेरणा दे !! हे गुरुआई !! तु सोडून मला कोणीच नाही.. तु माझा गुरु आहेस.. मला मार्गदर्शन कर.. मला प्रेरणा दे !! ”







