आपले स्वामी बोलतात…“ अरे श्रीपाद..! आता तु आमच्या जवळच राहा.. आमची सेवा कर.. ह्यातच तुझे कल्याण आहे..!! ”
| स्वामी लीला ||
अक्कलकोट मधील स्वामी दरबारात अनेक सेवेकरी स्वामी नियोजना प्रमाणे योग्यवेळी सेवेत दाखील होत होते.. ह्यातच जमखिंड जवळील गोटेगावात अनंत भट म्हणून एक यजुर्वेदी ब्राम्हण रहात होते.. त्यांना सात मुले होती.. त्यातील एकाचे नाव श्रीपाद.. श्रीपाद अत्यंत सदाचारी होते.. एके दिवशी श्रीपाद अक्कलकोट मध्ये स्वामींच्या दर्शनासाठी आले.. त्यांच्या हातात हार- श्रीफळ होते.. स्वामींची आजानुबाहू तेजस्वी मूर्ती बघुन त्यांचे डोळे क्षणभर दिपलेच म्हणा.. त्यानंतर त्यांनी हार – श्रीफळ स्वामी चरणी वाहून स्वामींचे दर्शन घेतले.. आणि हात जोडून उभे राहिले.. इतक्यात स्वामींनी त्यांच्याकडे बघितले आणि बोलले “ अरे श्रीपाद..! आता तु आमच्या जवळच राहा.. आमची सेवा कर.. ह्यातच तुझे कल्याण आहे..!! ” स्वामींनी असे बोलताच श्रीपाद भट ह्यांस खूप आनंद झाला.. प्रत्यक्ष परब्रम्हाची सेवा भेटली आहे हा आनंद त्यांच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होता.. स्वामी आज्ञे प्रमाणे त्या नंतर श्रीपाद स्वामी दरबारात राहू लागले.. स्वामींची सर्व सेवा मनोभावे करू लागले.. जिथे स्वामी जातील तेथे स्वामींची सर्व व्यवस्था ते करून ठेवत.. स्वामी महाराज सुद्धा श्रीपाद भटांची अधून मधून परीक्षा बघत.. सर्वांच्या समोर कधी कधी शिव्या देत.. त्याचा अपमान सुद्धा करत.. परंतु श्रीपाद भट ह्यांना स्वामी महाराज हे पूर्णपरब्रम्ह आहेत ह्याची समज होती.. आणि ह्या मुळे त्यांची स्वामींच्या चरणी निष्ठा थोडीसुद्धा कमी होत नव्हती.. उलट आपण स्वामींच्या शाळेत आहोत.. स्वामी आपले कल्याण करत आहेत.. स्वामी महाराज आपला विकासच करत आहेत.. हा त्यांचा विश्वास अतिशय दृढ होत होता.. पुढे काही दिवसांनी चोळप्पा ह्यांनी आपल्या मुलीचा विवाह श्रीपाद भट ह्यांच्या सोबत लावून दिला.. आणि स्वामींच्या सानिध्यात राहून श्रीपाद भट ह्यांनी आपला प्रपंच आणि परमार्थ साध्य केला..
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!
| बोध ||
स्वामी दरबारात व्यवस्थापना करणाऱ्या मंडळी पैकी श्रीपाद भट हे एक होते.. ह्या पात्राकडून आपणास सर्वात महत्वाची एक गोष्ट शिकायला भेटते कि, ती म्हणजे स्वामीं बद्दल असलेली निष्ठा.. स्वामी महाराज त्यांची नेहमी परीक्षा घेत.. सर्व लोकांसमोर शिव्या वगैरे देवून अपमानित करत.. परंतु त्यांची स्वामीबद्दलची निष्ठा थोडीसुद्धा डळमळीत झाली नाही.. स्वामी महाराज हे ईश्वरीय विभूती आहे.. परब्रम्ह आहेत हा विश्वास त्यांचा कायम होता.. स्वामी भक्त हो !! आजच्या लीलेतून बोध घेता आज आपणास आजच्या पिढीसाठी वरील निष्ठा नावाचा गुण धारण करायचा आहे.. निष्ठा म्हणजे बेशर्त प्रेम.. निष्ठा म्हणजे अतूट अभेद्य विश्वास.. निष्ठा म्हणजे समर्पण.. आजच्या झपाटयाने विकास करणाऱ्या मानवासाठी तर निष्ठा नावाचा गुण अत्यंत महत्वाचा आहे.. आधुनिक युगात मानवाचे मन अधिकच चंचल बनत चालले आहे.. झटपट विकास करण्याच्या नादात मानवाच्या जगण्याचा दर्जा खालवत चालला आहे.. तो जे पण पात्र निभावतो आहे.. नाती निभावतो आहे.. त्या नात्यात त्याला शांती नाही.. आनंद नाही.. स्वामी भक्त हो !! आजच्या लीलेतून आपल्याला प्रेरणा घेत.. निष्ठा नावाचा गुण दृढ करायचा आहे.. बघा !! श्रीगुरु आणि शिष्य ह्या नात्यामध्ये श्रीपादभट हे शिष्याचे नाते निभावत होते.. ह्यात स्वामी महाराज श्रीपादभट ह्यांच्यावर रागवायचे.. चारचौघात शिव्या द्यायचे.. परंतु स्वामी आपली परीक्षा घेत आहेत.. स्वामी आपला विकास करत आहेत.. हा विश्वास त्यांचा दृढ होता.. थोडक्यात श्रीपादभट ह्यांना स्वामींच्या रागवण्यामागील.. शिव्या देण्यामागील.. शुद्ध भाव समजत होता.. अगदी तसे स्वामींच्या पृथ्वीवरील जीवनरुपी शाळेत भेटलेली सर्व नाती हि विकासासठी दिलेली आहे हि समज दृढ ठेवून.. अतिशय निष्ठेने आपल्याला ती नाती निभवायाची आहे.. एखादी घटना घडताच.. तेथे प्रतिसाद देण्यापूर्वी.. समोरील व्यक्तीची त्या मागे असलेली भावना समजावून घायची आहे.. जसे एखाद्या मुलाला काही कारणामुळे त्याची वडील रागवले तर त्यांची रागवण्यामागे असलेली भावना समजावून घायची आहे.. आणि स्वामी आपणास काय शिकवत आहेत.. तो सकारात्मक अर्थ घेवून.. आपल्या पित्याप्रती असलेले आपले एका पुत्राचे कर्तव्य निष्ठेने करत रहायचे आहे.. आपला कोणी मित्र असेल वा कोणी भरकटत असेल तर तर त्याला भरकटण्या पासून परावृत्त करायचे आहे.. त्याच्याप्रती असलेले आपले नाते निष्ठेने निभवायचे आहे.. स्वामी भक्त हो !! स्वामींनी आपल्याला खूप छान सोनेरी नाती दिलेली आहे.. हि नाती निष्ठेने निभावणे हि सुद्धा स्वामी भक्तीच आहे.. स्वामी सेवाच आहे.. किंबहुना स्वामी हुकूमच आहे.. आणि आपल्याला स्वामी हुकुमाचे पालन करत आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करायची आहे.. चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करू या “ हे श्रीगुरुसमर्था !! मी आता तुझ्या पृथ्वीवरील जीवनरूपी शाळेत शिकतो आहे.. ह्या शाळेत तु सतत मला काहीतरी शिकवतो आहेस.. माझा विकास व्हावा म्हणून तु मला खूप छान नाती दिलेली आहे.. हे आई !! माझ्या मनात.. ह्या सर्व नात्यांप्रती असलेली निष्ठा दृढ कर.. सर्वांप्रती बेशर्त प्रेमभाव दे.. सर्वांचे चांगले कर.. सर्वांना सुखात ठेवून त्यांचे कल्याण कर.. आणि तुला अपेक्षित आनंदी.. सुखी.. समृद्धी जीवनाची अभिव्यक्ती कर.. !! ”
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!






