पुणे,नाशिक,दि.२८ नोव्हेंबर :- फादर दिब्रिटो व्हॅटकीन येथे गेले असता तेथे अनेक धर्मगुरु होते. त्यावेळी फादर दिब्रिटो यांनी हातात बायबल सोबतच तुकोबाची गाथा देखील घेतली होती. याठिकाणी इतर धर्मांच्या प्रार्थनांबद्दल विचारायचे तेव्हा फादर तुकोबाच्या गाथेविषयी बोलायचे. यावेळी त्यांनी तुकोबाच्या ग्रंथांच्या ओळी आवर्जून गाऊन दाखविल्या. त्यामुळे फादर फ्रान्सिस दिब्रिटो म्हणजे तुकारामाची गाथा ख्रिश्चनांच्या पंढरीत पोहोचवणारा माणूस अशी ओळख असलेले हे व्यक्तिमत्व असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांनी केले. ते आज महात्मा जोतीराव फुले यांच्या १२९ व्या पुण्यतिथी निमित्त फुले वाडा समता भूमी पुणे येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेकडून आयोजित समता पुरस्कार सोहळ्याप्रसंगी बोलत होते.आज त्यांच्या हस्ते ९३ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा महात्मा फुले समता पुरस्काराने गौरव करण्यात आला. फुलेपगडी, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, १ लक्ष रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ.श्रीपाल सबनीस,प्रा हरी नरके, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहळ,माजी आमदार पंकज भुजबळ, कमलताई ढोले पाटील,समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ,प्रदेश उपाध्यक्ष शिवाजीराव नलावडे, डॉ.कैलास कमोद,पुण्याचे उपमहापौर सरस्वती शेंडगे, माजी महापौर अंकुश काकडे, वैशाली बनकर, नगरसेविका आरती कोंढरे, मनीषा लडकत, अजय खेडेकर, , महिला प्रदेशाध्यक्ष मंजिरी धाडगे,डॉ.शेफाली भुजबळ,ललिता सबनीस,दिलीप खैरे, ऍड.सुभाष राऊत,अंबादास गारूडकर, दीपक कुदळे, प्रा.दिवाकर गमे, सुनील सरदार, नगराध्यक्ष सुनील मोरे,बाळासाहेब कर्डक, मनोज घोडके,पंढरीनाथ बनकर, प्रितेश गवळी, ऍड.चंद्रशेखर भुजबळ, समाधान जेजुरकर, रवी चौधरी, भवरलाल चौधरी, भालचंद्र भुजबळ यांच्यासह राज्यभरातील समता सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, सर्व धर्माचा विचार हा समतेचा आहे. मानवता आणि मानवतेचे रक्षण करण ही सर्व धर्माची शिकवण आहे. त्या समतेच्या विचारांचा प्रसार करणाऱ्या फादर दिब्रिटो यांना दिलेला पुरस्कार हा योग्य आहे. महात्मा फुले यांनी समाजकारण करीत असतांना सर्व जातीधर्माच्या लोकांना बरोबर घेत समता प्रस्थापित केली. त्यांच्या विचारांची जोपासना शरद पवार साहेब यांच्या आईवडिलांनी केली ते सत्यशोधक विचारांचे पुरस्कर्ते होते. त्यामुळे महात्मा फुले यांचे समतेचे विचारांचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून पवार साहेबांनी महात्मा फुले यांचे साहित्य समता परिषदेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविले. तसेच मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे तर पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यास महत्वाचे योगदान असल्याचे सांगितले. त्याच शरद पवार साहेबांनी आज राजकीय पटलावर माझा पुनर्जन्म केला असे त्यांनी यावेळी सांगितले.ते म्हणाले की, प्रबोधनकार ठाकरे यांनी महात्मा फुले यांच्या विचारांची जोपासना केली. पुढे स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी देखील जातीपातीचा विचार न करता महाराष्ट्रात काम केले. आज त्यांच्या विचारांचे सरकार स्थापन होत असून किमान समान कार्यक्रमांची अंमलबजावणी करून राज्याला उन्नतीकडे नेण्यासाठी प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले. तसेच समता भूमी हे आपल्यासाठी शक्तीपीठ असून येथून ऊर्जा घेऊन आपण काम करत असतो. या चळवळीत समता परिषदेच्या कार्यकर्त्यांचे योगदान महत्वाचे असून अडचणीच्या काळात भुजबळ कुटुंबियांच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या सर्व जनतेला मी कधीच विसरू शकणार नाही असे त्यानी यावेळी सांगितले.यावेळी फादर फ्रान्सिस दिब्रिटो म्हणाले की, ख्रिश्चन क्रांतीमध्ये मुक्तीचे तत्वज्ञान मध्ये महात्मा फुले यांचे साहित्य पुढे आले. ज्यू धर्माच्या पहिल्या धर्मामध्ये काही वाईट घटना आहे. प्रभू येशू ख्रिस्तांनी त्यात सुधारणा केल्या स्त्रीला सन्मान देण्याचे शिकविले. महात्मा फुलेंच्या विचारसरणीमध्ये प्रभू येशू ख्रिस्तांची विचारधारा दिसून आली. फुलेंच्या कार्याचा गाभा हा बायबलमध्ये दिसून येतो असे त्यांनी यावेळी सांगितले.ते म्हणाले की, द्वेषावर आधारित राजकारण टिकत नाही. शोषित पीडित प्रदेशाला विकासाकडे न्यायचे आहे. त्या काळात शोषित पीडित जनतेला आधार देणारे तसेच शेतकऱ्यांची बाजू घेणारे महात्मा फुले हे देशातील प्रथम कैवारी होते. त्यांनी शेतकऱ्यांसाठी दिलेले योगदान महत्त्वाचे आहे. मात्र आज महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या हा चिंतेचा विषय असून महाराष्ट्रासाठी भूषवाह गोष्ट नाही. त्यामुळे आगामी सरकारचा लाभार्थी हा शेतकरी असावा असे आवाहन त्यांनी केले. महात्मा फुले यांचे शेतकऱ्यांचा आसूड हे जगातील श्रेष्ठ अभिजात साहित्य आहे. ज्यांना फुले समजले त्यांच्या विचारांचा पाया हा शेतकरीच असला पाहिजे. त्यामुळे प्रजा भिकारी आणि राजा शिकारी ही विद्यमान स्थिती बदलायला हवी असे सांगून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवून आगामी काळात आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यावेळी ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस म्हणाले की,दिल्ली आणि मुंबईच्या सत्तेत फुलेंच्या विचारांची माणसे आली पाहिजे. समता परिषदेची वाटचाल देशाला दिशा देणारी आहे. समाजकारण करत असताना छगन भुजबळ यांनी वंचित पिडितांसाठी महत्वाचे योगदान दिले आहे. त्यांनी हे कार्य अविरतपणे सुरू ठेवावे असे सांगून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेकडून समता पुरस्कारासाठी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची योग्य निवड केली असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
यावेळी प्रा. हरी नरके यांनी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या २७ वर्षाच्या यशस्वी वाटचालीमध्ये झालेल्या सामाजिक कार्याची माहिती उपस्थितांसमोर मांडली. यावेळी महापौर मुरलीधर मोहळ, प्रा.डॉ. नागेश गवळी यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बापूसाहेब भुजबळ यांनी तर सूत्रसंचालन विजय लडकत यांनी केले.






