का केली दाजींबानी स्वामी महाराजाची स्तृती?
|| स्वामी लीला ||
मालोजी राजे ह्यांचे एक स्नेही पिराजी भोसले.. हे मुंबईत रहात होते.. त्यांना दाजीबा बोलत.. स्वामी चरणांवर त्यांची अनन्य भक्ती होती.. एके दिवशी त्यांना स्वामी चरणाची ओढ लागली.. पण आपण आहोत मुंबईत.. आणि स्वामी महाराज अक्कलकोट मध्ये.. आता इतक्या दूर स्वामींचे दर्शन कसे शक्य म्हणून ते आपल्या काहीतरी चुकीच्या पूर्वकर्मामुळेच स्वामींच्या चरणापासून दुरावलो.. असा स्वतःलाच दोष देवु लागले.. आणि ज्या दिवशी स्वामींचे दर्शन होईल तोच आपल्यासाठी सुदिन असेल अशी मनोमन बोलु लागले.. स्वामी भक्त हो !! आता दाजीबांना स्वामी चरणाची खूपच ओढ लागली.. त्यांना अन्नपाणी गोड लागत नव्हते.. त्यांचे मन सतत स्वामी चरणांचा धावा करत होते.. दाजीबांची हि भाववृत्ती त्यांच्या मित्रांसह त्यांच्या सेवकांना सर्वांना दिसत होती.. असो. एके दिवशी दाजीबा आंघोळीला गेले.. तेव्हा त्यांच्या सेवकाने पुजेची सर्व तयारी केली.. देवांच्या पूजेसाठी असेलेला पाट मांडून ठेवला.. तितक्यात एक आश्चर्य घडले.. अनंत कोटी ब्रम्हांडाचा चालक मालक पालक.. स्वामी महाराज प्रत्यक्ष रुपात तेथे आले.. आणि देवांच्यासाठी मांडलेल्या पाटावर जावून बसले.. स्वामींचे झालेले आगमन बघुन सेवकाला खूपच आनंद झाला.. आणि त्याने दाजिबांना आवाज दिला.. आणि तेही लागलीच आले.. स्वामी भक्त हो !! स्वामी महाराजांची प्रत्यक्ष मूर्ती बघताच दाजीबांची काय हालत झाली असेल ह्याची आपणा सर्वांना कल्पना आलीच असेल.. त्यांनी तात्काळ स्वामींचे चरण घट्ट पकडले.. भक्तीच्या अश्रूंनी स्वामी चरणांचा अभिषेकच केला म्हणा.. आणि स्वामीरायाची पुष्कळ स्तुती केली.. अनन्य भावे करिती प्रार्थना ! मज पातक्यासी करुणाघना ! अपराध न गणुनी जनार्दना ! दिधले दर्शन दासासी !! ‘पतितपावन’ नाम आपुले ! ब्रीद समर्था सत्यत्वे सांभाळले ! दर्शन देवून सुफलित केले ! माझे पूर्ण मनोरथ !! बहुत जन्माची फळली सुकृते ! म्हणुनी कृपासागर श्रीभगवंते ! हितकर दर्शन देवून मुढाते ! जड पामराते उद्धारिले !! – गुरूलीलामृत (अ.१६ ओ.१०५-१०६-१०७) अशी दाजीबानी पुष्कळ स्तुती केली.. तेव्हा स्वामींनी त्यांच्या डोक्यावर हात फिरवला आणि बोलले.. “ तु माझा अनन्य भक्त आहेस.. तुझ्या सद्गुणाचे मोल नाही.. तु निरहंकारी होऊन मला शरण आलास.. हि तुझी शरणागती आणि माझ्या चरणी असलेले प्रेम बघुन मला राहवले नाही.. म्हणूनच तुझ्या भेटीस आलो.. तुला ब्रम्हानंद स्वरूप मोक्ष प्राप्त होईल.. या पुढे सर्वांभूती नम्र रहा.. निरपेक्ष रहा.. शांतचित्त रहा.. मी नेहमी तुझ्या बरोबर आहे..!! ” स्वामी भक्त हो !! स्वामींची हि वाणी होताच दाजीबा खूप कृतकृत्य झाले.. त्यानंतर त्यांनी स्वामींना प्रेमाने जेवू घातले.. पूजा केली.. आणि स्वामींचा जयजयकार केला..!!
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!
|| बोध ||आजच्या लीलेचा बोध तर आगदी स्पष्ट आहे.. आपणास स्वामी कृपा ग्रहण करायची असेल… तर ह्या साठी भक्ताची पात्रता काय हवी.. त्याच्यात कोणते गुण हवेत ह्याची स्पष्ट समज स्वामी आपणास देत आहेत.. स्वामी भक्त हो !! आपल्या स्वामींना फक्त दोनच गुण हवे आहेत.. एक म्हणजे ‘अनन्य प्रेम म्हणजेच भक्ती’ आणि दुसरा म्हणजे ‘अतूट अभेद्य श्रद्धा..’ जेव्हा हे दोन गुण आपल्यामध्ये येतात.. तेव्हा आपले मन समर्पित होते.. निरहंकारी बनते.. आता जी स्वामी इच्छा तीच माझी इच्छा ह्या अनन्य समर्पणाच्या भावनेत जगते.. हि समर्पणाची भावना म्हणजे खूप मोठी शक्ती आहे.. हि सकारात्मक भावना आहे.. ह्या भावनेत स्वामींनी माझे उज्ज्वल भविष्य निर्माण केलेले आहे.. हि आशा आहे.. हा अतूट अभेद्य विश्वास आहे..!! म्हणून आजच्या लीलेतून आज आपणास पिढीसाठी स्वामी बोध देताना सांगत आहेत कि, आज आपली स्वामी कृपेची व्याख्या काहीही असू दे.. मग आपली एखादी साधी समस्या असू दे.. वा आपल्याला आत्मसाक्षात्कार हवा असेल.. आज जी पण आपली स्वामी कृपेची व्याख्या आहे.. ती बरोबरच आहे.. पण ती कृपा ग्रहण करायची असेल तर आपल्याला ग्रहणशील बनावे लागेल.. आणि त्यासाठी अनन्य भक्ती आणि अतूट अभेद्य श्रद्धा नावाचे गुण धारण करावे लागतील.. ह्या गुणांनी आपण निरहंकारी होतो… आणि मनाच्या काचेवर बसलेली धूळ दूर होऊन पलीकडील परमशांतीचे.. सतचितआनंदाचे.. म्हणजेच स्वामींचे दर्शन होते.. आणि स्वामी जे जे काही हुकुम देतात.. विचार देतात.. हे स्पष्ट समजते.. आणि आपल्याकडून योग्य दिशेने योग्य कर्म होतात आणि स्वामी कृपा होते.. आपली समस्या सहज विलीन होते.. दूर होते.. चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करू या “ हे गुरुनाथा !! माझ्या मनाच्या काचेवर अनेक जन्मांपासून विविध संस्कारांची.. मान्यातांची.. धूळ साचलेली आहे.. ह्या मुळे तुझे दर्शन घडत नाही.. मन सदैव अशांत राहते.. हे परब्रम्हा !! तुझी अनन्य भक्ती दे.. !! ह्या भक्तीच्या शक्तीने.. मन समर्पित होईल.. निरहंकारी होईल.. मनाची काच स्वच्छ होऊन.. पलीकडील.. तुझ्या असीम अनंत परमशांत सतचितआनंद स्वरूपाचे दर्शन होईल.. हे आई !! हे तुच करू शकतोस.. म्हणून मला मार्गदर्शन कर.. मला प्रेरणा दे !! ”
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!






