शेतकऱ्यांच्या हितासाठी शहरी – ग्रामीण हा वाद मिटवावा लागेल : रोहित पवार

Nov 28, 2022

नाशिक – शेती क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाचा वापर होत असताना उत्पादन वाढत असले तरी शेतकऱ्यांच्या समस्या काही कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच आहेत. सध्याच्या काळात शेतकऱ्यांपुढे हवामानातील सातत्याने बदल, शेतीमालाच्या भावातील घसरण, विमा कंपन्यांकडून अडवणूक, सरकारकडून नुकसान भरपाई देण्यास विलंब, अशा अनेक समस्या आहेत. त्यात शेतमालाचे भाव वाढले की, शहरी भागातील ग्राहकांकडून ओरड सुरू होते. परंतु यापुढे शेतकऱ्यांच्या हितासाठी शहरी – ग्रामीण हा वाद नष्ट व्हायला हवा, कारण शेतकरी जगला तर देश जगेल हे सर्वांना माहीत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेड आमदार रोहित पवार यांनी केले. त्याचप्रमाणे कृषीथॉन प्रदर्शनाच्या माध्यमातून गेल्या २४ वर्षांपासून नवनवीन कृषी संशोधनाची माहिती शेतकऱ्यांना करून दिली जात आहे, ही अत्यंत गौरवास्पद बाब आहे, असेही रोहीत पवार म्हणाले.
ह्युमन सर्व्हिस फाउंडेशन व मीडिया एक्झिबिटर्स प्रा.लि. यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या सोमवारी २८ नोव्हेंबर २०२२ रोजी या कृषीथॉन प्रदर्शनाच्या पाचव्या तथा अखेरच्या दिवसाच्या समारोपाच्या सत्रात गुणवंत संशोधक सन्मान, युवा प्रयोगशील संशोधक, गुणवंत विद्यार्थी यांना पुरस्कार वितरण कार्यक्रम झाला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार रोहित पवार यांच्यासह नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, के. के. वाघ एज्युकेशन सोसायटीच्या कृषी अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख शिरीष साने, भाजपचे शहराध्यक्ष गिरीश पालवे, कृषीथॉनचे आयोजक संजय न्याहारकर, अश्विनी न्याहारकर, साहिल न्याहारकर, अंकिता न्याहारकर आदी उपस्थित होते.
आमदार रोहित पवार म्हणाले की, आजच्या काळात आपल्या राज्यात कृषी क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या कल वाढत आहे. विशेषतः विद्यार्थिनींनादेखील या विषयात आवड निर्माण होत आहे, अत्यंत कौतुकास्पद बाब असून यासाठी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शेतीत जाऊन प्रात्यक्षिकेद्वारे प्रशिक्षण घेतल्यास त्याचे अधिक चांगले परिणाम होतील आणि पर्यायाने शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. परदेशात रोबोटद्वारे शेती करण्यात येते. परंतु आपल्याकडे मनुष्यबळ अधिक असल्याने मानव आणि नवनवीन तंत्रज्ञान याचा संयोग करून शेती केल्यास त्यात आणखी प्रगती होऊ शकते, असेही पवार म्हणाले.
आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, आजच्या काळात कृषीथॉन प्रदर्शन हे शेतकऱ्यांसाठी एक रोल मॉडेल ठरले आहे. कृषी क्षेत्रात नवनवीन प्रयोग होत असताना आधीच्या काळात काय परिस्थिती होती, याचा आढावा घेऊन पुढे कसे जाता येईल, याचा विचार व्हावा. आपल्या देशाने गहू, तांदूळ, दूध, साखर या क्षेत्रात सर्व जगामध्ये अग्रक्रम मिळवला आहे. परंतु फळे, फुले, भाजीपाला यात आणखी पुढे जाण्यासाठी आधुनिक शेतीकडे लक्ष देण्याची गरज आहे. विशेषतः ठिबक सिंचनाचा वापर वाढायला हवा, सध्या कमी क्षेत्रात जास्त उत्पादन घेण्याची गरज आहे, असेही तांबे म्हणाले. कार्यक्रमाच्या प्रारंभी कृषीथॉन प्रदर्शनाचे आयोजक साहिल न्याहारकर यांनी प्रास्ताविकात या प्रदर्शनाच्या आयोजनाबाबतची माहिती दिली.
याप्रसंगी मान्यवरांचे स्वागत आयोजक साहिल न्याहारकर आणि अश्विनी न्याहारकर यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदित्य तुपे यांनी केले. आभार प्रदर्शन अंकिता न्याहारकर यांनी केले.

पुरस्कारार्थांची नावे अशी : गुणवंत संशोधक सन्मान : युवा प्रयोगशील संशोधक २०२२- डॉ. अरविंद तोत्रे, डॉ.धनंजय देशमुख, डॉ. सचिन रामटेके, डॉ. सतीश बोरणारे, डॉ. श्रीकांत गोरे, डॉ. स्वप्नील ठाकरे.
युवा प्रयोगशील संशोधक २०२०- डॉ. अंबादास मडकर, डॉ. मयूर विसपुते, निलेश खाडे, डॉ. सौरभ केदार, डॉ. शांतीकुमार पाटील, डॉ. सुमेध हिवाळे.
गुणवंत विद्यार्थी सन्मान २०२२ -बिभिषण आगे, अभयराज सिंग परमार, सिद्धनागौड बिरादार, कृष्णा चौधरी, दीपक दाते, श्रेयस डिंगोरे, सौरभ गायकवाड, सोमनाथ गायकवाड, गायत्री चावरे, प्रीती जावळे, खुशी, विशाल कुलकर्णी, करिष्मा मुजावर, शैला अरबोळे, शुभंकर रक्षित.
गुणवंत विद्यार्थी सन्मान २०२० – भूषण भोसले, डिंपल गावंडे, हर्षल सोनवणे, हर्षाली गायकवाड, हिना शेख, हृषीकेश पवार, कल्याणी औटी, कविता पुजारी, कोमल चौगुले, परमेश्वर साळुंखे, प्रांजल काळे, हृषीकेश रायकर, हृषीकेश धापटे, समर्थ तुपकर, शिवानी देसाई, श्वेता जाधव, सोनाली सिरसकर, शुभम पिंपळकर, तेजस सुतार, विजय वसेकर, विक्रमसिंग पासळे, विश्वतेज पवार आदींचा सत्कार करण्यात आला.

विशेष म्हणजे गेल्या पाच दिवसात या प्रदर्शनास नाशिक जिल्ह्यासह राज्यभरातील इतकेच नव्हे तर अन्य राज्यातील शेतकरी, उद्योजक, व्यावसायिक, कृषी क्षेत्रातील विद्यार्थी यांनी भेट देऊन विविध कृषी तंत्रज्ञानाची आणि नव संशोधनाची माहिती घेतली, या प्रदर्शनास नागरिकांनी लाखोच्या संख्येने उत्स्फुर्तपणे भेट दिल्याने प्रदर्शन अत्यंत यशस्वी झाले, अशी माहिती आयोजक संजय न्याहारकर व साहिल न्याहारकर यांनी दिली.

अजून बातम्या वाचा..

इंडियन आयडॉल 14 मध्ये झीनत अमान आद्या मिश्राला म्हणाली, “अशी प्रतिभावान व्यक्ती बॉलीवूडमध्ये आली, तर नक्कीच खळबळ माजवेल!”

इंडियन आयडॉल 14 मध्ये झीनत अमान आद्या मिश्राला म्हणाली, “अशी प्रतिभावान व्यक्ती बॉलीवूडमध्ये आली, तर नक्कीच खळबळ माजवेल!”

नाशिक : या शनिवारी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल 14 या अत्यंत लोकप्रिय गायन...

read more
Breaking News