नाशिक : निवडणूक कालावधीत सर्व अधिकाऱ्यांनी आचार संहितेचे काटेकोरपणे पालन करत जबाबदारीने काम करावे. बँकेत होणाऱ्या सर्व व्यवहारांवर लक्ष ठेवून त्याचे नियमित अहवालदेखील सादर करण्यात यावे, अशी सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवडणूक खर्चाबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, निवडणूक उपजिल्हाधिकारी कुंदन सोनवणे, तहसिलदार प्रशांत पाटील आदी अधिकारी उपस्थित होते.
श्री.मांढरे म्हणाले, निवडणूक आचारसंहिता कालावधीत बँक खात्यातुन आरटीजीद्वारे एका बँक खात्यातून अनेक व्यक्तींच्या खात्यात रक्कम जमा होण्यावरही बँकांनी लक्ष ठेवणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे एक लाख किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम खातेदाराच्या किंवा त्याच्यावर अवलंबुन असणाऱ्यांच्या खात्यात जमा करणे किंवा काढणे यासाठी संबंधित खातेदाराने प्रतिज्ञापत्र बँकेकडे सादर करणे गरजेचे आहे, असे ही त्यांनी सांगितले.
निवडणूक काळातअवैध रोकड नियंत्रणासाठी केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या सूचनेनुसार एटीएम मशिन्समधे रोकड जमा करतांना वाहतुकीसाठी एसओपीचा वापर करावा. तसेच निवडणूक काळात खाजगी विमान , हेलिकॉप्टर यांची सेवा पुरवितांना नागरी उड्डाण मंत्रालयाच्या निर्देशानुसार प्रत्येक प्रवाशाच्या बॅगची तपासणी करण्याचेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
निवडणूक कालावधीत राजकीय पक्षांकडून एक लाख किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम खात्यात जमा करणे किंवा काढणे तसेच उमेदवारांच्या खात्यातून 10 लाखांहून अधिकरोख रक्कम काढणे किंवा जमा करण्याची माहिती मिळाल्यास त्यासंदर्भात आयकरविभागाच्या नोडल अधिकाऱ्यांना कळविण्यात यावे अशा सूचना श्री.मांढरे यांनी दिल्या.





