Nashik : एस.एम. अॅक्टिव्ह फ्रेंड्स सर्कलच्या वतीने आयोजित सामाजिक जनजागृती कार्यक्रमात महिलांच्या सुरक्षिततेसह सायबर गुन्हे, ज्येष्ठ नागरिक व बालकांच्या सुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमास १५० हून अधिक महिलांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.सकाळी योग दिनानिमित्त, योग तसेच आरोग्यविषयक मार्गदर्शन आदरणीय मेघा पुरंदरे त्यांनी केले, तर दुपारच्या सत्रात गंगापूर रोड पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अशोक शरमाळे यांनी महिलांची सुरक्षा, वाढते सायबर गुन्हे, फसवणूक, सामाजिक गुन्हे तसेच भावनिक अत्याचार याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
श्री. शरमाळे यांनी सध्याच्या डिजिटल युगात वाढत असलेल्या सायबर गुन्ह्यांची अनेक प्रत्यक्ष उदाहरणे देत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. बनावट फोन कॉल, खोटे ई-मेल, ओटीपीची मागणी, बँक खात्यांशी संबंधित फसवणूक, सोशल मीडियावरील खोट्या ओळखी यांसारख्या प्रकारांपासून सावध राहण्याची सूचना त्यांनी केली. तसेच वैयक्तिक छायाचित्रे सोशल मीडियावर अनावश्यकपणे शेअर करू नयेत व मोबाईल फोन अनोळखी व्यक्तींकडे देऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महिलांशी संवाद साधताना त्यांनी विशेषतः मातांना आवाहन केले की, आपल्या मुला-मुलींशी मैत्रीपूर्ण संवाद ठेवावा. विशेषतः मुले उशिरा बाहेर जात असल्यास त्यामागील कारण जाणून घ्यावे. “आई ही मुलीची पहिली आणि सर्वात विश्वासू मैत्रीण असते. समाजात सकारात्मक बदल घडवायचा असेल तर त्याची सुरुवात प्रत्येकाने स्वतःपासून करणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी एस.एम. अॅक्टिव्ह फ्रेंड्स सर्कलचे श्री. प्रमोद मुळे व श्रीमती लतिका कुलकर्णी यांनी श्री. अशोक शरमाळे यांचे स्वागत करून परिचय करून दिला.
यावेळी श्री. शैलेन्द्र, श्री राऊते, श्री भंडारे, श्री. निकम, श्री. मदन, श्री. भांडारकर, श्री. दिवेकर, श्री. छत्रपाल, श्री देशमुख श्री उपाध्य यांच्यासह संस्थेचे अनेक सदस्य उपस्थित होते.






