नाशिक दिनांक १७ नोव्हेंबर :- गोल्फ असोसिएशन ऑफ नाशिक, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक आणि रिव्हर साईड गोल्फ कोर्से यांच्या संयुक्त विद्यमाने तब्बल १०६ वर्षानी नाशिक मध्ये खुल्या गटाच्या गोल्फ स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. निफाडच्या बागमार इस्टेटच्या २२ एकर जागेत असलेल्या रिव्हरसाईड गोल्फ कोर्सवर खेळल्या गेलेल्या खुल्या गटाच्या गोल्फ स्पर्धेत विविध गटामध्ये विजेतेपद मिळविणाऱ्या विजेत्यांना सातपूरच्या हॉटेल बी. एल. व्ही. डी. येथे आयोजित पारितोषिक वितारं समारंभात आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रमाणे प्रोफेशनल ग्रुपमध्ये आशिष केरोसीया यांनी विजेतेपद तर थीलीशा वर्माने उपविजेतेपद मिळविले तर अमॅच्युयर ग्रुपमध्ये लेफ्टनंट कर्नल विवेक शर्मा यांनी विजेतेपद तर १४ वर्षीय रिषभ वर्माने उपविजेतेपद मिळविले. महिला ग्रुपमध्ये मिसेस लंबाना यांनी चांगला खेळ करून महिलांचे विजेतेपद मिळविले. नियर द पीन / टार्गेट -म्हणजेच आपल्या नियोजित होल अथवा टार्गेट मध्ये बॉल मारतांना लेफ्टनंट जनरल आर. एस. सालारीया यांनी होलच्या अगदी जवळ स्ट्रोक मारल्यामुळे त्यांना या प्रकारात विजयी घोषित करण्यात आले.
लॉंगर शॉट प्रकारात कर्नल एम , व्ही . शशीधरनने सर्वात जास्त अंतरावर अचूक स्ट्रोक खेळून या प्रकारामध्ये विजेतेपद मिळविले. तर किड्स ग्रुपमध्ये म्हणजेच मुलांच्या गटात कुमार चित्रांश याने सर्वात कमी स्ट्रोकमध्ये आपले टार्गेट पूर्ण केल्यामुळॆ तो या गटाचा विजेता ठरला तर त्याखालोखाल कमी स्ट्रोक्स खेळल्यामुळे विभोर भांडगेला उपविजेतेपद मिळाले.
या स्पर्धाच्या सुंदर आयोजनासाठी वासन टोयोटा, नाशिक, करोली हिल्स रिसॉर्ट्स, इनोव्हा रबर इंडस्ट्रीज, इ. एस. इ.एन. बी. ००७ सिक्युरिटी सर्विसेस, डॉ. विचूरकर, श्रध्दा डिस्ट्रीब्यूटर्स , त्रिंबक रोडचे हॉटेल बी. एल. व्ही. डी. यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या विविध गटातील विजेत्या आणि उपविजेत्याना प्रमुख पाहुणे देवळाली कॅम्पचे लेफ्टनंट जनरल आर. एस. सालारीया, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, मिसेस बागमार, करॉयलीचे संचालक वासन टोयोटाचे संचालक एस. सी. पुजारी, क्रीडा संघटक राजीव देशपांडे, या स्पर्धेचे प्रमुख विंग कमांडर प्रदीप बागमार यांच्या हस्ते आकर्षक चषक प्रदान करून त्यांना सन्मानित करण्यात आले.
नाशिकला गोल्फची अकॅडमी सुरु करणार – नाशिकच्या अगदी जवळच असलेल्या निफाड येथे विंग कमांडर प्रदीप बागमार यांनी आपल्या २२ एकर जागेत सुंदर अश्या सर्व सुविधा असलेले रिव्हर साईड गोल्फ कोर्से नांवाने गोल्फचे सुंदर मैदान (कोर्से ) तयार केले आहे. आणि गोल्फ हा खेळ जगभरात खेळला जात आहे आणि ऑलीम्पिकमध्येही गोल्फचा अंतर्भाव आहे. त्यामुळे या चांगल्या सुविधांचा फायदा आपल्या नाशिकच्या तरुण मुलां – मुलींना व्हावा आणि या माध्यमातून नशिकमधूनही एखादा टायगर वुड सारखा खेळाडू तयार व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाचा क्रीडा विभाग, नाशिक जिल्हा गोल्फ असोसिएशन आणि रिव्हर साईड गोल्फ कोर्से यांच्या संयुक्त विद्यमाने येथे लगेचच गोल्फची अकॅडमी सुरु करण्यात येईल अशी घोषणा यावेळी नाशिकचे जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी केली. या गोल्फच्या अकॅडमीसाठी लागणारे साहित्य, आणि इतर सुविधा शासनाच्या वतीने दिल्या जातील तर संपूर्ण तांत्रिक सहकार्य नाशिक जिल्हा गोल्फ असोसिएशन आणि रिव्हर साईड गोल्फ कोर्सेच्या वतीने करण्यात येणार आहे अशी माहिती रवींद्र नाईक आणि प्रदीप बागमार यांनी दिली.
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्पर्धेचे आयोजन प्रमुख विंग कमांडर प्रदीप बागमार, स्पर्धा समन्वयक नितीन हिंगमिरे, तांत्रिक समिती प्रमुख कर्नल सूर, क्रीडा संघटक राजीव देशपांडे सौ. स्नेहल देव, तोषक चोरडिया, सौ चोरडिया, गोल्फचे प्रशिक्षक हमझा सईद आणि कॅडी म्हणून महत्वाची भूमिका पार पडलेल्या तरुण खेळाडूनी अथक परिश्रम घेतले.
गोल्फ स्पर्धा अंतिम निकाल
प्रोफेशनल ग्रुप – १) आशिष केरोसिया – प्रथम २) थीलीशा वर्मा – दुसरा क्रमांक
अमॅच्युयर ग्रुप – १) लेफ्टनंट कर्नल विवेक शर्मा – प्रथम २) रिषभ वर्मा – दुसरा क्रमांक
स्ट्रेट लाईन प्ले – १) मुरारी पोतनीस
नियर द पीन / टार्गेट – १) लेफ्टनंट जनरल आर. एस. सालारीया
लॉंगर शॉट – १) कर्नल एम ,व्हे, शशीधरन
महिला ग्रुप – १) मिसेस लंबाना – प्रथम
किड्स ग्रुप – १) कुमार चित्रांश – प्रथम २) विभोर भांडगे – दुसरा क्रमांक









