नाशिक : अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाच्या भरपाईसाठी शेतकऱ्यांना त्वरीत पंचनामा पूर्ण करुन मदत दिली जाईल ,असे आश्वासन कृषी व फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले.
सटाणा व निफाड तालुक्यातील गांवामध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या द्राक्षबाग व इतर पिकांची पाहणी प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार दिलीप बोरसे, बागलाण उपविभागीय अधिकारी विजय भांगरे, तहसिलदार जितेंद्र इंगळे, गटविकास अधिकारी पी.एस.कोल्हे, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, तालुका कृषी अधिकारी एस.एस.पवार, निफाड उपविभागीय अधिकारी अर्चना पठारे, तहसिलदार दिपक पाटील, गटविकास अधिकारी संदिप कऱ्हाड, तालुका कृषि अधिकारी बी.जी.पाटील उपस्थित होते.
श्री. खोत म्हणाले, नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसामुळे द्राक्ष, कांदा, भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील सुमारे साडे तीन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाच्या संकटातून सावरण्यासाठी येत्या आठ दिवसात सर्व पिकांचे पंचनामे करण्यात येतील. पंचनाम्याचे काम अधिक गतीने होण्यासाठी ग्रामविकास, महसुल, कृषी विभागाबरोबरचं कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची मदत घेण्यासाठी शासनस्तरावर निर्णय घेण्यात असल्याचे ते यावेळी म्हणाले.
बागलाण तालुक्यातील वेअर हाऊस, कोल्ड स्टोअरेज मागणीचा विचार करता ‘निर्यात सुविधा केंद्र’ लवकरच सुरु करण्यासाठी व डाळींब, द्राक्ष पिकाला रोजगार हमीतुन अनुदान मिळावे यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे पुर्नगठन करण्यात येणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
श्री.खोत यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीच्या पाहणीसाठी वडाळीभोई येथील शेतकरी सोमनाथ जाधव यांच्या 2 एकर द्राक्ष आणि दिड एकर मिरची नुकसानीची पाहणी, सटाणा तालुक्यातील ठेंगोडे येथील दिनेश रकिबे, पिंगळवाडे येथील कृष्णा भामरे, करंजाड येथील रत्नप्रभा देवरे , बिजोटे येथील गोपीनाथ जाधव द्याने येथील जिभाऊ कापडणीस यांच्या नुकसान झालेल्या द्राक्ष बागेची पाहणी केली. तसेच वायगाव येथे आत्महत्या केलेल्या केदा मोठाभाऊ देवरे या शेतकऱ्याच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. निफाड येथील कोळवाडी या गावात नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली.

जिल्ह्यातील अशा बाधित शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कशी करता येईल यासाठी सरकार कटिबद्ध राहील. कर्ज वसुलीसाठी जमीन लिलावाच्या नोटीसा आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितल्यावर श्री. खोत यांनी संबधीत बॅकांना तात्काळ वसुली थांबविण्याच्या सुचना देण्यात येतील, असे सांगितले.






