विहंगम योग संत समागमास हजारो भाविकांची हजेरी
नाशिक ः मानवाचे जीवन अनमोल असून, हे जीवन ईश्वराचा महाप्रसाद आहे. आपल्यामध्ये अनंतची शक्ती असून, अनंत आनंदाचा स्त्रोतही आहे. आत्म्यामधील अंतरआत्मा रुपात ईश्वरच विराजमान आहे. हे जाणून घेण्यासाठी आध्यात्मिक ज्ञाना, स्वर्वेद सद्ज्ञानाची, विहंगम योगाच्या ध्यानाची आवश्यकता आहे. यांच्या अवलोकनातून साधक आपल्या जीवनाचा सर्वोन्मुखी विकास साधू शकतो, असा उपदेश संत प्रवर श्री विज्ञानदेवजी महाराज यांनी शनिवारी (दि.४ फेब्रुवारी) दिला.
त्र्यंबकेश्वर रोडवरील ठक्कर डोम येथे अखिल भारतीय विहंगम योग संत समाज, महाराष्ट्र प्रदेश व नाशिक शाखा यांच्या वतीने आयोजित विहंगम योग संत समागम या धार्मिक सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी आचार्य श्री स्वतंत्र देवजी महाराज यांच्यासह माताजी सुशिला देवी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
श्री विज्ञानदेवजी महाराज म्हणाले, जीवनातील प्रत्येक क्षण अनमोल आहे. उगाच आपल्याला मनुष्यजन्म भेटलेला नाही. जीवन जगण्यातच जीवन वाया घालवायला नको. प्रत्येक क्षण वेगाने धावत असतो, अशात या प्रत्येक क्षणाचा योग्य प्रकारे उपयोग करुन घेणे आवश्यक आहे. आपल्याला मनुष्याचा जन्म कशासाठी मिळालेला आहे, याचा अनुभव मिळविणे आवश्यक ठरते. आपण शरीरापर्यंत किंवा इंद्रियांपर्यंत मर्यादित नसून, त्यापलीकडे आपले अस्तित्व आहे. हे समजून घेण्यासाठी संतांचा सानिध्य महत्वाचा ठरतो.
धार्मिक सोहळ्याच्या सुरवातीला मल्यार्पणाचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त श्री. राधाकृष्ण गमे, जिल्हा परीषदेचे माजी सभापती तथा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, माजी नगरसेवक विलास शिंदे यांनी गुरुजींकडून कृपार्शीवाद घेतला. याप्रसंगी योगेश पाटील (गडाख), विवेक पाटील (गडाख), संत किशनलाल शर्मा, बंजरंगलाल बाजारी, कर्नल निर्मल कुमार, प्रकाश त्रिपाठी, गोविंद झा, समीर पाटील, मीनल पाटील, स्नेहलता मोरे, ज्योती पाटील, मनिषा पाटील, अनिता कदम आदी मान्यवरांनी मार्ल्यापण केले. सुमधुर भजन श्रवण केल्यानंतर उपस्थित भाविकांनी स्वामींच्या सुश्राव्य सत्संगाचा आस्वाद घेतला.






