नाशिक – कॉनफेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज (सीआयआय) या संस्थेचा एक अंग असलेल्या तसेच देशात पर्यावरणपूरक बांधकामास प्रोत्साहन मिळावे व त्याबाबत अधिकाधिक जन जागृती व्हावी यासाठी कार्यरत असणाऱ्या “इंडियन ग्रीन बिल्डींग कौन्सिल” (आय जी बी सी) आपला चॅप्टर नाशिक येथे सुरु करत असून येत्या २६ जुलै रोजी याचा पदग्रहण समारंभ होत असल्याची माहिती या नूतन नाशिक चॅप्टरचे अध्यक्ष (चेअरमन) किरण चव्हाण यांनी दिली. यावेळी सहअध्यक्ष (को-चेअरमन) सुनील कोतवाल हे उपस्थित होते.
कार्बन उत्सर्जन, ग्लोबल वॉर्मिंग, नैसर्गिक स्रोताची अपरिमित हानी, बदललेले वातावरण याच्या परिणामाचा सामना सर्व विश्व् करीत असून याबाबीचा विचार करून पर्यावरणपूरक बांधकामास प्रोत्साहन व मार्गदर्शन करणाऱ्या आय जी बी सी चा नाशिकमध्ये सुरु होणारा देशातील २५ वा चॅप्टर असून आपल्या या कार्यास अधिक प्रभावीपणे अमलात आणण्यासाठी इंडियन ग्रीन बिल्डींग कौन्सिलने नुकताच बांधकाम व्यावसायिकांची देशातील सर्वात मोठी संस्था असलेल्या क्रेडाई सोबत राष्ट्रीय स्तरावर सहकार्याचा करार केला आहे .
या बाबत अधिक माहिती देतांना किरण चव्हाण म्हणाले की, सीआयआय ही देशभरातील उद्योग क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणारी देशातील सर्वात मोठी संस्था असून आजमितीला याचे ९००० हुन अधिक प्रत्यक्ष सदस्य आहेत तसेच देशातील विविध २७६ संस्थांशी निगडित असे ३ लाखाहून अधिक सदस्य याच्याशी जोडलेले आहेत. उद्योग क्षेत्रा सोबत भविष्यातील पर्यावरण रक्षण व संवर्धनाची आवश्यकता ओळखून सीआयआय द्वारा वर्ष २००१ मध्ये आय जी बी सी ची स्थापना करण्यात आली. देशात वर्ष २०२५ पर्यंत पर्यावरण पूरक शाश्वत बांधकामांचे निर्माण करणे हे याचे उद्दिष्ट आहे.सद्यस्थितीत देशभरातील २४ चॅप्टरमध्ये २००० हून अधिक सदस्य आयजीबीसी सोबत संलग्न आहेत. या सदस्यांमध्ये बांधकाम क्षेत्राशी निगडित सर्व जसे वास्तुविशारद, इंटेरिअर डिझाईनर्स, बिल्डर्स, बांधकाम साहित्य निर्मिती करणा-या कंपन्या, शैक्षणिक संस्था, या प्रमुख आहेत. आय जी बी सी ही संस्था राज्य व केंद्र शासनाच्या अनेक धोरणात्मक निर्णयामध्ये मदत करत असून ती जागतिक ग्रीन बिल्डिंग कौन्सिल सोबत संलग्न आहे. नाशिक शहरातील ग्रीन चळवळीशी निगडीत अनेक गैरसरकारी संस्थांचा देखील यामध्ये सक्रीय सहभाग होत आहे . ते पुढे म्हणाले की, आजमितीला भारतात सुमारे ५३२० हुन अधिक प्रकल्पात जवळपास ६.८६ अब्ज स्वेअर फूट ग्रीन बिल्डींगचे निर्माणाधीन असून यामध्ये निवासी, व्यावसायिक, औद्योगिक इमारतीचा समावेश आहे. या साठी नोंदणी केल्यानंतर आयजीबीसी ची तज्ञ् समिती या प्रकल्पाच्या सुरवातीपासूनच याचे निरीक्षण करते व ग्रीन बिल्डिंग साठी ठरवलेल्या निकषांची अमलबजावणी केल्या नंतर इमारतीला रेटिंग देतात. हे रेटिंग सिल्वर , गोल्ड तसेच प्लॅटिनम अशाप्रकारच्या श्रेणीत दिले जाते. यासोबतच आय जी बी सी प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यशाळा, संशोधन, आयजीबीसी संलग्नतेसाठी परीक्षा असे विविध उपक्रम नियमीतरित्या घेतात. हे रेटिंग घेतल्यानंतर पर्यावरणाची तर काळजी घेतलीच जाते सोबतच अशा पर्यावरणपूरक उपायांनी पैशांचीही बचत होते असेही त्यांनी नमूद केले. क्रेडाई व आयजीबीसीच्या राष्ट्रीय पातळीवर आलेल्या सहकार्याच्या करारामुळे कार्याची व्याप्ती वाढण्यास मोलाची मदत होईल असेहीते म्हणाले.
संस्थेचे सहअध्यक्ष (को-चेअरमन) सुनील कोतवाल म्हणाले की, आय जी बी सी च्या प्रयत्नांचा परिणाम म्हणून संस्थेच्या स्थापने पासून आजपर्यंत सुमारे १२५० प्रकल्पात जवळपास ४०० दशलक्ष स्वेअर फूट बांधकामास ग्रीन रेटिंग मिळाले असून यामुळे झालेली पर्यावरणाची वार्षिक बचत अशी
१. वार्षिक १५००० मेगा वॉट ऊर्जेची प्रती वर्ष प्रती दक्षलक्ष स्वेअर फूट बचत
२. वार्षिक ४कोटी ५० लाख लिटर पाण्याची प्रती वर्ष प्रती दक्षलक्ष स्वेअर फूट बचत
३. १०० मेगा वॉट क्षमतेच्या नूतनीकरण क्षम ऊर्जेच्या प्रकल्पाची आय जी बी सी रेटिंग च्या प्रकल्पात स्थापना
४. १२००० टन प्रती वर्ष प्रती दक्षलक्ष स्वेअर फूट कमी कार्बन उत्सर्जन
५. ५०० टन प्रती वर्ष प्रती दक्षलक्ष स्वेअर फूट बांधकाम कचऱ्याचे योग्य नियोजन
हे सांगताना सुनील कोतवाल पुढे म्हणाले की, नाशिक हि अनेक नव्या उपक्रमांची जन्मभूमी असून चांगल्या उपक्रमांना नाशिककरांनी नेहमीच सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पर्यावरण पूरक बांधकामे उभारल्यास निसर्गाचे वरदान लाभलेल्या नाशिक मधील निसर्ग जतन करण्यास मोलाची मदत होणार आहे. चांगले हवामान, स्वछ वातावरण, उत्तम पर्जन्यमान अशी नाशिक ची ओळख असून यामुळेच नाशिक मध्ये अनेक उद्योग येतात . त्यामुळे अनेक रोजगार संधी देखील उपलबद्ध होतात . ज्याचा शहराच्या अर्थकारणावर सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे हे नाशिकपण जपण्यासाठी आपण सर्वानी पर्यावरण जपणे आवश्यक आहे असेही त्यांनी नमूद केले. नाशिक मध्ये आगामी कालावधीत आय जी बी सी द्वारे अनेक जनजागृतीपर उपक्रमाचेही आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.




