-अवकाळी पावसाने झालेल्या पिक नुकसानीची पाहणी केंद्रिय वित्त मंत्रालयातील खर्च विभागाचे सल्लागार दिना नाथ व शेतकरी कल्याण विभागाचे संचालक डॉ. सुभाष चंद्र यांच्या पथकाने जिल्हाधिकारी कार्यालय येथील मध्यवर्ती सभागृहात नाशिक विभाग व जिल्ह्याची आढावा बैठक घेतली.
बैठकीत श्री. माने यांनी नाशिक विभागात एकुण 21.58 लाख हेक्टर बाधित क्षेत्र असून नाशिक, जळगांव, धुळे, नंदुरबार व अहमदनगर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या पिंकाच्या नुकसानीबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
श्री. मांढरे, यांनी जिल्ह्यात एकूण 1961 गावांपैकी 1678 गावात खरीपाची व 283 गावात रब्बी पिके घेतली जातात. याअनुषंगाने 2019-20 या वर्षात खरीपाच्या हंगामात 4 लाख 95 हजार 525 हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली होती. पंरतु ऑक्टोबर- नोव्हेंबर 2019 या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील 1958 गावे व 6 लाख 47 हजार 315 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. बाधित क्षेत्रांमध्ये भात, सोयाबीन, बाजरी, मका, कांदा, द्राक्ष या प्रमुख पिकांचे नुकसान झाले असल्याची माहिती केंद्रीय पथकाच्या अधिकाऱ्यांना दिली.
श्री. पडवळ यांनी नुकसान झालेल्या पिकांमध्ये भाताचे 52 हजार 258 हेक्टर, सोयाबिन 60 हजार 103 हेक्टर, बाजरी पिकाचे 72 हजार 933 हेक्टर, मका पिकाचे 2 लाख 5 हजार हेक्टर, कांदा पिकाचे 54 हजार 408 हेक्टर तर द्राक्ष 55 हजार 965 हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. या पिकांच्या भरपाईसाठी एकुण 599 कोटी रुपयांच्या मदतीची आवश्यकता असून 181 कोटी रुपयांची मदत आत्तापर्यंत प्राप्त झाली असल्याचे त्यांनी यावेळी पथकाच्या अधिकाऱ्यांना सांगितले.
तसेच जिल्ह्यातील लहान व मोठे मिळून 12 लाख 37 हजार 313 पशुधन आहे. यासाठी महिन्याला साधारण 2 लाख 2 हजार 776 मेट्रिक टन इतक्या चाऱ्याची आवश्यकता आहे. परंतु ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे चारा उत्पादनात 60% घट झाली आहे. यावर उपाय म्हणुन रब्बी क्षेत्रातंर्गत गहू, ज्वारी व इतर चारापिकांचे प्रमाण वाढवून चाऱ्याचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. प्रधानमंत्री पिक विमा योजनेतंर्गत साधारण 1 लाख 96 हजार 393 शेतकऱ्यांचे 1 लाख 27 हजार 870 हेक्टर क्षेत्राचा विमा निश्चित करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी सादरीकरणाद्वारे दिली.
या बैठकीस विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस., उपायुक्त रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी निलेश सागर, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ उपस्थित होते.
पीक नुकसानीची केंद्रिय पथकाकडून पाहणी
अवेळी पावसामुळे बाधित झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीबाबत निफाड तालुक्यातील पाचोरे वणी येथील बाळू वाटपाडे यांच्या नुकसान झालेल्या मका पिकाची पाहणी, भास्कर वाटपाडे यांचे सोयाबीन पिकाची तर बाजीराव गंगाधर यांचे द्राक्ष पिक नुकसानीची पाहणी करून संबंधित शेतकर्यासोबत केंद्रीय पथकाने चर्चा केली.
चांदवड तालुक्यातील खडक मालेगांव येथील ज्ञानेश्वर शिंदे यांचे मिरची व द्राक्षे, रंगनाथ शिंदे यांचे सोयाबिन व मका तसेच रंगनाथ पोपट शिंदे यांच्या ज्वारी व बाजरी पिकांची पाहणी केली. दहेगांव येथील अण्णा कनोर व धर्मा कनोर यांच्या कांदा पिकाची, शिंगवे येथील दशरथ शिंदे यांच्या कांदा रोपांची पाहणी केली. निमोण गावातील मनोज ललवाणी व पंढरिनाथ देवरे यांचे कांदा पिकाची तर शंकर गांगुर्डे यांच्या द्राक्ष बागांची पाहणी करून करण्यात आलेल्या पंचनाम्याची तपसणी केली.
मालेगांव तालुक्यातील चौंडी येथील अशोक सरोदे यांचे भुईमुग, लक्ष्मण सरोदे यांचे कांदा व डांळींब पिकाची पाहणी तर वऱ्हाणे गावातील रमेश पवार यांचे कांदा पिकाची तर भाऊसाहेब अहिरे यांचे मका पिकाची पाहणी केली.
यादौर्यादरम्यान संबंधित तालुक्यांचे उपविभागीय अधिकारी अर्चना पठारे, सिद्धार्थ भंडारे, विजयानंद शर्मा यांनी केंद्रीय पथकास आवश्यक माहिती दिली.






