देश- विदेशातील विविध कंपन्यांची कृषी उत्पादने एकाच छताखाली
नाशिक : ह्युमन सर्व्हिसेस फाऊंडेशन व मीडिया एक्झीबीटर्स यांच्या वतीने आयोजित पाच दिवसीय कृषीथॉन-2019 आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन गुरूवारी (दि.21) रोजी सकाळी दहा वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. ठक्कर डोम, एबीबी सर्कल, नाशिक येथे होत असलेल्या या प्रदर्शनात देश- विदेशातील कृषी व कृषी संलग्न तीनशे नामांकित कंपन्यांचे अत्याधुनिक उत्पादनाचे स्टॉल्स असणार आहेत. प्रदर्शनाचे यंदाचे 14 वर्ष असून कृषी क्षेत्राशी निगडीत सर्वच घटकांना हे प्रदर्शन अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याची माहिती कृषीथॉनचे आयोजक संजय न्याहारकर व साहिल न्याहारकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संजय न्याहारकर म्हणाले की, 1998 पासून नाशिक येथे कृषीथॉन या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे. यात नवनवीन तंत्रज्ञान, संकल्पना, संधी आणि आव्हानांवर चर्चा घडवून कृषी क्षेत्राच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. भारतातील कृषी क्षेत्रात नाशिक जिल्हा हा अव्वल स्थानी आहे. द्राक्ष, डाळींब, कांदा, भाजीपाला यांच्या उत्पादनात अग्रेसर आहे. विशेषत: नाशिक जिल्ह्यातील शेतकरी कृषी तंत्रज्ञान आत्मसात करण्यात देखील पुढे आहेत. नाशिक क्षेत्रातील कृषी क्षेत्र आणि उत्पादनास आंतरराष्ट्रीय पातळीवर नेेण्यासाठी कृषीथॉनची भूमिका मोलाची राहिली आहे. कृषीथॉन हे देशातील अग्रगण्य कृषीप्रदर्शन म्हणून ओळखले जाते. यात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे तीनशेपेक्षा अधिक स्टॉल्स लागणार आहेत. तसेच शासनाच्या कृषी व कृषीपुरक व्यवसायांच्या विविध योजनांबाबत माहिती देणारे स्टॉल्स आहेत.
या वर्षीचे आकर्षण म्हणजे अॅग्री ट्रेड मीडिया या बहुभाषिक नियतकालिकाचा शुभारंभ होणार आहे. या नियतकालिकात कृषी मशिनरीचे उत्पादक, विके्रते व शेतकरी यांच्यासाठी उपयुक्त बातम्या आणि माहिती प्रसिद्ध केली जाणार आहे.
यंदा प्रदर्शनात दीड लाखांहून अधिक शेतकरी, उद्योजक भेटी देतील असा अंदाज आहे. प्रदर्शनात परिवसंवाद, चर्चासत्र, बी टू बी मिटींग, कृषीमाल खरेदीदार आणि विक्रेता मेळावा, युवकांचा कृषीतील सहभाग आणि त्यांच्या कार्याबद्दल कृषीथॉन युवा सन्मान पुरस्कार देण्यात येणार आहेत. या माध्यमातून कृषीक्षेत्र व पूरक उद्योगातील संधी, रोजगार निर्मिती, कृषीमाल विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देेणे यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यंदा पाण्याची उपलब्धता वाढल्याने रब्बीचा मोसम चांगला जाण्याची शक्यता असून प्रदर्शनाला विक्रमी गर्दी होण्याचा विश्वास संजय न्याहारकर यांनी व्यक्त केला आहे.
प्रदर्शनात मृदा संवर्धन संदेश
यंदा प्रथमच माती संवर्धन जनजागृतीसाठी जवळपास 500 गावातून सरपंच, शेतकरी यांच्या माध्यमातून मृदा संकलित करण्यात आली असून या उपक्रमाच्या माध्यमातून मृदा संवर्धनासाठी प्रयत्न केला जात आहे. या उपक्रमाचाच एक भाग म्हणून प्रदर्शनात दररोज 25 ते 50 शेतकरी, सरपंच यांचा सत्कार करून त्या-त्या गावांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाणार असल्याचे साहिल न्याहारकर यांनी यावेळी सांगितले.
नैसर्गिक आपत्तीवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन
यंदा अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. अशा वेळी शेतकर्यांनी पुढील काळात काय नियोजन करावे? याबाबत कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे.
असे असतील प्रदर्शन कालावधीतील कार्यक्रम
प्रदर्शनात गुरूवारी (दि.21) राज्यस्तरीय दुग्ध परिसंवाद व चर्चासत्र होईल. यात दुग्धतज्ज्ञ डॉ. शैलेश मदाने मार्गदर्शन करतील. तर देशी गोवंश संवर्धन या विषयावर डॉ. सुरेश गंगावणे मार्गदर्शन करतील.
शुक्रवारी (दि.22)सकाळी 11 ते 2 या वेळेत महाखरेदीदार-विके्रता संमेलन होईल, यात राज्याचे माजी अप्पर सचिव डॉ. सुधीर गोयल मार्गदर्शन करतील. तर दुपारी 3 ते 5 या वेळेत कृषीथॉन युवा सन्मान व संवाद होईल. यात सामाजिक व आर्थिक विकासासाठी ग्रामीण युवकांचे सक्षमीकरण या विषयावर आर्थिक घडामोडीचे अभ्यासक मिलिंद मुरूगकर हे मार्गदर्शन करतील.
शनिवारी (दि.23) रोजी 10 ते दुपारी साडेबारा या वेळेत कृषीथॉन युवा सन्मान व संवाद कार्यक्रमात हवामान बदल आणि शेती या विषयावर हवामान अभ्यासक अभिजित घोरपडे मार्गदर्शन करतील. तसेच महिलांचा सन्मान सोहळा होईल. दुपारी 3 ते 5 या वेळेत शाश्वत डाळींब शेती या विषयावर डाळींबरत्न बाळासाहेब गोरे मार्गदर्शन करतील. या शिवाय सकाळी 11 ते 2 या वेळेत बीटुबी मिटींगमध्ये डिलर्स, डिस्ट्रिब्युटर, सी अॅन्ड एफ, व्यवसायिक भागीदारी, व्यवसायिकांच्या व्यवसायिक भेटी होतील.
रविवारी (दि.24) रोजी सकाळी दहा ते साडेबारा वाजता कृषीथॉन युवा सन्मान संवाद होणार आहे. तसेच शेतीतील प्रयोगशीलता व व्यवसायिक दृष्टीकोन या विषयावर ज्ञानेश्वर बोडके (अभिनव फार्मर) यांचे मार्गदर्शन होणार आहे.तर दूपारी 1 ते 3 वाजेच्या दरम्यान आदर्श जलसंवर्धन पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. यात पाटोदा (जि. औरंगाबाद) येथील सरपंच भारस्कराव पेरे पाटील मार्गदर्शन करणार आहेत. याच दिवशी दुपारी 3 ते साडेपाच पर्यंत राज्यस्तरीय द्राक्ष शेती परिसंवाद होईल. यात निर्यातक्षम द्राक्ष विषयावर अमित पडोळ, द्राक्ष उत्पादनात खत व अन्नद्रव्य व्यवस्थापन विषयावर बिपीन चोरगे यांचे तर द्राक्ष शेतीत संजीवकांचा सुयोग्य वापर या विषयावर मंगेश भास्कर मार्गदर्शन करतील.
सोमवारी (दि.25) रोजी सकाळी 10 ते 12 वाजेच्या दरम्यान कृषीथॉन युवा सन्मान संवाद होणार आहे. तसेच विषमुक्त शेती व युवकांचा सहभाग या विषयावर मान्यवरांचे मागदर्शन होईल. या शिवाय 11 ते 2 या वेळेत कृषी क्षेत्रातील नवीन संधी शोधणार्या प्रशिक्षित व कृषी पदवी, पदविका विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देणारा अॅग्रो करिअर जॉब फेअर उपक्रम होईल. यात प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या जातील. दरम्यान प्रदर्शन सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत खुले राहील.




