जयपूर : महिंद्रा अँड महिंद्रा लि. या 20.7 अब्ज डॉलर उलाढाल असणाऱ्या महिंद्रा समूहाचा भाग असणाऱ्या कंपनीने केवळ महिला चालवत असणाऱ्या भारतातील पहिल्या ऑटोमोबाइल सर्व्हिस वर्कशॉपचे जयपूर येथे उद्घाटन केले आहे. कंपनीच्या सर्व ऑटोमोबाइल वर्कशॉपमध्ये महत्त्वाच्या भूमिका बजावण्यासाठी महिलांची नियुक्ती करण्यास उत्तेजन देण्याच्या कंपनीच्या ‘पिंक कॉलर्स’ या उपक्रमांतर्गत हे वर्कशॉप सुरू करण्यात आले आहे.
9 महिलांच्या टीमकडे जबाबदारी असणारे कॉम्पॅक्ट क्विक (सीक्यू) आउटलेट ही महिंद्राच्या अधिकृत टू-बे अर्बन वर्कशॉपची श्रेणी असून ती शेड्युल्ड सर्व्हिसेसची सेवा देते. जयपूरमधील कल्याण मोटर्स या महिंद्राच्या चॅनल पार्टनरची मालकी असणारे व त्याद्वारे चालवले जाणारे कॉम्पॅक्ट क्विक वर्कशॉप आता महिलांच्या टीमतर्फे चालवले जाते. त्यामध्ये तंत्रज्ञ, सर्व्हिस सल्लागार, चालक, पार्ट मॅनेजर व सुरक्षारक्षक अशा भूमिका महिला बजावतात.
याविषयी बोलताना, महिंद्रा अँड महिंद्रा लि.चे ऑटोमोटिव्ह डिव्हिजनचे सेल्स व मार्केटिंग चीफ वीजय राम नाकरा यांनी सांगितले, “केवळ महिलांतर्फे चालवल्या जाणाऱ्या भारतातील पहिल्यावहिल्या ऑटोमोबाइल वर्कशॉपचे उद्घाटन करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आम्ही या उपक्रमाला “पिंक कॉलर्स” असे नाव दिले आहे. या उपक्रमामार्फत, आम्ही अधिकाधिक महिलांना कुशल व सबल करणार आहोत. यामुळे आमच्या वर्कशॉपमध्ये सर्वसमावेशक आणि स्त्री-पुरुषांचा समावेश असणारे मनुष्यबळ निर्माण होणार आहे.”
सीक्यू आउटलेटमध्ये “क्विक” सेवेचे आश्वासन पूर्ण करण्यासाठी, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरचे पालन करत व उत्पादकतेमध्ये जास्तीत जास्त वाढ करत, एका वाहनावर 2 तंत्रज्ञांनी काम करणे गरजेचे आहे. आपल्या अधिकृत वर्कशॉपमध्ये महिला कर्मचाऱ्यांचा समावेश करण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी महिंद्रा बांधील आहे. त्यासाठी चॅनल पार्टनर्सकडे महिलांसाठी समावेशक धोरणे आखण्यात आली आहेत. कंपनीने महिला डीलर कर्मचाऱ्यांसाठी तांत्रिक प्रशिक्षण शुल्क माफ केले आहे आणि एक-तृतियांश प्रशिक्षणार्थी म्हणून महिलांचची निवड करण्यासाठी डीलरना उत्तेजन देत आहे.
पिंक कॉलर उपक्रमाविषयी
पिंक कॉलर उपक्रम चॅनल पार्टनरना इंडस्ट्रीअल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्सशी (आयटीआय) सहयोग करण्यासाठी प्रोत्साहन देतो आणि कंपनीच्या कुशल प्रशिक्षकांद्वारे औद्योगिक ज्ञान देतो, प्रत्यक्षातील प्रशिक्षण देण्यासाठी आणि आयटीआय विद्यार्थ्यांना या उद्योगासाठी घडवण्यासाठी ऑटोमोटिव्ह सेवा देतो. महिलांची निवड व नियुक्ती करण्यासाठी महिंद्राच्या अधिकृत डीलरनी या आयटीआयमध्ये विद्यार्थिनींसाठी विशेष नियुक्ती मोहीम आयोजित केली होती. चाकोरीबाहेरचे करिअर निवडून इतिहास घडवणाऱ्या या महिला विविध क्षेत्रांतील आहेत.
या वर्षी ऑगस्टमध्ये पिंक कॉलर्स कार्यक्रमासाठी महिलांची निवड केल्यानंतर त्यांना महिंद्रा इन्स्टिट्यूट ऑफ लर्निंग एक्सलन्स (एमआयएलई) येथे तांत्रिक प्रशिक्षण देण्यात आले. तेथे त्यांना महिंद्राच्या विविध वाहनांविषयी माहिती देण्यात आली व प्रत्यक्ष अनुभव देण्यात आला.





