जिल्ह्यात 1 हजार 766 गावे अवकाळी पावसाने बाधित
नाशिक : जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे पीकांचे संपुर्ण नुकसान झाले असून खराब झालेले पीक जनावरांना चारा म्हणूनही उपयोगाचे राहीले नाही. त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सर्वोतापरी मदत करणार असुन शासन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे , वैद्यकिय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले.
नुकसानीच्या पाहणी दौऱ्यावरुन परतल्यानंतर अतिवृष्टीमुळे पीकांचे नुकसान झाल्याबाबतची आढावा बैठक मध्यवर्ती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रिय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस., खासदार डॉ.भारती पवार, आमदार देवयानी फंरादे, सीमा हिरे, अँड राहुल ढिकले, डॉ.राहुल आहेर, दिलीप बोरसे, दिलीप बनकर उपस्थित होते.
महाजन म्हणाले, उत्तर महाराष्ट्रात मोठा पाऊस झाल्याने शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाल्याचे पाहणीत आढळले. द्राक्ष, कापूस पिकांबरोबरच मका पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. बाजरी, कापूस , ज्वारी या पिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. आठ दिवसात पंचनाम्याचे काम पुर्ण करण्यात येणार आहे. अहवाल आला की आवश्यक ती सर्व मदत करण्यात येणार आहे. शासन मदतीसाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. जिल्हा बँकेने सक्तीची वसुली व वीजबिल आकारणी थांबविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यात परतीच्या अवेळी पावसामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेती पिकांच्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांचे दावे भरुन मंजुरीसाठी विमा कंपनीकडे त्वरित पाठविण्यात यावेत. या प्रकरणी तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि तालुका कृषि अधिकारी, नायब तहसीलदार यांनी स्वत: क्षेत्रीय स्तरावर जाऊन पाहणी करण्याची सूचना श्री. महाजन यांनी दिली.
श्री. आठवले म्हणाले, आगामी काळात आशा प्रकारचा पाऊस झाल्यास त्या पावसाला वाट करुन देण्यासाठी उपयोजना करणे आवश्यक असल्याचे ते यावेळी म्हणाले. शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार आहे.
श्री.माने म्हणाले, नाशिक विभागात 16 लाख हेक्टर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सर्व ठिकाणी पंचनामे सुरु असून येत्या आठ दिवसात सर्व पंचनामे पूर्ण करण्यात येणार आहे. व त्याचा अहवाल शासनास सादर करून मदत मागितली जाणार आहे. पूर्ण नाशिकमध्ये द्राक्ष पिकासह विभागात सर्वात जास्त नुकसान, कापूस, बाजरी, ज्वारी, मका चे सर्वाधिक नुकसान झाले आहे.
श्री. मांढरे, यांनी जिल्ह्यात 1 हजार 766 गावे अवकाळी पावसाने बाधित असून 4 लाख 62 हजार 586 शेतकऱ्यांना या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यात एकुण 3 लाख 6 हजार हेक्टर इतके बाधित क्षेत्र असून या संकटातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
पीक नुकसानीची पालकमंत्री गिरीष महाजन यांच्याकडून पाहणी
अवेळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानी बाबत निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत, पाचोरे वणी, शिरवाडे वणी तसेच चांदवड तालुक्यातील सोग्रस, तसेच देवळा तालुक्यातील उमराणे/तिसगाव इत्यादी गावातील शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन पालकमंत्री गिरीष महाजन यांनी पिकाच्या नुकसानीची पाहणी केली. तसेच ओझर येथे द्राक्ष बागायतदार संघाच्या सदस्यासोबत बैठक घेवून चर्चा केली.
यावेळी कृषी व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले, उपविभागीय अधिकारी निफाड डॉ.अर्चना पठारे, उपविभागीय अधिकारी चांदवड सिध्दार्थ भंडारे, तहसिलदार दिपक पाटील, द्राक्ष बागायदार संघाचे अध्यक्ष रविंद्र बोराडे, खजिनदार कैलास भोसले व परिसरातील शेतकरी उपस्थित होते. यावेळी शेतकरी गुलाब खोडे, महसू गांगुर्डे, प्रवीण देवरे, कारभारी घुगे यांनी शासनाने आम्हाला लवकर मदत द्यावी, अशी मागणी केली.





