गुजरातमधील देशाच्या सीमेवरुन ‘ नादावेट ‘ पर्यटन स्थळावरुन बीएसएफ जवानांच्या जीवनशैलीचा थरार आता पाहता येणार

Aug 29, 2021

  • ‘अजय प्रहारी’ हे स्मारक राष्ट्रासाठी प्राण गमावलेल्या शूऱ सैनिकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आले आहे
  • नादाबेट येथे ऑडिटोरिअम, सोलार ट्री, सेल्फी पॉईंट, किड्स अॅण्ड गेमिंग झोन, व्ह्यूइंग डेक, टी जंक्शन पिलर्सचीही उभारणी
  • इथे सैन्याची शस्त्रेही प्रदर्शनार्थ ठेवण्यात आली आहेत, त्यामुळे सीमा दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांना लष्कर आणि संरक्षण दलाच्या सज्जतेची माहिती मिळू शकेल

नाशिक : गुजरात पर्यटन विभाग सीमा दर्शन या प्रकल्पाअंतर्गत नादाबेट येथील आंतरराष्ट्रीय सीमेच्या झीरो पॉईंटवर सीमाभाग पर्यटन प्रकल्प विकसित करत आहे. सीमाभाग पर्यटन विकसित करण्याच्या या नाविन्यपूर्ण दृष्टिकोनामुळे देशातील जनतेला सीमाभागाविषयी जाणून घेण्याची आणि त्यावेळी या पर्यटनाचा आनंद घेण्याची संधी मिळणार आहे.


या नाविन्यपूर्ण प्रयोगातून मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या बीएसएफ जवानांची जीवनशैली प्रत्यक्ष पाहण्याचा अनुभव नागरिकांना घेता येईल आणि यातून गुजरातच्या पर्यटनालाही चालना मिळेल. लष्कराच्या जवानांची जीवनशैली, त्यांच्या जबाबदाऱ्या आणि राष्ट्रप्रेम अनुभवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक या राज्यात येत असतात. देशाच्या सीमारेषांचे रक्षण आणि बचाव कार्याच्या साहसाचा अनुभव घेण्याची संधीही त्यांना मिळते.
गुजरातमध्ये येणाऱ्या पर्यटकांची प्रचंड संख्या लक्षात घेता पर्यटन विभागाने नादाबेट येथे विविध आकर्षणांचा समावेश केला आहे. परेड ग्राऊंड, एक्झिबिशन सेंटर, ऑडिटोरिअम, लायटिंग, सोलार ट्रीज, सेल्फी पॉईंट अशा अनेक सुविधा येथे आहेत. लहान मुलांच्या मनोरंजनासाठी इथे किड्स अॅण्ड गेमिंग झोनही उभारण्यात आला आहे.
देशाचे रक्षण करताना प्राण गमावलेल्या धाडसी सैनिकांच्या स्मरणार्थ इथे ‘अजय प्रहारी’ हे स्मारक उभारण्यात आले आहे. या स्मारकाला भेट देणाऱ्या पर्यटकांना या शहिदांना श्रद्धांजलीही वाहता येईल. सुंदर म्युरल्सने सजलेले 30 फूट उंच टी जंक्शन हा सीमा दर्शन कॉम्प्लेक्समधील आकर्षणाचे केंद्र असणार आहे.
त्याचप्रमाणे टी जंक्शनपासून झीरो पॉईंटपर्यंत रस्त्यावर एक व्यासपीठ उभारण्यात आले आहे. यावर सरफेस मिसाइल, सरफेस टू सरफेस मिसाइल, टी-55 टँक, आर्टिलरी गन, टॉरपेडो आणि मिग 27 विमाने प्रदर्शनार्थ ठेवण्यात आली आहेत. यामुळे सीमा दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांना लष्कर आणि संरक्षण दलाची सज्जता कशी असते, हे अनुभवता येईल.
नादाबेटला भेट देणाऱ्या पर्यटकांना सीमाभाग नीट पाहता यावा यासाठी इथे व्ह्यूइंग डेकही तयार करण्यात आले आहे. पर्यटकांना या टॉवरवरून सीमाभागाचा अप्रतिम नजारा पाहता येईल. मुलांसाठी खास खेळण्याची जागाही इथे आहे. यात मुलांना विविध प्रकारचे आऊटडोअर गेम्स खेळता येतील.
रीट्रीट सेरमनीसाठी इथे परेड ग्राऊंडही आहे. या परेड ग्राऊंडवर बीएसएफ जवान रीट्रीट सेरमनी करतील. या रीट्रीट सेरमनीचा अनुभव म्हणजे नादाबेटला भेट देणाऱ्या प्रत्येक पर्यटकासाठी देशभक्तीची भावना जागवणारा एक अनोखा अनुभव असणार आहे.
पार्किंग, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, अराइव्हल प्लाझा, बसण्याची जागा, दुकाने, रीटेनिंग वॉल अशा विविध सुविधाही इथे पर्यटकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. रात्री नादाबेटला सौर ऊर्जेने प्रकाशमान करण्यासाठी सोलार ट्रीजसुद्धा उभारण्यात आले आहेत.
सीमा दर्शन उपक्रम राबवल्याने मागील पाच वर्षांत स्थानिक रोजगारातही वाढ झाली आहे. झीरो पॉईंटजवळ नादेश्वरी माता मंदीर आहे. दरवर्षी इथे मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. त्यामुळे नादेश्वरी माता मंदिराजवळ रेस्ट हाऊसही बांधण्यात आले आहे.
सीमा दर्शन-नादाबेट भारत-पाक सीमेवर बानसकांथा जिल्ह्यात आहे. पर्यटकांना आसपासच्या इतर ठिकाणांनाही भेट देता येईल. प्रसिद्ध अंबा माता मंदीर म्हणजेच अंबाजी, जेसर बीअर अभयारण्य, बलराम पॅलेस आणि बलराम महादेव मंदीर बानसकांथा जिल्ह्यात आहे. शिवाय, शेजारच्या पाटण जिल्ह्यातील राणी की वाव आणि पटोला हाऊस ही स्थळेही पर्यटकांसाठी आकर्षण केंद्र आहेत.
सीमा दर्शनाला भेट देणाऱ्या प्रत्येक पर्यटकाकडे सरकारी मान्यतेचे ओळखपत्र असणे अनिवार्य आहे. पर्यटकांना रस्तामार्गे सहज सीमा दर्शन-नादाबेटला पोहोचता येईल. अहमदाबादपासून 262 किमी. वडोदरापासून 372 किमी., राजकोटपासून 315 किमी., सुरतपासून 524 किमी. भावनगरपासून 371 किमी. आणि भूजपासून 265 किमी. इतके अंतर आहे. अहमदाबाद हे जवळचे विमानतळ आहे. नादाबेट येथील सीमा दर्शनचे उद्घाटन 24 डिसेंबर 2016 रोजी मुख्यमंत्री श्री. विजय रुपाणी यांनी केले होते. स्वदेस दर्शन योजनेअंतर्गत गुजरात पर्यटन विभागाने विविध विकासकामेही या भागात केली आहेत.
गुजरात पर्यटन विभाग राज्यातील विविध पर्यटन स्थळांचा विकास करण्यात सक्रिय आहे. वाडनगर, मोधेरा आणि पाटण या भागालाही हेरिटेज सर्किटमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. स्वदेस दर्शन योजनेअंर्गत मोधेरा सूर्यमंदिर या ऐतिहासिक वास्तूच्या परिसरातही पर्यटन विभागाने विविध विकास कामे केली आहेत.
पाथ वे, बसण्याची जागा, परिसर विकास, रीटेनिंग वॉल, आरसीसी वॉल, पिच वॉल, प्रकाशयोजना, झाडे, रस्त्यावरील दिवे, विद्युत कामे, बेंचेस अशी अनेक विकासकामे सूर्यमंदिरात करण्यात आली आहेत.
पहिला भीमराज राजा याने 11 व्या शतकात सूर्यमंदिर बांधले. स्थापत्यकलेनुसार, गुजरातमध्ये सोलंकी पद्धतीने बांधल्या गेलेल्या मंदिरांचे एक सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे हे सूर्य मंदीर. देश आणि जगभरातील लाखो पर्यटक दरवर्षी ही ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी गुजरातमध्ये येतात.
देशातील पहिले सौर गाव अशी मोधेराची ओळख आहे. ऐतिहासिक मोधेरा सूर्य मंदीर आणि मोधेरा गाव सौर ऊर्जेच्या प्रकाशात उजळून निघेल. मोधेरा गावातील घरे आणि सूर्य मंदीर पूर्णपणे सौरऊर्जेने प्रकाशमान केली जातील.

 

अजून बातम्या वाचा..

ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल

Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...

read more
“ऑटोमेशन एक्स्पो 2026′  मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

“ऑटोमेशन एक्स्पो 2026′ मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनमध्ये 22 पुरस्कारप्राप्त ब्रँड्स AI एज...

read more
Breaking News