हैद्राबादच्या निजाम सरकारला दिला स्वामी जिवंत असल्याचा पुरावा

Mar 3, 2022

वाचा आजची अगळीवेगळी स्वामी वाणी

श्री गुरुवचन कल्याणकारक ! सर्वकाली सत्यानंददायक !! दुस्तरभवसागर तारक ! निश्चयात्मक परिसुनी !! (श्रीगुरूलीलामृत ,अ.१६ ओवी ६६)

|| स्वामी लीला ||

अक्कलकोट नगरीत येण्यापूर्वी स्वामी महाराज मोगलाईतील राजूर प्रांती आले होते.. येथे स्वामी महाराज एका जुन्या लहानश्या मठात थांबले.. येथेही स्वामींनी असंख्य लीला केल्या आणि स्वामींच्या दिव्य वास्तव्याने ह्या मठाची भरभराटी होऊ लागली.. स्वामी महाराज अवतारी आहेत.. स्वामींच्या मात्र दर्शनाने अनेकांचा उद्धार होतो अशी दृढ श्रद्धा येथील लोकांची बसली.. आणि येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांची वर्दळ सुद्धा वाढली.. तेथे लालभारती सारखे अनेक शिष्य निर्माण झाले.. स्वामींनी ह्या मठात कायम रहावे.. ह्या उद्देशाने निजामच्या दरबारात चांगलेच वजन असलेले चंदुलाल दिवाण ह्या सद्गृहस्थाने सर्वांना विश्वासात घेवून निजाम सरकारकडून मठाला एक हजार रुपयांचे वर्षासन मिळवून दिले.. आणि ह्या मुळे त्या मठाचा पूर्णत: कायापालट झाला.. आता ह्या मठाला एखाद्या संस्थानेचे स्वरूप आले होते.. स्वामी भक्त हो !! स्वामींच्या पुढील कार्यांचे संपूर्ण नियोजन ठरलेले होते.. आणि त्या मुळे स्वामी एकाएकी त्या गावातून बेपत्ता झाले.. स्वामी अचानक निघून गेल्याने येथील सर्व लोकांचा गोंधळच उडाला.. स्वामींचा ठावठीकाणा कोणालाच समजला नाही.. पुढे काही दिवसांनी ज्यांच्या नावाने वर्षासन मिळत होते.. ते समर्थच येथे नाही.. असे निजाम सरकारला समजल्यावर.. सरकारने मठाला भेटणारे वर्षासन रद्द केले.. आणि सरकारच्या अधिकाऱ्यांनी “जर स्वामी हयात असल्याचा पुरावा दिला.. तर वर्षासनाचा पुन्हा विचार करू ” असे आश्वासन दिले.. आणि ह्यामुळे लालभारती सह इतर शिष्य हवालदिल झाले.. आणि स्वामींचा शोध घेत गावोगावी भटकू लागले.. पुढे जेव्हा स्वामी महाराज अक्कलकोट मध्ये आहेत असे ह्या मंडळींना समजले.. तेव्हा ते त्वरेने अक्कलकोट येथे आले.. त्या दिवशी स्वामी महाराज चोळप्पाच्या घरी होते.. सर्वांनी जावुन स्वामींचे दर्शन घेतले.. स्वामी भक्त हो !! लालभारती ह्यांनी जेव्हा स्वामींना बघितले तर त्यांच्या डोळ्यातून अखंड अश्रूधारा सुरु होत्या.. त्यावेळेला स्वामींनी त्यांच्याकडे कृपा दृष्टीने बघितले आणि बोलेले “ज्ञाता – ज्ञान आणि ज्ञेय ” आदी सर्व त्रिपुटीचा लय झाल्या शिवाय चित्त स्थिर होणार नाही.. आणि चित्त स्थिर झाल्याशिवाय निर्विकार-निराकार अशी सहजस्थिती प्राप्त होणार नाही असे सांगितले.. स्वामींच्या मुखातून निघालेला आत्मबोध ऐकून लालभारती धन्य झाले.. त्या नंतर स्वामींनी राजूर मठाची चोकशी केली असता.. लालभारतीने सर्व हकीकत सांगितली.. मठाला उत्पन्न सुरु करण्यासाठी आपले हमीपत्र हवे आहे अशी सुद्धा विनंती केली.. तेव्हा स्वामी पुन्हा बोलले “ येथे कोणी गुरु नाही.. येथे कोणीही शिष्य नाही.. सर्वत्र एकच सनातन परब्रम्ह विराजमान आहे.. हा सर्व एकाच चैतन्याचा पसारा आहे.. इतके असून सुद्धा ह्या चैतन्याला ह्या पसाऱ्याचा स्पर्थ नाही.. म्हणून ह्या मठ महंतीच्या मायाजालात न अडकता.. उपाधिरहित रहावे.. अखंड ब्रम्हस्थिती भोगावी.. मालक बनून न राहता.. पाहुण्यासारखे अलिप्त रहावे.. अतिथी- अभ्यागतास अन्न द्यावे.. मठ –संस्थान अधिकार आदीचा गर्व करू नये.. सर्व भूतमात्रांच्या कल्याणासाठी नित्य प्रयत्न करत राहा.. आणि असे वागण्यासाठी उत्पन्न हवे असेल तर खुशाल घे.. पण सदाचारी आचरण कर.. विकारांचा त्याग कर आणि वेद परंपरा सांभाळून वाग !! ” स्वामींचा बहुमुल्य उपदेश ऐकून सर्वच भारावून गेले.. श्री गुरुवचन कल्याणकारक ! सर्वकाली सत्यानंददायक !! दुस्तरभवसागर तारक ! निश्चयात्मक परिसुनी !! (श्रीगुरूलीलामृत ,अ.१६ ओवी ६६) या भावनेने.. नक्कीच आम्ही असे आचरण करू असा संकल्प स्वामी चरणी केला.. आणि सर्व लोक स्वामी चरणी नतमस्तक झाले.. स्वामी भक्त हो !! त्यानंतर स्वामींची काही सही झाली नाही.. परंतु लालभारती आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी श्रीमंत मालोजीराजे भोसले ह्यांची भेट घेवून.. चोळप्पा सह काही अधिकारी ह्यांच्यासोबत चर्चा करून.. स्वामींच्या ह्यातीचे प्रमाणपत्र बनवून घेतले.. त्यानंतर ते प्रमाणपत्र घेवून लालभारती स्वामींकडे आले.. स्वामींच्या चरणी मनोभावे पूजा करून.. अर्पण करून.. पुन्हा हैद्राबाद येथे आले.. तेथे त्यांनी निजामाच्या अधिकाऱ्यांना प्रमाणपत्र दाखवून मठाचे उत्पन्न पुन्हा सुरु केले.. स्वामींच्या लीलांची थोरवी महान आहे.. आपण अल्पमती आहोत.. खरोखर आपण नशीबवान आहोत कि आज आपणाकडून स्वामीच त्यांच्या लीलांचे श्रवण करवून घेत आहेत.. चला मग स्वामीरायाचा जयजयकार करू या !!
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!

|| बोध ||

आजचा स्वामी बोध तर अगदी स्पष्ट आहे.. आज आजच्या पिढीमध्ये सर्व धर्मातील.. सर्व पंथातील सर्वांसाठी कि, ज्या शरीरामार्फत श्री गुरुचे पात्र निभावले जाते आहे.. इतकेच नव्हे तर ज्या शरीरामार्फत शिष्याचे पात्र निभावले जाते आहे.. त्यांच्यासाठी सुद्धा आजचा स्वामी मुखातून निघालेला उपदेश अत्यंत महत्वाचा आहे.. स्वामी भक्त हो !! जे शरीर श्रीगुरूंचे पात्र निभावत आहेत.. त्यांच्यासाठी तर असलेला बोध तर अगदी स्पष्टच आहे.. त्यांच्या मनाने सतत जागृत राहून हि सदैव हि जाणीव ठेवायची आहे कि, खरे कार्य करणारे स्वामी गुरुतत्व आहे.. त्या स्त्रोतातुनच सर्व येते आहे.. त्या अस्तित्वाचाच सर्व पसारा आहे.. समोर शिष्याच्या शरीराद्वारे हे अस्तित्वच भक्ताचा.. शिष्याचे पात्र निभावत आहे.. आणि त्याचा खेळ खेळत आहे.. इथे कोणीही मोठा नाही वा छोटा नाही.. हे सर्व आचरणात आणायचे आहे.. खरं !! तर ज्याने परमसत्याची अनुभूती घेतली आहे.. त्याला हे सांगण्याची गरजच नाही.. असो. ह्या सह आज आजच्या पिढीमध्ये ज्या शरीराद्वारे शिष्याचे पात्र निभावले जात आहेत.. अनन्य भक्ताचे पात्र निभावले जात आहेत.. त्या सर्वांनी सुद्धा हि जाणीव ठेवायची आहे कि, श्री स्वामी समर्थ अस्तित्वाने.. स्त्रोताने.. आपल्याला जे सगुण रुपात जे श्री गुरु दिले आहेत.. त्यांच्या द्वारे स्वतः स्वामीच कार्य करत आहेत हा दृढ विश्वास ठेवायचा आहे.. पण हे शरीर म्हणजेच स्वामी महाराज आहेत असे अडकून रहायचे नाही.. त्यांच्या शरीरात अडकून रहायचे नाही.. ‘ हा सर्व एकाच चैतन्याचा पसारा आहे..’ आजच्या स्वामी वाणीतून भेटलेली हि समज सतत लक्षात ठेवायची आहे.. कारण जेव्हा आपण शरीरात अडकतो.. तेव्हा आपल्या पुढील विकासासाठी स्वामींनी आपल्या मार्गदर्शनासाठी जे श्री गुरुचे शरीर निमित्त तयार करवून ठेवलेले आहे.. त्याची भेट होत नाही.. जसे कोणी एक आठवीचा विद्यार्थी शास्त्रज्ञ बनण्याची स्वामींना प्रार्थना करतो.. आणि तो प्रयत्न सुरु करतो.. तेव्हा स्वामी त्याला आठवीच्या वर्गातील उत्कृष्ट श्री गुरु देतात.. त्यांच्या मार्गदर्शनाने तो आठवी पास होऊन.. नववीत जातो.. तिथेही त्याला पुढील वर्गाचे श्री गुरु भेटतात.. त्या नंतर तो दहावीला जातो.. स्वामी भक्त हो !! बघा !! जर तो विद्यार्थी आठवीत भेटलेल्या श्रीगुरूंमध्ये अडकून राहिला असता तर त्याची प्रगती झाली असती का? निश्चितच नाही.. अगदी तसेच आपल्या जीवनाचे सुद्धा असते.. असो. म्हणून माझे श्री गुरु हे परमचैतन्य परब्रम्ह निर्गुण निराकार स्वामी महाराज आहेत.. आणि हेच माझ्या वर्तमान स्थिती नुसार विविध शरीरातून कार्य करत आहेत.. मला मार्गदर्शन करत आहेत.. माझा विकास करत आहेत.. हा विश्वास दृढ करायचा आहे.. आणि आज पर्यंत ज्या ज्या शरीरांना निमित्त करून त्याने आपल्याला मोठे केले त्या सर्व शरीरांच्या प्रती कृतज्ञ रहायचे आहे.. आणि सुरुवात आपल्या जन्मदात्या आई-वडीलां पासून करायाची आहे.. त्यानंतर मग कोणी मित्र असेल.. पुस्तक असेल.. वा कोणीही असेल.. ह्या सर्वांप्रती निरंतर धन्यवाद भावनेत रहायचे आहे.. लवकरच श्री गुरुपोर्णिमा येते आहे.. आणि खरोखर तुम्हा आम्हा भक्तांसाठी असलेला खूप मोठा उत्सव आहे.. चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करू या “ हे परमचैतन्य निर्गुण निराकार स्वामी समर्था !! तूच शिव.. तूच ब्रम्हा.. तूच विष्णू.. तूच माझा पिता.. तूच माझी माता.. तूच माझा सखा.. तूच माझा सोयरा.. तूच आकाश.. तूच वसुंधरा.. समस्त भूतमात्रांत तुझाच वास आहे.. हे श्री समर्था !! ह्या सर्वांद्वारे तु मला सतत मार्गदर्शन करतोस.. माझा सांभाळ करतोस.. माझी काळजी करतोस.. माझ्या वर बेशर्त प्रेम करतोस.. माझा सदैव विकास करतो आहेस.. हे आई !! मी सदैव तुझा ऋणी आहे.. माझ्याकडे शब्दच नाही !! तुला अनंत कोटी धन्यवाद स्वामी !! अनंत कोटी धन्यवाद !! ”
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!

अजून बातम्या वाचा..

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

Nashik : आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर...

read more
ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

Nashik : महाशिवरात्री: द डिव्हाइन नाइट या १२ तासांच्या खास लाइव्ह स्ट्रीमद्वारे २६ फेब्रुवारी रोजी...

read more
“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

Nashik : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण...

read more
22 जानेवारी रोजी पहा ‘श्रीमद् रामायण’मध्ये भगवान श्रीरामाचा आत्तापर्यंतचा प्रवास

22 जानेवारी रोजी पहा ‘श्रीमद् रामायण’मध्ये भगवान श्रीरामाचा आत्तापर्यंतचा प्रवास

नाशिक : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण...

read more
Breaking News