साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ -जयंती निमित्त लेख…

Jul 30, 2019

1 ऑगस्ट 1920 रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या रुपाने मराठी साहित्याच्या एका नवीन प्रवाहाचा जन्म झाला.अण्णाभाऊंनी मराठी साहित्याला नवी दिशा प्राप्त करुन दिली. साहित्य हे राजविलासी लोकांच्या करमणूकीचे साधन नसुन दीन-दुबळ्या, शोषित, उपेक्षित समाजाचे दु:ख, दैन्य, दारिद्रय साहित्यातून प्रभावीपणे मांडणारे एक प्रभावी माध्यम आहे. अण्णाभाऊंनी जे पाहिले, अनुभवले त्यालाच शब्दरुप दिले. अण्णाभाऊंचा दृष्टीकोन मानवतावादी होता म्हणून इथल्या वर्णव्यवस्थेने नाकारलेल्या समाजातील नायक त्यांना आपले वाटले.
या देशात सामान्य माणसाच्या मुलभूत गरजासुद्धा पूर्ण होत नाहीत हे अण्णांनी प्रत्यक्ष पाहिले होते. भोमक्याला अंगभर कपडे आणि पोटाला पोटभर अन्न मिळत नाही यासाठी त्याला कारागृहामध्ये बंड करावे लागते. त्याच भाकरीसाठी आपल्या हाताची बोटे गमवावी लागतात. तर समूला कोणी काम देत नाहीत म्हणून पोटाची खळगी भरण्यासाठी चोरी करावी लागते, असे अनेक नायक अण्णाभाऊंनी पाहिले होते.
घरच्या बिकट परिस्थितीमुळे टिचभर खळगी भरण्यासाठी मुंबईत गेलेल्या अण्णाला तेथील मानवी जीवन जवळून पाहण्याचा योग आला. मुंबईसारख्या औद्योगिक नगरीत प्रचंड विषमता त्यांना दिसली. ती व्यक्त करतांना अण्णाभाऊ म्हणतात,
मुंबईत उंचावरी मलबारहिल इंद्रपुरी । कुबेराची वस्ती तिथं सुख भोगती ॥
परळात राहणारे रात दिन राबणारे । मिळल ते खाऊनी घाम गाळती ॥
माझी मुंबई….
मुंबईसारख्या शहरातील वास्तव चित्रण या लावणीतून त्यांनी व्यक्त केले आहे. अण्णांचा साहित्य विचार हा कम्युनिस्ट विचारसरणीचा आहे. तसाच तो म.फुले-आंबेडकरी विचारधारेशी बांधिलकी जपणारा आहे. याकडे महाराष्ट्रातील समीक्षकांनी दुर्लक्ष केले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी विदर्भ साहित्य संघ, नागपूर येथे साहित्यिकांना आवाहन केले त्यावेळी ते म्हणतात, मला साहित्यिकांना आवर्जुन सांगायचे आहे की, उदात्त जीवनमुल्ये आपल्या साहित्य प्रकारातून आविष्कृत करा, आपले मन संकुचित ठेऊ नका. ते विशाल बनवा, आपली वाणी चार भिंतीत ठेऊ नका, तिचा विस्तार होऊ द्या, आपली लेखणी आपल्या प्रश्नांभोवती बंदिस्त करु नका. तिचे तेज खेड्यातील गडद अंधार दुर होईल असे प्रवर्तित करा. आपल्या देशात उपेक्षितांचे फार मोठे जग आहे, हे विसरु नका. त्यांचे दु:ख, त्यांची व्यथा नीट समजून घ्या आणि आपल्या साहित्याद्वारे त्यांचे जीवन उन्नत करण्यास झटा खरी मानवता हीच आहे. अण्णाभाऊंनी याच प्रेरणेतून आपले लिखाण केले. याचा प्रत्यय त्यांच्या पुढील कवणातुन येतो.

बदल घालुनी घाव । सांगुन गेले मज भीमराव ।
गुलामगिरीच्या या चिखलात । रुतुन बसला का ऐरावत ।।
अंग झाडूनी निघ बाहेरी । घे बिनीवरील धाव ।।

अण्णाभाऊ एवढ्यावरच न थांबता त्यांनी आपली शासन पुरस्कार प्राप्त ‘फकीरा’ कादंबरी डॉ.बाबासाहेबांच्या झुंजार लेखनीला अर्पण केली. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या थोर सुपूत्रास त्यांच्या 99 व्या जयंती निमित्त त्रिवार मुजरा !

शब्दांकन : संजय बोराळकर, नाशिक
—-Mob. No 8956992468

अजून बातम्या वाचा..

व्हॅलेंटाईन डे ‘च्या दिवशी ‘नको हा बहाणा’ हा म्युझिक अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला

व्हॅलेंटाईन डे ‘च्या दिवशी ‘नको हा बहाणा’ हा म्युझिक अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला

फेब्रुवारी महिना हा अनेक युवक, युवती प्रेमाचा महिना म्हणून साजरा करतात. एकमेकांना गिफ्ट देण, डेटवर...

read more
देवेंद्र फडणवीस यांनी राजमाता जिजाऊंच्या जयंती दिनी सोशल मिडियाद्वारेपण वाहिली मानवंदना ! व्हिडीओ व्हायरल

देवेंद्र फडणवीस यांनी राजमाता जिजाऊंच्या जयंती दिनी सोशल मिडियाद्वारेपण वाहिली मानवंदना ! व्हिडीओ व्हायरल

नाशिक : राजमाता जिजाऊसाहेब भोसले यांचा जन्मदिवस राज्यात सगळीकडे आनंदात व उत्साहात साजरा करण्यात...

read more
दुबईत डॅझलिंग महाराष्ट्र कार्यक्रमात डॉ. दातार यांचा महाराष्ट्र सरकारतर्फे गौरव

दुबईत डॅझलिंग महाराष्ट्र कार्यक्रमात डॉ. दातार यांचा महाराष्ट्र सरकारतर्फे गौरव

नाशिक – राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर कितीही पुरस्कार मिळाले तरी कर्मभूमी दुबईत मायभूमी...

read more
Breaking News