नाशिक :- उत्कृष्ट शिक्षण प्रणाली आणि उद्योग- संस्थाशी सर्वोत्तम समन्वय साधण्याच्या आधारावर शहरातील गुरु गोबिंद सिंग अभियांत्रिकी महाविद्यालय आणि संशोधन केंद्राला अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) आणि भारतीय उद्योग परिसंघ (सीआयआय) द्वारा गोल्ड रँक देऊन गौरविण्यात आले आहे. गुरु गोबिंद सिंग अभियांत्रिकी महाविद्यालय विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रम शिकवून थांबले नाही तर उद्योग क्षेत्राला अभिप्रेत असणारे तांत्रिक शिक्षणदेखील उपलब्ध करून दिले. त्यासाठी महाविद्यालयाने बॉश, सिमेंस, सिस्को, सॅटकोम इत्यादी प्रतिष्ठित उद्योग संस्थांशी सामंजस्य करार केले आहे. जेणेकरून हे अभियंते उद्योग क्षेत्रात कोणत्याच बाबतीत मागे पडू नये यासाठी विशेष प्रयत्न महाविद्यालयाने केले. एएआयसीटीई आणि सीआयआयद्वारा केल्या गेलेल्या सर्वेक्षणात गुरु गोबिंद सिंग महाविद्यालयाची हीच सर्वोत्तम शिक्षण प्रणाली गोल्ड रॅंक सन्मान मिळण्याचे मुख्य कारण ठरली.
२०१९-२० या शैक्षणिक वर्षाच्या गोल्ड रॅंक सर्वेक्षणासाठी एआयसीटीई आणि सीआयआयमार्फत भारतातील सर्व तांत्रिक संस्थांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्या अनुषंगाने एकूण ८१४ व्यावसायिक संस्था अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्या, त्यामध्ये गुरु गोबिंद सिंग अभियांत्रिकी महाविद्यालय गोल्ड रॅंकसाठी पात्र ठरले. असा सन्मान मिळविलेल्या नाशिक विभागातील संस्थांमध्ये अतिशय तरुण असलेल्या गुरु गोबिंद सिंग अभियांत्रिकी महाविद्यालयाने स्थापनेनंतर केवळ ६ वर्षाच्या आत नॅक मांनाकन मिळविण्याचाही मान पटकावला आहे.
गोल्ड रॅंकच्या सन्मानाबद्दल गुरु गोबिंद सिंग संस्थेचे अध्यक्ष सरदार गुरदेवसिंग बिर्दी, सचिव सरदार बलबीरसिंग छाब्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. परमिंदर सिंग आणि सर्व व्यवस्थापन सभासद यांनी प्राचार्य डॉ. नीलकंठ निकम यांचे आणि त्यांच्या सर्व टिमचे अभिनंदन केले आहे.



