बालहक्कासह अन्य विविध मुद्यांवर महोत्सवात करणार जनजागृती
नाशिक: देशातील सर्वात मोठे वाईनमेकर असलेल्या सुला विनयार्डस्तर्फे नाशिकमध्ये सुलाफेस्ट 2020 चे आयोजन केले आहे. या महोत्सवात सुलातर्फे स्वयंसेवी संस्था (एनजीओ) यांना दरवर्षी व्यासपीठ उपलब्ध करून देत असते. यावर्षी सुलाफेस्ट थेट युनायटेड नेशन्सशी संलग्न असलेल्या युनायटेड नॅशनल्स चिल्ड्रन्स इमेरजनसी फंड (युनिसेफ) या आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थेशी जोडले गेल्याची अभिमानास्पद बाब आहे. वंचित मुलांच्या कल्याणासाठी देणगी प्राप्त करून देण्याचे सुलाफेस्टद्वारे प्रयत्न केले जाणार आहेत.
याविषयी महोत्सवाचे प्रमुख व सुला विनयार्डस्चे वरीष्ठ उपाध्यक्ष मोनित ढवळे म्हणाले, की युनिसेफसोबत काम करणे ही सुलासाठी गौरवशाली बाब आहे. यापूर्वी आम्ही बऱ्याच स्वयंसेवी संस्थांच्या कार्याला महोत्सवाच्या माध्यमातून हातभार लावलेला आहे. पण वंचित मुलांसाठी काम करत त्यांचे हक्क मिळवून देतांना, क्षमता वाढीसाठी तब्बल 190 देशांमध्ये कार्यरत असलेली युनिसेफ ही यांमध्ये सर्वात मोठी संस्था ठरणार आहे. कंपनी म्हणून सुला काही सामाजिक मुद्यांवर अत्यंत संवेदनशील राहिली आहे. यात प्रामुख्याने पर्यावरण संवर्धन आणि ग्रामीण भागाच्या विकासावर नेहमीच भर दिला गेला आहे. युनिसेफचे सामाजिक दायित्त्व सुलाशी मिळते-जुळते आहे.
संगीत व वाईन फेस्टीव्हल असलेला सुलाफेस्ट हा देशातील सर्वाधिक पर्यटक भेटी देत असलेल्या महोत्सवांपैकी एक आहे. दरवर्षी सुमारे काही हजार व्यक्ती महोत्सवात सहभागी होत दोन दिवस धम्माल करत असतात. फेब्रुवारीतील पहिल्या विकएंडला होणाऱ्या या महोत्सवात द्राक्ष छाटणीचा हंगाम, मधुर संगीत लहरींसोबत साजरा केला जात असतो.
युनीसेफ सुलाफेस्टमधे ‘फेअर टेल्स’ या त्यांचा अधिकृत प्रतिनिधीमार्फत या महोत्सवात सहभागी होतांना चिमुकल्यांचे हक्क, कुपोषण, नवजातशिशू काळजी विभाग (एसएनसीयु) आदी विषयांसंदर्भात जनजागृती करणार आहेत. हे प्रतिनिधी सहभागी पर्यटकांशी संवाद साधतांना व त्यांना आपले उद्देश विशद करतांना सामाजिक कार्यासाठी देणगी गोळा करणार आहेत. याकरीता फेस्टमध्ये विशिष्ट जागा दिली जाणार असून, तेथून ते आपले कार्य मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत पोहचवू शकणार आहेत. यंदा युनीसेफकडू एसएनसीयुवर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. या माध्यमातून मुदतीपूर्व जन्मलेल्या (प्री-मॅच्युअर) बाळांना प्रसुतीनंतरचा पहिला महिना अत्यंत काळजी करण्याची आवश्यकता असल्याने, यासंदर्भात जनजागृती, समुपदेशन केले जाणार आहे. सुलाफेस्टमध्ये उत्कृष्ट मंडळीचा लक्षणीय सहभाग असल्याने महोत्सवाचा आनंद लुटण्यासह युनीसेफच्या सामाजिक उपक्रमालाही नक्कीच हातभार लागेल, यात शंका नाही.




