नाशिक : द्राक्ष विज्ञान मंडळ, नाशिक व कृषिथॉन यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे द्राक्ष विज्ञान अभियानाचे आयोजन दि. २५ नोव्हेंबर २०२० रोजी करण्यात आले होते.
सकाळी १० वा. मानूर येथे दीपक हाबंरे यांच्या प्लॉटला भेट देऊन अभियानातील अग्रभागी असलेल्या वाहनाचे पूजन सौ. हिराबाई हाबंरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले! शुभारंभ प्रसंगी द्राक्ष विज्ञान मंडळ, नाशिकचे अध्यक्ष डॉ. वसंत ढिकले यांनी द्राक्ष विज्ञान अभियानाबद्दल सविस्तर माहिती दिली.
द्राक्ष विज्ञान अभियानात माडसांगवी येथे सुनील पेखळे, चांदोरी येथे शिवाजी गडाख, निफाड येथे संजय जाधव, शिवडी येथे सुधाकर क्षीरसागर, किशोर क्षीरसागर, उगाव येथे अच्युत भोसले व ओम गायत्री नर्सरीला भेट देण्यात आली.
प्रसंगी बिपीन चोरगे सरांनी दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी संजीवकांचा वापर मर्यादित करून रसाळ मधुर द्राक्ष निर्मितीबद्दल माहिती दिली. प्रा. तुषार उगले यांनी द्राक्ष पिकात रासायनिक अंश कमी करण्यासाठी द्राक्ष उत्पादकांनी जैविक औषधींचा वापर करण्याबद्दल माहिती दिली.
डॉ. ओमप्रकाश हिरे यांनी जमीन बलवान तर द्राक्ष जोमदार बद्दल माहिती देतांना द्राक्ष पिकाला पाणी व खत व्यवस्थापन कसे महत्त्वाचे याबद्दल विस्तृत माहिती दिली. सुधाकर व्हरायटीबद्दल सुधाकर व्हरायटीचे संशोधक सुधाकर क्षीरसागर यांनी माहिती दिली. ओम गायत्री नर्सरी भेटी मध्ये ओम गायत्रीचे संचालक मधुकर गवळी यांनी बेंच ग्राफटींग काळाची गरज असून बेंच ग्राफटींग बद्दल विस्तृत माहिती दिली. ओम गायत्री नर्सरी येथे उपस्थित द्राक्ष उत्पादकांना तुळशी रोप भेट देण्यात आले व राष्ट्रगीताने द्राक्ष विज्ञान अभियानाचा समारोप करण्यात आला.
द्राक्ष विज्ञान अभियानात महाराष्ट्रातील असंख्य द्राक्ष उत्पादक उपस्थित होते. द्राक्ष विज्ञान अभियानाचे सूत्र संचलन डॉ. वसंत ढिकले यांनी केले तर आभार कृषीथॉनचे आयोजक साहिल न्याहारकर यांनी मानले.




