मुंबई – रोजगारासाठी जवळजवळ दोन-तृतियांश लोकसंख्या शेतीवर अवलंबून असणाऱ्या देशात या क्षेत्राचे महत्त्व वेगळे सांगायला नको. देशाच्या जीडीपीमध्ये या क्षेत्राचा वाटा अंदाजे 17 टक्के आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हे क्षेत्र 1.3 अब्ज लोकांना खाऊ घालते.
गेल्या काही दशकांमध्ये, शेतीच्या वाढीचे विविध टप्पे दिसून आले आहेत. फार्मिंग 1.0 हा पहिल्या टप्पा 1947 ते 1966 या कालावधीत होता आणि शोषण करणारी जमीनदारी व्यवस्था नष्ट करणाऱ्या महत्त्वाच्या जमीनविषयक सुधारणा, हे या टप्प्याचे वैशिष्ट्य होते. दुसरा टप्पा हरित क्रांतीचा होता. त्यामध्ये भारतातील शेतीची उत्पादकता अनेक पटींनी वाढली आणि परदेशातून अन्नधान्याची मदत घेण्यापासून देशाची सुटका झाली. फार्मिंग 2.0 असे नाव असलेला हा टप्पा भारताच्या शेतीच्या इतिहासातील सुवर्ण काळ होता. या सगळ्या टप्प्यांमुळे आज आपण अन्नधान्याच्या बाबतीत सुरक्षित राष्ट्र बनू शकलो आहोत.
आज, भारतातील शेतजमिनी महत्त्वाच्या टप्प्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. आपली लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे या क्षेत्रावर कमालीचा ताण येत आहे. इतकेच नाही, तर आपल्या देशात झपाट्याने औद्योगिकीकरण होत आहे आणि संपूर्ण लोकसंख्या शहरांकडे स्थलांतरित होत आहे. शेतीचे उत्पन्न घटते आहे आणि भारतातील शेतजमिनींवर त्या सोडून दिल्या जाण्याचे सावट आहे.
आणखी एका क्रांतीची गरज निर्माण झाली आहे: भारतीय शेतीतील नवा टप्पा नावीन्य व तंत्रज्ञान यावर बेतलेला असणार आहे. या टप्प्यामध्ये, आम्ही उत्पादकता व अर्थकारण यांचा समतोल सामाजिक व पर्यावरणविषयक घटकांशी घालणार आहोत. आम्ही या टप्प्याकडे शेतीसाठी उत्कृष्ट उत्पादकतेचे आणि शेतकऱ्यांसाठी भरभराटीचे युग म्हणून पाहत आहोत. आपल्या शेतीमध्ये येत असलेल्या या क्रांतीला आम्ही नाव दिले आहे – फार्मिंग 3.0. या नव्या टप्प्यामध्ये स्मार्ट फार्म मशीनरी, सूक्ष्म सिंचन, प्रिसिजन फार्मिंग, डिजिटल सुविधा व भागधारकांशी भागीदारी अशा नावीन्याचा समावेश आहे.
स्मार्ट फार्म मशीनरी म्हणजे कमी गोष्टींच्या सहाय्याने अधिक उत्पादन घेणे. स्मार्ट मशीन व तंत्रज्ञानातील प्रगती यांच्यामध्ये उत्पादन वाढवण्याची, खर्च कमी करण्याची व शेतीचे उत्पन्न वाढवण्याची क्षमता आहे.
सूक्ष्म सिंचनामुळे शेतकऱ्यांना मान्सूनच्या अनिश्चिततेपासून चिंतामुक्त केले जाते. तसेच, भारतातील मर्यादित जलस्रोतही वाचवले जातात. भारतातील एकूण अपारंपरिक जलस्रोतांपैकी 80 टक्के पाणी शेतीसाठी वापरले जाते. पाणी थेट पिकांच्या मूळाशी घातले जाते अशा सूक्ष्म सिंचन पद्धतींचा अवलंब केल्यास आपल्या मौल्यवान जलस्रोतांचे संवर्धन होण्यासाठी मदत होणार आहे आणि त्याच वेळी, शेतीचे उत्पन्न व उत्पादकता यांनाही चालना मिळणार आहे.
प्रिसिजन फार्मिंग हे महत्त्वाचे नावीन्य आहे. हा शेतीच्या व्यवस्थानाप्रतीचा दृष्टिकोन असून त्यामध्ये पिके व माती यांना उत्कृष्ट आरोग्य व उत्पादकता यासाठी नेमके काय हवे आहे, तेच देण्याच्या दृष्टीने पीक, माती, हवामान आदीविषयी रिअल टाइम माहिती मिळवण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.
ग्राहकांना थेट ग्राहकांच्या संपर्कात नेण्याची क्षमता डिजिटल सुविधांमध्ये आहे. यामुळे संपूर्ण व्यवस्थेतून मध्यस्थ नाहीसे होतील आणि शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी संपूर्ण व योग्य भाव मिळेल. उदा. सरकार काही राज्यांत फळे व भाज्या यांच्या विक्रीसाठी एपीएमसी (कृषी उत्पादन बाजार समित्या) eNAM या राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक व्यासपीठावर नेण्यासाठी काम करत आहे. शेतीच्या डिजिटायझेशनमध्ये देशभरातील शेतकऱ्यांना एकमेकांच्या व शेतीतज्ज्ञांच्या संपर्कात आणून त्यांच्या उत्पादकतेत वाढ करता येईल.
भागधारकांशी भागीदारी म्हणजे भागीदारांच्या विस्तृत व्यवस्थेशी सहयोग करणे आणि त्यांना शेतीतील सध्याच्या व आगामी आव्हानांवर उपाय करण्यासाठी सहभागी करून घेणे. यामध्ये, कृषी महाविद्यालये, संशोधन संस्था, शास्त्रज्ञ, व्यावसायिक गुंतवणूकदार, निधी देणाऱ्या संस्था, प्रभावशाली घटक, सरकार आणि लोक यांच्याबरोबर काम करणे समाविष्ट आहे.
फार्मिंग 3.0 मुळे शेतीबद्दलचा दृष्टिकोन उदरनिर्वाहाच्या शेतीकडून शाश्वत शेतीकडे वळतो आहे. शेतीशी संबंधित घटकांनी या नव्या क्रांतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावायची असेल तर शेतकऱ्यांबरोबर काम करणे आणि सूक्ष्म सिंचन, पीकनिगा, आधुनिक बियाणी व डिजिटल सुविधा अशा महत्त्वाच्या तंत्रज्ञानांमध्ये गुंतवणूक करणे गरजेचे आहे. तंत्रज्ञान व नावीन्य यामुळे भक्कम पाया घातला जाईल आणि त्यामुळे फार्मिंग 3.0 या नव्या क्रांतीला चालना दिली जाईल. यामुळे शेतक्यांचे उत्पन्न दुप्पट करणे व फार्मटेक प्रॉस्परिटी हे उद्दिष्ट साध्य होण्यासाठी मदत होईल.




