नाशिक, दिनांक १४ ऑक्टोबर :- नागपूर येथील विभागीय क्रीडा संकुलात ज्युनियर गटाच्या २ ऱ्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. १५ वर्षे आणि १७ वर्षें अश्या दोन वयोगटाचा समावेशअसलेल्या या स्पर्धेत १५ वर्षे वयोगटात मुलांमध्ये नाशिकच्या प्रज्वल सोनावनेने अंतिम लढतीत पुण्याच्या प्रथम वाणीचा २१- ०९ ,२१ – १८ असा पराभव करून विजेतेपद पटकावले. तर मुलींमध्ये १५ वर्षे गटात नाशिकच्या हेतल विश्वकर्माने अंतिम लढतीत क्रीपी शेजवानचा २-१ असा पराभव करून विजेतेपदावर आपली मोहर उमटवली.
मुलांच्या एकेरी प्रकारात दुसरे मानांकन मिळालेल्या प्रज्वल सोनावानेने प्राथमिक लढतीत अनुक्रमे प्रितेश जैन, सुदर्शन वडार आणि आद्य पारसनीस यांच्यावर सहज मात करून उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. त्यानंतर प्रज्वलने उपउपांत्यपूर्व फेरीत शरण पिल्लेला २१-१७. २१-०८ असे पराभूत केले, तर उपांत्यपूर्व फेरीत देवेश जेनाला २१-१५, २१- १८ असे पराभूत करून उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत प्रज्वलने तेजस शिंदेचा २१-११ आणि २१- १८ असा सहज पराभव करून अंतिम लढतीसाठी आपले स्थान पक्के केले. प्रज्वलची अंतिम लढत पुण्याच्या प्रथम वाणीशी खेळविली गेली . या निर्याणक लढतीतही प्रज्वलने कधी नेटजवळ बारीक ड्रॉप्स टाकून तर कधी बेसलाईनवरून जोरदार स्मेशेस लगावून हा अंतिम सामनाही २१- ०९, आणि २१- १८ असा सरळ दोन सेटमध्ये जिंकून या २ ऱ्या महाराष्ट्र बॅडमिंटन स्पर्धेवर आपले वर्चस्व अधोरेखत केले. या स्पर्धेत प्रथम मानांकन असंलेल्या सुवीर प्रधानाला उपउपांत्य फेरीतच पराभव पत्करावा लागला.
दुहेरीतही प्रज्वलची उपविजेतेपदाची कामगिरी – या स्पर्धेत दुहेरी प्रकारातही १५ वर्षे वयोगटात प्रज्वलने सुवीर प्रधानच्या साथीने खेळतांना अत्यंत चुरशीच्या झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात श्रेय्यस गजभिये आणि हर्ष शर्मा या जोडीचा २३-२१ आणि २६-२४ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. अंतिम लढतीत प्रज्वल – सुवीर जोडीने प्रथम वाणी आणि तेजस शिंदे यांना निकराची लढत दिली. या अंतिम सामन्यात प्रज्वल – सुवीर जोडीने पहिला सेट २१-१३ असा जिंकून १-० अशी आघाडी मिळविली. परंतु त्यांना दुसरा सेट १२ -२१ असा गमवावा लागला. तर तिसऱ्या निर्णायक सेटमध्ये प्रज्वल – सुवीर यांनी १८- १६ अशी आघाडी मिळवीली. मात्र त्यानंतर प्रथम आणि तेजस यांनी २०-२० अशी बरोबरी साधली आणि त्यानंतरचे निर्णायक दोन गुण मिळवत हा सेट २२-२० असा जिंकल्यामुळे प्रज्वल – सुवीर जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
हेतलची विजेतेपदाला गवसणी – १५ वर्षे मुलींमध्ये एकेरी प्रकारात नाशिकच्या हेतल विश्वकर्माने प्राथमिक फेरीत रिद्धीमा तियारी, क्रीशा सोनी, निशिका गोखे, निकिता जोसेफ यांना पराभूत करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. तर उपांत्य फ़ेरीत हेतलने असावरी खांडेकरवर संघर्षपूर्ण लढतीत २१-१७, १६-२१ आणि २१- १७ असा २-१ ने विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला. हेतलची अंतिम लढत क्रीपी शेजवांनशी झाली. या अंतिम लढतीतही फारच संघर्ष बघायला मिळाला. पहिल्या सेटमध्ये २०-२० अश्या बरोबरीनंतर क्रीपीने हा सेट २५-२३ असा जिंकून आघाडी घेतली. मात्र त्यानंतर हेतलने अगदी सय्यमाने खेळ करून दुसरा सेट २१-१२ असा जिंकून १-१ अशी बरोबरी साधली. तर तिसऱ्या निर्णायक सेटमध्येही हेतलने कायम २-३ गुणांची आघाडी टिकवून ठेवत हा निर्णायक सेट २१- १८ असा जिंकून या २ ऱ्या महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन स्पर्धेच्या विजेतेपदावर आपले नांव कोरले.
१७ वर्षे गटातही प्रज्वल, हेतलची चांगली कामगिरी – १७ वर्षे गटाच्या एकेरी सामन्यात प्रज्वलने आपले तीन सामने जिंकून उपउपांत्य फेरी गाठली. मात्र संघर्षपूर्ण खेळ करूनही प्रज्वलला उपांत्यपूर्व फेरीत सार्थक रोकडेकडून २१-१२ १६-२१ आणि २१- १७ असा २-१ ने पराभव पत्करावा लागला. तर मुलींच्या १७ वर्षे एकेरी प्रकारात हेतलने आपले तीन सामने जिंकून उपांत्य फेरी गाठली. परंतु उपांत्य फेरीत
अटीतटीच्या लढतीत हेतलला आर्या देशपांडेंकडून ११- २१, २१- १० आणि २१- १८ असा २-१ ने पराभव स्वीकारावा लागला.
प्रज्वलची सत्यातपूर्ण कामगिरी – प्रज्वल आणि हेतल यांनी याआधी ठाणे येथे झालेल्या राज्य स्पर्धेत विजेतेपद मिळविले आहे. तर नुकत्याच अकोला येथे आयोजित शालेय राज्य स्पर्धेत प्रज्वलने एकेरी आणि दुहेरी प्रकारात सर्वोच्च कामगिरी करून आपल्या संघाला विजेतेपद मिळवून दिले तर हेतलनेही चांगली कामगिरी करून महाराष्ट्राच्या संघात आपले स्थान पक्के केले आहे.
तसेच प्रज्वलची राष्ट्रीय स्पर्धेतही चांगली कामगिरी होत आहे.तर त्यामुळे अशी प्रगती करून प्रज्वल, हेतल, श्रावणी हे खेळाडू आणखी चांगली मजल गाठतील असा विश्वास प्रशिक्षक मकरंद देव यांनी व्यक्त केला. प्रज्वल नाशिकच्या फ्रावशी अकॅडमी स्कुलमध्ये तर हेतल न्यू इरा स्कुलमध्ये शिकत असून आठ वर्षांपासून शिवसत्य क्रीडा मंडळात मकरंद देव यांच्या मार्गदर्शनाखाली बॅडमिंटनचा सराव करत आहेत प्रज्वल आणि हेतलच्या या यशाबद्दल शिवसत्य क्रीडा मंडळाच्या हिमगौरी आहेर, नगरसेवक योगेश हिरे , अनंत जोशी, राधेश्याम मुंदडा, योगेश एकबोटे, फ्रावशी अकॅडमीचे रतन लथ आदिंनी या दोघांचे अभिनंदन करून खेळाडूंनी अशीच प्रगती करून नाशिकचे नाव उज्वल करावे अश्या अपेक्षा व्यक्त केली.






