अनेक वर्षांच्या अनुभवानंतरही बहुतांश शेतकरी उत्पादन आणि त्यावर होणार खर्च याचा ताळमेळ साधताना दिसत नाहीत. परिणामी, तोट्यातील शेती करायची कशाला अशा मानसिकतेत अनेकजण वावरताना दिसतात. मात्र, जोपर्यंत आपण शेती ही व्यवसायिक दृष्टीकोणातून करणार नाहीत, तोपर्यंत तोटाच सहन करावा लागेल. बाजारातील सेंद्रिय पिकांच्या मागणीचा विचार करून विषमुक्त शेती केल्यास नक्कीच शेतकर्यांना लाभ होईल असे प्रतिपादन अभिनव फार्म कल्बचे ज्ञानेश्वर बोडके यांनी केले.
ह्युमन सर्व्हिसेस फाऊंडेशन व मीडिया एक्झीबीटर्स यांच्या वतीने आयोजित आयोजित कृषीथॉन-2019 आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात रविवारी (दि.24) कृषीथॉन युवा सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर सेवानिवृत्त कृषी अधिकारी प्रकाश सांगळे, अभिनव फार्म कल्बचे सुनील दराडे, नगरसेवक डॉ. हेमलता पाटील, कृषीथॉनचे आयोजन श्री संजय न्याहारकर, अश्विनीताई न्याहारकर आदी उपस्थित होते. यावेळी प्रयोगशील शेतकर्यांना युवा कृषी सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
ज्ञानेश्वर बोडके म्हणाले की, शेतकर्यांनी काळाबरोबर शेती करण्याच्या पद्धतीत बदल केले पाहिजे. बाजारातील मागणी, कुठल्या बाजारपेठेत कुठल्या उत्पादनाला चांगला भाव आहे. तसेच कोणत्या मोसमात कोणते पीक घेतल्यास चांगला नफा मिळू शकतो याचा परिपूर्ण अभ्यास करूनच उत्पादन घेतले पाहिजे. हे करत असताना विषमुक्त शेतीला प्रधान्य देण्याची गरज आहे. सध्या रासायनिक खते तसेच इतर घातक रासायनिक खते, तणनाशकांचा अतिरीक्त वापर मानवी आरोग्यास घातक ठरत आहेत. त्यामुळे येत्या काळात विषमुक्त आणि नैसर्गिक उत्पादनाला मागणी वाढताना दिसत आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या उत्पादनातून शेतकर्यांना चांगला लाभ होऊ शकत असल्याचे त्यांनी सांगितले.
निवृत्त कृषी अधिकारी प्रकाश सांगळे यांनी युवकांनी शेतीची कास धरण्याची गरज आहे. सध्या अनेक उच्च शिक्षित तरूण तुटपुंज्या पगाराच्या नोकर्यामागे धावताना दिसत आहेत. मात्र तरूणांनी प्रयोगशील शेती केल्यास कमी श्रमात देखील चांगला नफा मिळविणे शक्य असल्याचे ते म्हणाले.
सुनील दराडे यांनी आज शेती क्षेत्रात तरूण मोठ्या प्रमाणावर येताना दिसत असून ही आंनदाची बाब आहे. नवनव्या प्रयोगातूनत शेती क्षेत्र अधिक समृद्ध होणार असल्याने प्रयोगशील शेती करण्याचे आवाहन केले.
नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांनी युवा शेतकर्यांचे शेती क्षेत्रातील योगदान कौतुकास्पद असून शेती क्षेत्रात असलेल्या संकटावर तरूणांनींच उपाय शोधून मात केली पाहिजे असे सांगितले.
कृषीथॉनचे आयोजन संजय न्याहारकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. तर अश्विनीताई न्याहारकर यांनी आभार मानले. डॉ. वसंत ढिकले यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी युवा शेतकरी मोठ्या संख्यने उपस्थित होते.





