मुंबई, दि. 30 : केंद्र व राज्यसरकारच्या अनुसूचित जातींच्या योजनांची राज्यात समाधानकारक अंमलबजावणी झाली असल्याची माहिती, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष रामशंकर कथेरिया यांनी आज सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
श्री.कथेरिया म्हणाले, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग गेले दोन दिवस राज्याच्या दौऱ्यावर असून या दरम्यान मुख्य सचिव, प्रधान सचिव सामाजिक न्याय व विविध विभागांचे सचिव यांच्या सोबत अनुसूचित जातींच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. राज्यात केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत अभियान, उज्वला गॅस योजना या योजनांची चांगली अंमलबजावणी झाली आहे. त्याचबरोबर राज्य सरकारनेही अनुसूचित जातींच्या विविध योजनांची समाधानकारक अंमलबजावणी केली आहे.
ॲट्रॉसिटी कायद्याचीही राज्यात योग्य प्रकारे अंमलबजावणी केली जात आहे. राज्यातील अनुसूचित जातींच्या कल्याणकारी योजना व ॲट्रॉसिटी कायद्याबाबतच्या अनुषंगाने सामाजिक न्याय विभाग व पोलीस महासंचालक महाराष्ट्र यांच्याकडून याबाबतच्या मागविलेल्या अधिकच्या माहितीचा अहवाल एक महिन्यात प्राप्त होणार असून तो केंद्र सरकारला सादर करण्यात येईल.
यावेळी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ.एल मुरुगन व सदस्य श्रीमती डॉ.स्वराज विद्वान, के.आर.रामुलु, डॉ.योगेंद्र पासवान, आयोगाचे सचिव प्रितम सिंग आदी उपस्थित होते.




