घरची परिस्थिती बेताचीच.. एकूण तीन भावंडे, आई वडील असा परिवार… वडील हे मुक्त विद्यापीठात सिक्युरिटी गार्ड म्हणून तर आई दुसर्यांच्या शेतात मोलमजुरी करायची. वडिलांना जेमतेम पगार.. त्यातून आपल्या तीन अपत्यांचे शिक्षण आणि संसाराचा गाडा हाकणे म्हणजे तारेवरची कसरतच. या सगळ्या अडचणींवर मात करत स्वत:ला यशस्वी सिध्द करण्याचे शिवधनुष्य पेलले आहे त्र्यबंकेश्वर तालुक्यातील साप्ते कोणे या गावातील किशोर पवार या तरुणाने. आपल्या शिक्षणाचा भार कुटुंबावर न टाकता मुक्त विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्र नाशिक येथून बी.एसी (ॲग्रीकल्चर) ही पदवीचे शिक्षण घेत असतांना गिरणारे येथील एका नर्सरीत तीन वर्ष काम केले. या कामाचा अनुभव व घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग करत साप्ते कोणे येथे डोंगरपायथ्याशी असलेल्या जमीनवर त्याने स्वत:च्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर व कृषि विभागाच्या मदतीने उत्कृष्ट अशी रोपवाटीका साकारली. या माध्यमातून वर्षाकाठी पाच ते सहा लाखाचे उत्पन्न मिळवून स्वत: बरोबर ग्रामस्थांना देखील रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. किशोरचे हे काम सॉफ्ट्वेअरच्या जगात वावरणाऱ्या तरुणाईला एक आदर्श घालून देणारे उदाहरण आहे.
किशोरने महाविद्यालयीन शिक्षण सुरू असतानांच येथील गिरणारे येथे एका नर्सरीत त्याला काम मिळाले. तीन वर्ष सलग काम करून तेथील कामाचा अनुभव व घेतलेली पदवी याचा उपयोग त्याने आपल्या शेतात करायचे ठरविले. या साठी सर्वप्रथम प्रायोगिक तत्वावर आपल्या डोंगरपायथ्याशी असलेल्या शेतजमीनीच्या एका तुकड्याचे सपाटीकरण केले. त्याने काही प्रयोग केले त्यात त्याने निलगिरीच्या बल्ल्यांपासून एक लाकडी स्ट्रक्चर तयार केले व त्यावर ग्रीननेट टाकून आत झोपड्या तयार केल्या व त्यात छोटे बेडस तयार करून छोटी रोपवाटीका सुरूवात केली. रोपवाटिकेमध्ये फळभाज्यांची रोपे तयार केली. आसपाच्या गावात कोठेही नर्सरी नसल्याने गावकऱ्यांना जवळच सोय झाल्यामुळे रोपावाटीकेतील रोपांना मागणी वाढू लागली. आपल्या प्रयोगाला मागणी मिळते आहे हे बघून किशोरचा उत्साह वाढला.
शासनाच्या मदतीने उभारले शेडनेट व शेततळे
साप्ते कोणे या भागातील भौगोलिक रचना बघता या भागात वारा आणि पाऊस जास्त होत असल्यामुळे स्वत: बनविलेले छोटेखानी नेटशेड टिकवणे अवघड झाले. तेव्हा रोपवाटीकेसाठी कायमस्वरूपी पाण्याची उपलब्धता व टिकाऊ शेडनेट कसे करता येईल हा विचार त्याच्या मनाशी घोळू लागला. व इच्छा तेथे मार्ग असतो याची प्रचिती किशोरला आली. २०१७ मध्ये कृषी विभागाकडून ‘मागेल त्याला शेततळे’ या शासकीय योजनेअंतर्गत त्याला ३० बाय ३० चे शेततळे उपलब्ध झाले त्यात शेततळ्याचे अस्तरीकरण त्याने करून घेतले. अस्तरीकरणासाठी त्याला ५८ हजार इतके अनुदान मिळाले. या परिसरातील हे पहिलेच शेततळे होते. यात पावसाच्या पाणी साचत होणे, परिणामी पाण्याचा तर प्रश्न तर मिटला होता; परंतु आता रोपवाटिकेतील रोपांची मागणी वाढल्यामुळे शेडनेट उभारणे गरजेचे होते. त्यासाठी त्याला २०१८ मध्ये कृषि विभागाकडून रुपये ६ लाख इतके अनुदान मिळाले व त्याने अर्धा एकर शेती क्षेत्रात शेटनेट हाऊसची उभारणी केली. त्यात टोमॅटो, वांगी, मिरची, गिलके, भोपळा, दुधी भोपळा, दोडका, कारले या फळभाज्यांची रोपे त्याने तयार केले. त्याच्या या रोपांना साप्ते, कोने, वाघेरा, माळेगाव, हससुल या पंचक्रोशीतून किशोरच्या रोपांची मागणी वाढली.
रोपवाटीकेच्या माध्यमातून ग्रामस्थांना दिला रोजगार
कुटूंबातील सदस्य त्याला या कामात मदत करीत असत परंतु ती मदत देखील त्याला अपुरी पडू लागली. गावातील साधारण १५ ते २० लोकांना त्याने रोजंदारीवर मदतीला घेतले. स्वत: बरोबरच त्यांनाही रोजगार उपलब्ध करून दिला. आज वर्षाकाठी किशोरला ५ ते ६ लाख उत्पन्न मिळते. या उत्पन्नातून त्याने स्वत:चे घर, तीन गाड्या, एक महिंद्रा सुप्रो त्याने घेतली आहे व शेडनेट उभारणीसाठी बँकेकडून घेतलेल्या साडेसात लाख कर्जाची परतफेड सुद्धा त्याने यातून केली आहे. भविष्यात शेटनेट हाऊसचे क्षेत्रवाढ करून अजून व्यवसाय वाढविणे, व ग्रामस्थांसाठी कृषी सेवा केंद्र सुरू करण्याचा त्याचा मानस आहे.
कृषि विभागाचे आभार
घराची पूर्ण परिस्थिती बदलल्यामुळे आई- वडीलांच्या चेहऱ्यावर खुप समाधान दिसते. तसेच कृषी विभाग व शासन वेळोवेळी माझ्या पाठिशी उभे राहीले व त्यांच्या मदतीने व पाठबळानेच सर्व शक्य झाले आहे असे, शासनाप्रती कृतज्ञता व्यक्त करतांना श्री. पवार याने सांगितले.
कृषिमंत्री दादाजी भुसे यांची कौतुकाची थाप
नुकताच १ जुलै रोजी किशोर पवार या तरुणाच्या गावी कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते ‘कृषी संजीवनी सप्ताहाचा’ शुभारंभ झाला. त्या निमित्ताने कृषी विभागाच्या मदतीने किशोरने उभारलेल्या रोपवाटिका असलेल्या शेडनेटची पाहणी त्यांनी केली. यावेळी ते म्हणाले परिस्थितीपुढे हतबळ न होता किशोर या तरुणाप्रमाणे दोन हात करुन आपला विकास करावा,असे म्हणून त्यांनी किशोरच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
किरण डोळस:- माहिती सहायक,जिल्हा माहितीकार्यालय,नाशिक






