मुंबई : लार्सन अँड टुब्रो (एलअँडटी) या भारतातील इंजिनीअरिंग, तंत्रज्ञान, बांधकाम व वित्तीय सेवा क्षेत्रांतील आघाडीच्या समूहाने आपल्या इलेक्ट्रिकल अँड ऑटोमेशन (एलअँडटी ईअँडए) व्यवसायामध्ये निर्गुंतवणूक करून हा व्यवसाय श्नायडर इलेक्ट्रिक या एनर्जी मॅनेजमेंट व ऑटोमेशन क्षेत्रातील जागतिक कंपनीला देण्याचा व्यवहार पूर्ण झाल्याचे आज जाहीर केले आहे.
मे 2018 मध्ये जाहीर करण्यात आलेला हा अत्यंत महत्त्वाचा व गुंतागुंतीचा, तसेच वैशिष्ट्यपूर्ण निर्गुंतवणूक व्यवहार आवश्यक नियमनात्मक मंजुरी मिळाल्यावर आणि गरजेच्या औपचारिक बाबी पूर्ण केल्यानंतर पूर्ण करण्यात आला आहे. भविष्यातील वाटचालीच्या दृष्टीने एलअँडटीने निश्चित केलेल्या उद्दिष्टाच्या अनुषंगानेच हा व्यवहार करण्यात आला आहे. एलअँडटी सातत्याने आपल्या व्यवसायांचे सातत्याने मूल्यमापन करते आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून भांडवलाची तरतूद करण्याचा निर्णय घेते. व्यवसायाचा आढावा घेतल्यानंतरच कंपनीने इलेक्ट्रिकल अँड ऑटोमेशन या व्यवसायातून बाहेर पडायचे ठरवले.
सदर निर्गुंतवणूक व्यवहार पूर्ण झाल्याबद्दल, लार्सन अँड टुब्रोचे समूह अध्यक्ष ए. एम. नाईक यांनी म्हटले: “ईअँडए व्यवसायाचा व्यवहार पूर्ण करणे, हा आम्ही आखलेल्या दीर्घकालीन धोरणातील एक महत्त्वाचा मैलाचा टप्पा आहे. आमच्या ग्राहकांच्या बाबतीत कमीत कमी बदल करावे लागणे आणि महामारीमुळे निर्माण झालेल्या अडथळ्यांवर मात करणे, हे मुद्दे विचरात घेऊन, इतक्या भव्य प्रमाणावरील व्यवसाय विलग करणे, हे आमच्यापुढील आव्हान होते. एलअँडटीने गेली काही दशके भरभराटीला आणलेला व्यवसाय आणखी पुढे नेण्यासाठी श्नायडर इलेक्ट्रिक हा योग्य साथीदार आहे, असे आम्हाला वाटते. श्नायडर इलेक्ट्रिकशी केलेला हा व्यवहार आमचे कर्मचारी, व्यवसायातील साथीदार व भागधारक अशा सर्वांसाठीच खऱ्या अर्थाने फायदेशीर आहे.”
लार्सन अँड टुब्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक एस. एन. सुब्रमण्यम म्हणाले: “या ऑल-कॅश व्यवहारामुळे आमची बॅलन्सशीट अधिक सक्षम होणार आहे व त्यामुळे व्यवसायाच्या महत्त्वाच्या पैलूंवर लक्ष केंद्रित करून आम्हाला आमच्या भागधारकांसाठी दीर्घकालीन मूल्य निर्माण करण्याची संधी मिळणार आहे. हा व्यवहार म्हणजे एक अतिशय क्लिष्ट एमअँडए व्यवहार होता. त्यामध्ये देशांतर्गत व्यवहाराची विक्री व शेअर परचेस हस्तांतरण यांचा समावेश होता. आता आमच्या उद्दिष्टांच्या अनुषंगाने एलअँडटी प्रामुख्याने तीन क्षेत्रांमध्ये कार्यरत राहणार आहे – ईपीसी कन्स्ट्रक्शन अँड प्रोजेक्ट्स, उत्पादन आणि संरक्षण व सेवा.”
एलअँडटीचा ईअँडए व्यवसाय, तसेच त्यातील विविध प्रकारचे लो व मीडिअम व्होल्टेज स्विचगिअर, इलेक्ट्रिकल सिस्टिम्स, इंडस्ट्रीअल व बिल्डिंग ऑटोमेशन सोल्यूशन्स, एनर्जी मॅनेजमेंट सिस्टीम्स, मीटरिंग सोल्यूशन आणि प्रकल्प व सेवा व्यवसाय श्नायडर इलेक्ट्रिककडे हस्तांतरित केला जाणार आहे. हा ब्रँड अतिशय लोकप्रिय असल्याने आणि स्विचगिअर क्षेत्रामध्ये मोक्याच्या स्थानी असल्याने श्नायडर इलेक्ट्रिक विशिष्ट कालावधीसाठी संबंधित ब्रँडची ओळख वापरणार आहे.
ईअँडएचे अंदाजे 5,000 कर्मचारी आता श्नायडर इलेक्ट्रिकच्या जागतिक परिवारामध्ये सहभागी होणार आहेत. भारतातील नवी मुंबई, अहमदनगर, वडोदरा, कोइम्बतूर व मैसुरु येथे असलेले ईअँडएचे उत्पादन प्रकल्प आणि परदेशातील यूएई, कुवेत, मलेशिया व इंडोनेशिया येथील संबंधित उपकंपन्या श्नायडर इलेक्ट्रिकला हस्तांतरित केल्या जाणार आहेत. स्थानिक स्तरावरील मंजुरी अद्याप प्रलंबित असल्याने सौदी अरेबियातील एलअँडटी इलेक्ट्रिकल अँड ऑटोमेशन सौदी अरेबिया कंपनी लिमिटेड (एलटीईएएसए) उपकंपनीचे हस्तांरण आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतर केले जाणार आहे.
गेल्या पाच वर्षांत, एलअँडटीने ईपीसी व सेवा व्यवसायावर लक्ष केंद्रित करायचे ठरवले असल्याने त्या अनुषंगाने अनेक व्यवसायांतून बाहेर पडण्याचा निर्णय अमलात आणला. बंदरे, विमा, रस्ते व अन्य व्यवसायांतील हिस्सा विकण्याचा निर्णय एलअँडटीसाठी अनुकूल ठरला आहे, तसेच श्नायडर इलेक्ट्रिकबरोबरचा हा व्यवहारही एलअँडटीची बॅलन्सशीट आणखी सक्षम करणार आहे.
या निर्गुंतवणूक व्यवहारासाठी शार्दुल अमरचंद मंगलदास (एसएएम) लीगल अॅडव्हॉयजर्स, आर्पवूड कॅपिटल आणि अर्न्स्ट अँड यंग (ईवाय) एलएलपी हे एलअँडटीचे सल्लागार होते.
पार्श्वभूमी: लार्सन अँड टुब्रो ही तंत्रज्ञान, इंजिनीअरिंग, बांधकाम, उत्पादन व वित्तीय सेवा या क्षेत्रांत कार्यरत असणारा आणि 21 अब्ज डॉलरहून अधिक उत्पन्न असणारा भारतीय बहुराष्ट्रीय समूह आहे. कंपनी जगभरात 30 हून अधिक देशांत कार्यरत आहे. ग्राहक-केंद्री दृष्टिकोन आणि सर्वोच्च गुणवत्ता साध्य करण्याचा सातत्याने घेतलेला ध्यास यामुळे एलअँडटीला आठ दशके निरनिराळ्या व्यवसायांमध्ये आघाडीचे स्थान निर्माण करणे आणि टिकवून ठेवणे शक्य झाले आहे.



