नाशिक- बांधकाम व्यावसायिकांची देशातील सर्वात जुनी संस्था बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाच्या (बीएआय)नाशिक चॅप्टरच्या वर्ष २०२१-२२ च्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा नुकताच संपन्न झाला . यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष अभय चोकसी व सचिव विजय बाविस्कर यांनी नूतन कार्यकारणी सोबत पदभार स्वीकारला .
हॉटेल ग्रँड रिओ येथे झालेल्या या समारंभात बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया चे राज्य अध्यक्ष रणधीर भोईटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते . याप्रसंगी मंचावर राष्ट्रीय उपाध्यक्ष नीरव परमार ,राष्ट्रीय सचिव प्रदीप नागवेकर ,राष्ट्रीय कोषाध्यक्ष ग्यान मदानी ,मावळते अध्यक्ष राहुल सूर्यवंशी व माजी राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश पाटील हे मान्यवर उपस्थित होते .
याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना राज्य अध्यक्ष रणधीर भोईटे म्हणाले की गेल्या २ वर्षात कोविडमुळे बांधकाम उद्योग अडचणीत आला असून काम करण्याच्या प्रक्रियेत खूप परिवर्तन झाले आहे . शासनाकडे असलेल्या थकीत बिले तसेच रॉयल्टी अशा विविध समस्यांवर संघटना पाठपुरावा करत आहे . शासनाच्या निविदा प्रक्रियेत सुसूत्रता यावी तसेच देशभरात सर्वच राज्यात निविदेसाठी समान नियम असावेत यासाठी संस्था केंद्र सरकारकडे देखील पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी नमूद केले .
मावळते अध्यक्ष राहुल सूर्यवंशी यांनी त्यांच्या कार्यकालात संस्थेद्वारे केलेल्या अनेक समाजउपयोगी कार्यांचा आढावा घेतला .
आपल्या मनोगतामध्ये बोलतांना नूतन अध्यक्ष अभय चोकसी म्हणाले की नाशिक शहर हे परिवर्तनाच्या टप्प्यातून जात असून या टप्प्यात बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया महत्वपूर्ण भूमिका निभावेल . आपला व्यवसाय अधिक प्रभावीपणे करण्यासाठी संस्थेतर्फे सदस्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन देण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले .
पदग्रहण समारंभात युवा विंग स्थापनेची देखील घोषणा करण्यात आली असून युवा विंगच्या अध्यक्षपदी आविष्कार बिरारी तर सचिव म्हणून निशिथ अटल कार्यभार बघतील .
कार्यक्रमास महिला विंगच्या अध्यक्षा मनीषा खांडेकर तसेच सदस्य उपस्थित होते .
नवीन कार्यकारणी अशी –
अध्यक्ष –अभय चोकसी
उपाध्यक्ष –मनोज खांडेकर
सचिव –विजय बाविस्कर
कोशाध्यक्ष –विलास निफाडे
सहसचिव –प्रशांत सोनजे व दीपक धाराराव




