५ ऑक्टोबरला विजयादशमीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार
Nashik : शिवकाळातील पारंपारिक वेशभूषेतील मुले, लेझीम पथकाचे सादरीकरण, ढोलताशा पथक, मिरवणूक, शिवगर्जना, प्रवेशद्वारापाशी सुंदर रांगोळी अशा आकर्षक सादरीकरणाने अवघा माहोल शिवमय झाला होता. निमित्त होते शिवप्रताप गरुडझेप चित्रपटाच्या प्रिमियरचे. ‘जगदंब क्रिएशन’ या निर्मिती संस्थेद्वारे ‘शिवप्रताप गरुडझेप’ ५ ऑक्टोबरला विजयादशमीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. तत्पुर्वी नाशिकच्या सिटी सेंटर येथे संपन्न झालेल्या या प्रिमियरला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मा. छगन भुजबळ आवर्जून उपस्थित होते. राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
‘शिवप्रताप गरुडझेप’ तुफान चालेल असं सांगत छगन भुजबळ यांनी डॉ. अमोल कोल्हे यांचे खूप कौतुक केले. आग्र्याहून सुटका’ हा शिवचरित्रातील हा महत्त्वाचा अध्याय ‘शिवप्रताप–गरुडझेप’ या चित्रपटातून उलगडणार आहे. चाणाक्ष युद्धनीती अन् रणनीती महाराजांची ही खरी ओळख, या चित्रपटातून प्रभावीपणे मांडण्याचा डॉ. अमोल कोल्हे आणि त्यांचा टीमचा प्रयत्न यशस्वी झाल्याचा उपस्थित मान्यवरांनी सांगितले. डॉ. अमोल कोल्हे यांनी या चित्रपटातून मराठी रुपेरी पडदयावर कमाल केली असल्याच्या प्रतिक्रियाही अनेकांनी दिल्या.
या चित्रपटात डॉ. अमोल कोल्हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत असून त्यांच्यासोबत यतीन कार्येकर, प्रतीक्षा लोणकर, हरक अमोल भारतीय, शैलेश दातार, हरीश दुधाडे, मनवा नाईक, पल्लवी वैद्य, अजय तपकिरे, रमेश रोकडे, अलका बडोला कौशल, आदी ईराणी, विश्वजीत फडते आदी कलाकारांच्या भूमिका आहेत.
या चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक राजाराम केंढे यांनी केले आहे. डॉ.अमोल कोल्हे, विलास सावंत, सोनाली घनश्याम राव, चंद्रशेखर ढवळीकर, कार्तिक राजाराम केंढे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून प्रफुल्ल तावरे सहनिर्माते आहेत. रविंद्र मानकामे कार्यकारी निर्माते आहेत. छायाचित्रण संजय जाधव यांचे असून संकलन पीटर गुंड्रा यांनी केले आहे.
विजयादशमीच्या मुहूर्तावर ‘शिवप्रताप गरुडझेप’ सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.






