नाशिकच्या महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी अंतर्गत सुरू असलेल्या एकलव्य निवासी शाळांमध्ये पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग सुरु करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या शाळांमध्ये अगोदरच नवोदय विद्यालयांच्या धर्तीवर सहावी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू आहेत.
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या हेतूने केंद्र शासनाने नवव्या पंचवार्षिक योजनेत भारतीय संविधानाच्या अनुच्छेद२७५ (१) अन्वये वितरित होणाऱ्या निधीतून नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर आदिवासी विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरावर “एकलव्य निवासी शाळा” सुरू करण्यात आल्या. राज्यातील आदिवासी उपयोजना क्षेत्रामध्ये 25 एकलव्य निवासी शाळा सुरू असून या शाळांमध्ये केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळाच्या (CBSE) अभ्यासक्रमानुसार सहावी ते बारावीपर्यंतचे इंग्रजी माध्यमातून मोफत शिक्षण दिले जाते.
आदिवासी पालकांचा आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पाठविण्याचा कल वाढत आहे. एकलव्य निवासी शाळांमध्ये सीबीएसईच्या इयत्ता सहावीच्या वर्गामध्ये थेट प्रवेश देण्यात येत असल्याने आदिवासी विद्यार्थ्यांना भाषेची अडचण येते. पहिली ते पाचवी सीबीएसईचे वर्ग सुरू केल्यास विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा पाया उत्तम असल्याने त्यांना सहावीपासून पुढील शिक्षण सुलभ होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होऊन आदिवासी विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणातील प्रमाण वाढण्यास मदत होणार आहे. तसेच आदिवासी विद्यार्थ्यांचे मेडिकल,पॅरामेडिकल, अभियांत्रिकी, तंत्रशिक्षण अशा शाखांमधील शिक्षणाचे प्रमाण वाढण्यास मदत होणार आहे. या 25 शाळांमध्ये पहिलीचा वर्ग सुरू केल्यामुळे प्रतिवर्षी 2000 आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमात प्रवेश देणे शक्य होणार आहे.




