नाशिक – नागरिकांनी पूर परिस्थिती पाहता आपत्कालीन व्यवस्थेस सहकार्य करुन रस्त्यांवर पुराचे पाणी पाहण्यासाठी व सेल्फी काढण्यासाठी घराबाहेर न पडता सतर्क रहावे, पुर परिस्थितीचे पर्यटन करु नये, असे आवाहन पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित केलेल्या पुर परिस्थिती आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी महापौर रंजना भानसी, आमदार देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.छेरींग दोरजे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.आरती सिंह, मेजर किशोरसिंग शेखावत, जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता श्री.राजेश मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, सर्व तहसिलदार व संबंधित विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.
श्री.महाजन म्हणाले, काझीगढी व त्यासारख्या धोकादायक ठिकाणांवरुन नागरीकांचे त्वरीत सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. स्थलांतरासाठी सहकार्य न करणाऱ्यांचे सक्तीने स्थलांतर करण्याचे निर्देश देण्यात आले. स्थलांतरीत केलेल्या नागरिकांसाठी आवश्यक सुविधा पुरविण्यात याव्यात अशा सुचनाही यावेळी त्यांनी दिल्या.
पुर परिस्थितीमध्ये कोणतीही जिवित हानी होणार नाही यासाठी प्रशासनामार्फत पूर्वतयारी करण्यात आली आहे. नागरिकांनी देखिल प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करुन सर्व अधिकाऱ्यांनी आपल्या मुख्यालयी हजर रहावे, अशा सूचना पालकमंत्री यांनी केल्या.
श्री मांढरे म्हणाले, पुर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सोमवार 5 ऑगस्ट 2019 रोजी शहरी व ग्रामीण भागातील सर्व शाळा व महाविद्यालये यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे प्रशासनामार्फत एनडीआरएफ, नौका, लाईफ जॅकेट यासोबतच स्थलांतरीत नागरिकांसाठी फुड पॅकेटस व आवश्यक वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येत आहेत. ग्रामीण सुरक्षा दलामार्फत एकाच वेळेस 5 ते 6 हजार व्यक्तींपर्यंत सतर्क रहाण्याचे व समाजमाध्यमाद्वारे पसरणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचा संदेश दुरध्वनी व भ्रमणध्वनीद्वारे देण्यात येत आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत पुर परिस्थिती लघुकृती आराखडा तयार करण्यात आला आहे. यासोबतच पुर परिस्थिती लक्षात घेता एनडीआरएफ दल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व आर्मी यांच्या समन्वयाने एअरलिफ्टींग, रेस्क्यु ऑपरेशन यासाठी आर्मीच्या 110 सैनिकांच्या दोन तुकड्या सज्ज ठेवण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आपल्या प्रास्ताविकात दिली.
पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधिक्षक, महानगरपालिका आयुक्त, जलसंपदा विभाग आदी विभागानी आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत सुरु असलेल्या कामांची माहिती दिली. बैठकीनंतर पालकमंत्री गिरीष महाजन यांनी शहरातील सराफ बाजार, काझीगढी, गणेशवाडी, वाल्मिकनगर या पुर प्रभावीत भागासोबतच चांदोरी व सायखेडा या गावातील पुर परिस्थितीची पाहणी केली.





