मुंबई, : राज्यात उद्योग वाढीला चालना देण्यासाठी शासनाने विविध धोरणे आखली आहेत. येत्या काळात किनारपट्टीलगत डेटा सेंटर पार्क, इंटिग्रेटेड इंडस्ट्रिअल एरिया (आयआयए), महाराष्ट्र एक्सपोर्ट काऊंसिल, महाराष्ट्र ग्लोबर फोरम स्थापन करण्याचा शासनाचा मानस असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे दिली. एमआयडीसी व सीआयआयच्या वतीने आयोजित केलेल्या देशातील काही प्रमुख कंपन्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यासोबतच्या चर्चासत्रात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.श्री. देसाई पुढे म्हणाले, महाराष्ट्राला विस्तीर्ण असा सुमारे ७२० किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. या ठिकाणी ऑप्टिकल फायबरयुक्त डेटा सेंटर पार्क सुरू करण्याचा शासनाचा विचार आहे. याद्वारे अनेकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.शासन उद्योग वाढीसाठी नवनवीन धोरण आखत आहे. त्याचा लाभ उद्योगांना होत आहे. फिनटेक, इलेक्ट्रिक वाहन, महिला धोरणांचा नव्या औद्योगिक धोरणात समावेश करण्यात आलेला आहे. याशिवाय इंटीग्रेटेड इंडस्ट्रिअल एरिया (आयआयए), महाराष्ट्र ग्लोबल फोरम सुरू करण्याचा शासनाचा मानस असल्याचे श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले.
या चर्चासत्रात विविध कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी भाग घेऊन आपल्या सूचना मांडल्या. या सर्व सूचनांवर मार्ग काढण्याची ग्वाही श्री. देसाई यांनी यावेळी दिली. यावेळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन तसेच सीआयआयचे प्रतिनिधी उपस्थित होते




