नाशिक : भारतात आणि महाराष्ट्रात काही भागात बर्ड फ्लू चा उद्रेक झाल्याचे प्रसार माध्यमांद्वारे सर्वत्र ऐकायला व पहायला मिळते . नाशिक जिल्हा कोंबड्या उत्पादनात देशात दुसऱ्या क्रमांकावर असून महाराष्ट्राची कृषी राजधानी अशी ओळख असणाऱ्या या जिल्ह्यात द्राक्षे ,कांदे या नगदी पिकांच्या उत्पादनाबरोबरच चिकन आणि अंडी यामध्ये नाशिकचा सिंहाचा वाटा आहे.
चिकन आणि अंडी उत्पादनात नाशिक जिल्हा स्वयंपूर्ण असून उत्पादीत झालेले चिकन आणि अंडी नाशिक जिल्ह्यातील नागरिकांमध्ये खप होऊन उर्वरित चिकन आणि अंडी परजिल्ह्यात तसेच परराज्यात विशेषतः गुजरात व मध्यप्रदेशात विक्री केले जाते व त्यापासून पोल्ट्री उद्योजकांना उत्पन्न मिळते .
कंत्राटी कुक्कुटपालनामुळे या जिल्ह्यात कुक्कुटपालन व्यवसायाची मागील २२ वर्षांपासून चांगली भरभराट झाली असून अनेक शेतकरी ,सुशिक्षित बेरोजगार या व्यवसायात उतरल्यामुळे त्यांची आर्थिक उन्नती झाली आहे . त्यामुळे शासनाने कुक्कुटपालन व्यवसाय हा शेतीपूरक व्यवसाय जाहीर केल्यामुळे रोजगार निर्मितीचे साधन म्हणून त्याकडे पाहिले जात आहे . तसेच वेळोवेळी शासनाच्या योजनेद्वारे कर्ज व अनुदान दिले जात आहे.
नाबार्डमार्फत बँकेद्वारे कर्जरूपाने व अनुदानाच्या मदतीने काही कुक्कुटपालकांनी या व्यवसायात भरारी घेतली आहे . तर महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या मार्फत नाविन्यपूर्ण योजना ,राष्ट्रीय कृषी विषयक योजनांमार्फत छोटे फार्म उभारण्यात आले आहेत .तर बॅकयार्ड पोल्ट्री म्हणजे देशी कोंबड्यांच्या विकासासाठी लघु अंडी उबवणे, यंत्रे स्वयं प्रकल्प ,खाजगी भागीदारी तत्वावर कुक्कुट प्रकल्प उदयास आलेले आहेत .
नाशिक जिल्ह्यात अंदाजे मांसळ कुक्कुटपालन ५००० फार्मची संख्या उत्पादन केले जाते . सरासरी १००० टन चिकनचे उत्पादन दररोज होते .त्यापैकी २०० टन चिकन नाशिकमध्ये खपते ,५०० टन चिकन मुंबईला विक्री होते तर २०० टन गुजरात व १०० टन मध्यप्रदेशात खपले जाते. नाशिक जिल्ह्यात अंडयावरील १४४ लेअर फार्मची संख्या असून १४ लाख पक्ष्यांची संख्या असून दररोज अंडी उत्पादन १२ लाख असून त्यापैकी नाशिक जिल्ह्यात १० लाख अंड्यांचा खप होऊन २ लाख अंडी मुंबईला खपली जातात .
बॉयलर फार्मिंगवर ३५००० व लेअर फार्मिंगवर १५०० लोक प्रत्यक्षपणे या व्यवसायावर अवलंबून असून अप्रत्यक्षपणे १ लाख असे एकूण अंदाजे दीड लाख लोक या व्यवसायावर अवलंबून आहेत .मागील १५ दिवसांपासून अंदाजे ५० कोटी रुपयांचे नुकसान या व्यवसायाचे झालेले आहे .
हा बर्ड फ्लू आजार नेमका काय ?कसा होतो याबाबत शास्त्रीयदृष्ट्या सांगायचे तर ,बर्ड फ्लू म्हणजेच एव्हियन इन्फ्लुएंझा हा पक्ष्यांमध्ये आढळणारा आजार असून तो झुनोटिक म्हणजेच पक्ष्यांपासून माणसाला होण्याची शक्यता असते .इन्फ्लुएंझा टाईप ए या विषाणूच्या प्रकारात एच चे १८ व एन चे ११ उपप्रकार आहेत . हा आजार शक्यतो स्थलांतरित पक्ष्यांपासून कोंबड्यांना होतो. यामध्ये पक्ष्यांमध्ये ८० ते ९० मरतुक आढळते आणि लक्षणांमध्ये पक्ष्यांच्या डोक्याला सूज येते ,पायांवर रक्तस्त्रावामुळे काळसरपणा ,तुरा काळसर ,पंख व पाय लुळे पडतात .
त्यापैकी एच -५ व एच -७ हा प्रकार हायली पॅथोजेनीक असून इतर प्रकार हे लो पॅथोजेनीक आहेत . मनुष्याला लागण होण्याचे कारण आजारी /वाहक पक्ष्यांमधील विष्ठा ,नाकातील स्त्राव यांच्या संपर्कात आल्याने होऊ शकते .परंतु आजपर्यंत भारतात २००६ या वर्षी नंदुरबार जिल्ह्यात नवापूर येथे कोंबड्यांमध्ये पहिल्यांदा प्रादुर्भाव झाल्यानंतर आजपर्यंत अनेक वेळा प्रादुर्भाव होऊनही माणसांमध्ये एकही बर्ड फ्लू रोगाची लागण झाल्याचे उदाहरण नाही . नाशिक जिल्ह्यात फार्ममध्ये होणारे कुक्कुटपालन हे संपूर्णतः शास्त्रीय पध्दतीने होत असून तज्ञ पशुवैद्यकांमार्फत त्यांचे संपूर्ण लसीकरण व आहार लसीकरण व आजार प्रतिबंधक व्यवस्थापन केले जाते . कुक्कुटपालकास दररोज तांत्रिक सल्ला मिळाल्यामुळे तो या व्यवसायात तज्ञ होतो आणि चांगल्याप्रकारे जैव सुरक्षिततेचे पालन करून व्यवसाय शास्त्रीय पध्दतीने केला जातो .
देशी पक्षी ,गावठी पक्षी हे ग्रामीण भागात पाळले जातात व त्यांची निगा ,मार्गदर्शन ,लसीकरण आणि औषधोपचार महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत केले जाते .
त्यामुळे या पक्ष्यांपासून निर्माण होणारे चिकन आणि अंडी ही सुरक्षित व पौष्टिक असतात .
तथापि काही वेळा सोशल मीडियामुळे चुकीचे संदेश जनमानसात पसरल्यामुळे नागरिकांनी सरसकट चिकन आणि अंडी खाणे बंद केले आहे .वास्तविक कोरोनाच्याही सुरुवातीच्या काळात अशाच अफवांमुळे चिकन आणि अंडी खाणे बंद केली होती . तथापि पुन्हा शासनामार्फत व पोल्ट्रीधारकांकडून आवाहन व जनजागृती केल्यामुळे प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी पुन्हा चिकन व अंडी लोकांनी खाल्ली व त्यामुळे प्रतिकार शक्ती वाढून कोरोनाशी लढण्यासाठी मदत झाली .अजूनही कोरोनाचा काळ सुरु असून पुन्हा चिकन आणि अंडी खाणे प्रथिनांचे सेवन करून प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आवश्यक आहे .
बर्ड फ्लू विषाणू ७० डिग्री सेंटीग्रेड तापमानात केवळ ३ सेकंदात नष्ट होत असल्याने शिजवलेले चिकन ,उकडलेली अंडी खाण्यास निर्धोक आहे असे मत अनेक तज्ञांनी व्यक्त केले आहे . त्यामुळे सर्वांना आवाहन करण्यात येते की ,शिजवलेले चिकन ,उकडलेली अंडी खा आणि निर्धास्त राहा .
स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा
Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...




