सोशल मिडीयाच्या वाढत्या वापरामुळे आभासी संपर्क वाढला पण नात्यातील ओलावा कमी झाला आहे. यापूर्वी आप्तेष्ट, मित्र मंडळी भेटून वार्तालाप करत असत त्यामुळे नातेसंबंध दृठ होत असत.
नातेसंबंध जपण्यासाठी आपण विनानिमित्त भेटले पाहिजे हे ओळखून येथील श्री पद्मावती केटरर्स चे संचालक राहुल भावे यांनी भेटूया सहजच “चहा प्यायला व गप्पा मारायला” या उपक्रमाची १ जानेवारी पासून सुरुवात केली आहे. प्रारंभीस प्रायोगिक तत्वावर १ ते १५ जानेवारी दरम्यान कोणीही नाशिककर आपल्या मित्र परिवार, आप्तेष्टांसोबत दुपारी ४ ते ६ , तिडके कॉलनी येथील ऋग्वेद मंगल कार्यालय येथे येऊ शकतो व चहा सोबत गप्पा टप्पा मारू शकतो. महत्वाचे म्हणजे यासाठी कोणतेही शुल्क नसून चहाचा खर्च देखील आयोजक करणार आहेत.
फक्त समाज माध्यमावर गप्पा करण्यापेक्षा प्रत्यक्षात एक दुस-या सोबत वेळ व्यतीत केल्याने जीवनातील ताण तणाव कमी होऊ शकतात तसेच नव्या कल्पनांचाही उदय होऊ शकतो असे सांगतांना राहुल भावे म्हणाले की, सोशल मिडीयावर आपण जो प्रतिसाद देतो तो हृदया पर्यंत कधीच पोहचत नाही. पण भेटून आनंदाने पाठीवर मारलेली एक थाप, एक टाळी, एक मिठी, एखादी चापट किंवा नावाचा अपभ्रंश करून मारलेली हाक या सर्वांची मजा प्रत्यक्ष भेटल्याशिवाय येत नाही. त्यामुळेच “चाय तो बस एक बहाना है, दोस्तो के साथ कुछ वक्त बिताना है” याच भावनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचेही त्यांनी नमूद केले.




