नाशिक : गणेशोत्सव हा श्रद्धा आणि परंपरेचा उत्सव आहे. याच श्रद्धेला पर्यावरण संवर्धनाची जोड देत WOW – Women of Wisdom यांच्या माध्यमातून यावर्षी ‘आरंभ – एक गणपती परंपरेचा’ हा पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात येत आहे.
पारंपरिक गणेशोत्सवाला शाश्वत पर्याय म्हणून धातूच्या गणपती मूर्तीचा प्रसार करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. गणपतीची मूर्ती जपून ठेवणे आणि दरवर्षी जलाशयातील विसर्जन टाळणे, या संकल्पनेतून जलप्रदूषण कमी करण्यास तसेच जलचर जीवांचे संरक्षण करण्यास हातभार लागतो.
या उपक्रमामुळे मूर्तींची विसर्जनानंतर होणारी विटंबना टाळण्यास, तसेच घरच्या घरी सांकेतिक विसर्जनामुळे ज्येष्ठ नागरिकांची धावपळ कमी करण्यास मदत होत आहे. त्याचबरोबर पुढील पिढीमध्ये श्रद्धेसोबत पर्यावरण संवर्धनाचे संस्कार रुजविण्याचाही प्रयत्न केला जात आहे.
आतापर्यंत ४,४०० गणेशमूर्तींचे जलाशयातील विसर्जन टाळण्यास या उपक्रमातून हातभार लागला आहे. नागरिकांनी ‘आरंभ’मध्ये सहभागी होऊन धातूची गणेशमूर्ती स्वीकारावी आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन WOW – Women of Wisdom यांच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी WOW च्या संस्थापिका अश्विनी न्याहारकर, अध्यक्षा विभावरी खोत, उपाध्यक्ष उज्ज्वला बोधले, मनीषा आहेर, पायल शहा, अंकिता न्याहरकर ,श्रीदेवी जाधव, करुणा बगाडे, नीलिमा चुंबळे, प्रियंका ओक, अर्चना बोथरा, राजेश्वरी नायडू, हर्षा पत्की, रेखा देवरे, रेखा म्हस्के, सपना बुटे, सपना धनवटे, माधुरी कोतवाल, शुभांगी कोठुळे, मंजू सिंग, चंदनताई, भावना भदाणे व सर्व प्रतिनिधी उपस्थित होत्या.






