नाशिक : प्रतिनिधी नाशिकमधील शेतकरी कृषी क्षेत्रात प्रयोगशील म्हणून ख्यात आहेत. उत्पन्न वाढ आणि निर्यातीत नाशिक जिल्ह्याचे देशात नाव आहे. देशाच्या जीडिपीत शेतीचा वाटा कमी धरला जातो. कारण कृषी उत्पन्नाचा दर बांधावर ठरवला जातो. एक हंगाम खराब नुकसानग्रस्त झाला तर शेतकर्यांचे होत्याचे नव्हत होतेे. शेतीत सर्वकष धोरण नसल्याने बाजारभावावर परिणाम होतो.शेतकरी आत्महत्या ही शेती क्षेत्रातील मोठी समस्या आहे. ती उत्पन्न वाढीसाठी केलेला अधिक खर्च निघत नसल्याने वाढलेली आहे. शेती उत्पन्न दूप्पट करण्याच्या नादात वाढलेला रासायनिक खते, कीटकनाशकाचा वापर हा शेतकर्यांना आर्थिक झळ सोसायला लावणारा आहे. तर समाजाला कॅन्सरसारख्या आजाराच्या विळख्यात लोटणारा ठरला आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.सूरज मांढरे यांनी केले.
ह्युमन सर्व्हिसेस फाऊंडेशन व मीडिया एक्झीबीटर्स यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या पाच दिवसीय कृषीथॉन-2019 आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन गुरूवारी (दि.21)त्र्यंबकरोडवरील एबीबी सर्कल परिसरातील ठक्कर डोम येथे झाले. त्यावेळी जिल्हाधिकारी मांढरे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर बीजमाता राहीबाई सोमा पोपेरे, विभागीय कृषी सहसंचालक संजय पडवळ,महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. जयंत जायभावे, आत्मा प्रकल्प उपसंचालक हेमंत काळे, सॅमसोनाइट कंपनीचे यशवंत सिंग, सोल्युबल फर्टीलायझरचे राजीव चक्रवती, जिल्हा कृषी अधिक्षक सांगळे, नाडाचे संस्थापक अध्यक्ष विजयनाना पाटील, जिल्हाध्यक्ष भगवाननाना खैरनार, नवीनभाई ठक्कर, लोकेश शेवडे,राजेंद्र गायकवाड यांच्यासह कृषीथॉनचे आयोजक संजय न्याहारकर, साहिल न्याहारकर, आश्विनी न्याहारकर आदीं मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते कृषीथॉनच्या वतीने राहीबाई पोपेरे यांना 21 हजार रूपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. तसेच जागतिक मत्स्य व्यवसाय दिननिमित्त फलकाचे अनावरण करण्यात आले. तर. संदीप गायकर यांनी लिहीलेल्या मदरसीड या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच नाडाचे संस्थापक अध्यक्ष विजयनाना पाटील यांचा गौरव यावेळी करण्यात आला.
मातीचे आरोग्य कीटकनाशक, रासायनिक खतांनी बिघडलेःराहिबाई पोपेरे
जमिनीतून जादा उत्पन्न घेण्यासाठी नैसर्गिक खतांचा वापर कमी झाला आहे.रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा अति वापर केल्याने पीकांमध्ये त्यांचा घटक वाढला. त्याचबरोबर जमिनीचा कस घटला आहे. अशी पिके खाल्यामुळे जनतेला अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. मातीचे आरोग्य खालावले आहे. शेतीचे आरोग्य लहान बाळासारखे आहे, त्याला अति कीटकनाशक आणि रासायनिक खतांचा मारा करून बिघडू नका, असे आवाहन बीजमाता राहीबाई पोपेरे यांनी कृषीथॉनमध्ये शेतकर्यांना केले. पारंपारिक वाणांचे जतन करण्याची प्रेरणा मिळाल्याचे सांगताना राहीबाई पोपेरे म्हणाल्या की, आपल्या घरी 10-12 एकर शेती आहे. या शेतीत पिक काढल्यानंतर ते खालले की लहान मुलांसह घरातील सर्वांनाच आजारपणाला सामोरे जावे लागायचे, याचा बारकाईने विचार केल्यानंतर लक्षात आले की, पूर्वी असे आजार कोणाला होत नव्हते, मग आताच असे आजार का वाढले आहेत, हे लक्षात घेतले. शेतात आपली मुले पिक घेताना शेतीत शेणखत, पारंपारिक वाणांचा वापर टाळून विविध रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा अतिवापर करण्याबरोबरच संकरित वाणांचा उपयोग अधिक करीत असल्याचे आढळले. त्यामुळे हायब्रीड खावून घरात आजार बळावत असल्याचे मला जाणवले. त्यामुळे आपण स्वतः शेतीत जावून जमीनीची सुपीकता राखण्यासाठी सेंद्रिय खतासाठी पालापाचोळा, शेणखत, गांडूळखत, राखेचा कीटकनाशक म्हणून उपयोग केला. त्या पिकातून निघालेले बी घरी राखेत आणि मातीच्या भांड्यात साठवून पारंपारिक बियाणांचे संकलन केले. त्यातूनच पुढे पारंपारिक पद्धतीचे पिक घेतले. त्यामुळे जे पीक आले ते घरात वापरल्याने आपोआपच कुटुंबातील आजार कमी झाले. हाच प्रयत्न गावात बचत गटाच्या माध्यमातून राबवून प्रत्येकाला अस्सल बियाणे वाटप करण्यासाठी घरातच गावराण बियाणांची बॅक तयार केल्याचे पोपेरे यांनी यावेळी नमूद केले. डॉक्टरांकडे जाणारे जेव्हा आजाराची कारण विचारतात. तेव्हा त्यांना पिकांवरील रासायनिक घटकांचा अति वापर हा आजाराला कारणीभूत असल्याचा दाखला डॉक्टरांकडून दिला जातो. घात आजारांची लागण पिकांमुळे होतेय, हे आता सर्वच म्हणतात. त्यामुळे शेतकर्यांनी पारंपारिक पद्धतीने शेती करून रासायनिक खते, कीटकनाशके, आणि हायब्रीड बियाणांचा वापर टाळून पारंपारिक पिकांकडे वळले पाहिजे, असे पोपेरे म्हणाल्या. कमी उत्पन्न घ्या आणि भावी पिढीचे आरोग्य रक्षण करा, असे भावनिक आवाहन पोपेरे यांनी शेतकर्यांना केले. त्या म्हणाल्या की, शेतकरी आत्महत्या या शेतीवर खूप खर्च करण्याच्या शेतकर्यांच्या वृत्तीमुळे होत आहे. हा वाढीव खर्च खतांचा अतिवापर आणि अधिक तणनाशके वापरण्यासाठी होतो. कर्जबाजारी होऊन शेती करण्यापेक्षा कमी खर्चात चांगले उत्पन्न देणारी सेंद्रिय पद्धतीने विषमुक्त शेती करण्याचे आवाहन पोपेरे यांनी यावेळी केले.
कृषीथॉनचे आयोजक संजय न्याहारकर यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी प्रदर्शनाची माहिती देताना विविध उपक्रम आणि यंदाच्या प्रदर्शनात मृदा संवर्धनाची संकल्पना स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, यंदा शेतकर्यांना अतिवृष्टीने फटका दिला असला तरी प्रदर्शनात विविध मान्यवरांची चर्चासत्रे नैसर्गिक संकटावर कशी मात करावी, याचे दिशादर्शन करण्यासाठी आयोजित केलेली आहे. तसेच देश-विेदेशातील कृषी उत्पादन क्षेत्रातीत कंपन्याचे स्टॉल्स येथे असल्याने अद्ययावत शेती तंत्रज्ञान आणि माहितीचे अदान-प्रदान होणार आहे. शेतीसंबंधीत सर्वच घटकांना अॅग्री ट्रेड मीडिया या मासिकाचे प्रकाशन करण्यात येणार असल्याने त्याच्या माध्यमातून शेतकरी, कृषी उत्पादक, विके्रते यांना माहिती मिळणार आहे. कृषीथॉन मार्गदर्शक ठरणार असल्याचे न्याहारकर यांनी यावेळी म्हटले.
नाशिक विभागीय कृषी सहसंचालक संजय पडवळ यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. त्यांनी कृषीथॉन प्रदर्शन आयोजनासाठी संजय न्याहारकर आणि त्यांच्या सहकार्यांचे यावेळी कौतुक केले. तसेच कृषीथॉनच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती शेतकरी आणि शेतीपूरक घटकांना जाणार असल्याने कृषी विभागाला हे प्रदर्शन पूरक असल्याचे सांगितले. शेतकरी हित जोपासणारे हे प्रदर्शन असल्याचे पडवळ यांनी यावेळी नमूद केले.नाशिकचे शेतकरी प्रगतशील असल्याने त्यांना कृषीथॉन हे पथदर्शक ठरते, असे म्हणत पडवळ यांनी कृषीथॉनमधील उपक्रमांचे यावेळी कौतुक केले. तसेच ते म्हणाले की, नाशिक जिल्ह्यात अल्पभुधारक शेतकर्यांचे प्रमाण सुमारे 78 टक्के असून या शेतकर्यांना कोरडवाहू शेती करावी लागते. त्याचबरोबर त्यांना आधुनिक शेतीचे मार्गदर्शनही हवे असते. कृषीथॉनमध्ये ते मिळते,असे प्रतिपादन पडवळ यांनी शेवटी केले.
बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. जयंत जायभावे यांनी कृषीथॉनच्या 14 वर्षाच्या वाटचालीचा गौरव केला. तसेच आयोजक संजय न्याहारकर यांच्याबरोबर साहिल न्याहारकरही या उपक्रमात योगदान देत असल्याने कृषीथॉनमधून कृषी क्षेत्राला आधुनिकेतेची गती आली असल्याचेअॅड. जायभावे म्हणाले. त्यांनी हे प्रर्दशन व्यवसायच नव्हे तर, शेतकर्यांना आंतरराष्ट्रीयस्तरावर व्यवसाय करण्याचे मार्गदर्शनही करते, असे म्हटले.कृषीथॉनच्या व्यासपीठावर आंतरराष्ट्रीय शेती क्षेत्रातील घटक एकत्र येत असल्याने ही बाब कौतुकास्पद आहे, असे जायभावे म्हणाले. ह्युमन सर्व्हिसेस फाऊंडेशनचे संचालक सतीश पाटील यांनी आभार मानले. डॉ.वसंत ढिकले यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी कृषीथॉनमध्ये सहभागी झालेले स्टॉलधारक, विविध भागातून आलेले शेतकरी, कृषी अभ्यासक, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.





